बेगडी आंदोलन, गोंधळलेला नेता!

    04-Jul-2026

Uddhav Thackeray Ram Temple Protest
 
राम मंदिराच्या दानपेटीतील निधीच्या अपहारप्रकरणी आंदोलन करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय बुचकळ्यात टाकणाराच म्हणावा लागेल. ते नेमके कोणाविरोधात आंदोलन करणार आहेत आणि त्याचा उद्देश काय? कारण, या प्रकरणाचा तपास झपाट्याने होत असून, आतापर्यंत आठ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. मग उद्धव ठाकरेंचे आंदोलन कोणाविरोधात आहे? आणि कशासाठी?
 
अयोध्यातील राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केला. पण, ते कोणाविरोधात आणि कशासाठी आंदोलन करणार आहेत, हे एक कोडेच! याचे कारण, या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने सुरू असून, आतापर्यंत आठ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच आदेशावरून या अपहार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना अटकही केली. त्यांच्याकडून काही लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. योगी सरकारचे बुलडोझर या आरोपींच्या घरांबाहेर हुकुमाची वाट पाहात उभे आहेत. खरेतर इतक्या तडकाफडकी कोणत्याही आर्थिक घपल्याचा तपास आजवर झालेला नाही. त्यामुळे विरोधकांची मोठी कुचंबणा झालेली दिसते.
 
या अपहाराचा संबंध योगी आदित्यनाथ किंवा उत्तर प्रदेश राज्य सरकारशी जोडताच येत नाही. कारण, राम मंदिराचा ट्रस्ट हा पूर्णपणे खासगी आहे. तो राज्य किंवा केंद्र सरकारशी जोडलेला नाही किंवा त्याच्या विश्वस्त मंडळात सरकारचा प्रतिनिधीही नाही. त्यामुळे योगी यांच्यावर टीका करताच येत नाही. शिवाय, योगींच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याविरोधात टीकेचा उच्चारही करण्याची एकाही विरोधी नेत्याची छाती झालेली नाही. म्हणूनच, उद्धव ठाकरे यांचा याप्रकरणी आंदोलन करण्याचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. ते नेमके कशासाठी आणि कोणाविरोधात आंदोलन करणार आहेत?
 
खरी गोष्ट अशी की, पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत या प्रकरणाचा वापर करून भाजपविरोधात वातावरण तापवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण, वरील कारणांमुळे त्याची हवाच निघून गेली. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानेही याप्रकरणी आंदोलन सुरू केलेले नसताना, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे हे कशासाठी आंदोलन करीत आहेत, हा प्रश्नच आहे. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना आता पुन्हा एकदा हिंदुत्वाची आठवण झाली. प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयाने सर्व कथित सेक्युलर पक्षांचे धाबे दणाणले आहेत. कारण, ज्या मुस्लीम मतपेढीच्या जोरावर सत्तेवर येण्याची स्वप्ने हे पक्ष बघत होते, ते स्वप्नच उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी, आता हिंदूंच्या मतांशिवाय सत्ता मिळविता येणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे आजवर राम मंदिराला प्रत्यक्षा-प्रत्यक्षपणे विरोध करणार्‍या सर्व विरोधी नेत्यांना आज प्रभू रामांचा पुळका आला आहे.
 
उद्धव ठाकरे यांनाही या बदललेल्या परिस्थितीची जाणीव झाली असावी. राज्यात तर पक्ष आणि निवडणूक चिन्ह हातून गेलेच होते. आता लोकसभेतील जेमतेम नऊपैकी सहा खासदारही त्यांना सोडून गेले आहेत. विधान परिषदेतील तीनापैकी एक आमदारही गेला आहे. आता विधान परिषद आणि राज्यसभेत त्यांच्या गटाच्या एकाही नेत्याला पाठविणे त्यांना शक्य नाही. शिवाय, ज्या मुस्लिमांच्या मतपेढीवर ते उड्या मारीत होते, त्यांचा काही उपयोग होणार नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असेल. परिणामी, ज्या हिंदुत्वाला लाखोली वाहून त्यांनी राजकीय हाराकिरी केली, त्या हिंदुत्वालाच पुन्हा शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असावे. म्हणूनच, महाराष्ट्रात राम मंदिरातील अपहाराविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करून आपण आजही हिंदुत्ववादी आहोत, हे दाखविण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. पण, मतदाराने उबाठांचे हिंदुत्व काय प्रकारचे आहे, त्याचा चांगलाच अनुभव घेतल्याने अशी १०० आंदोलने करूनही त्याचे परिमार्जन होणार नाही.
 
सेक्युलर धर्माने बाटलेल्या उबाठांनी सत्तेत असताना आपल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर ‘हनुमान चालीसा’ म्हणण्यावर बंदी घातली होती आणि तसे करणार्‍या राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकले होते. आज त्यांना दादरच्या हनुमान मंदिराबाहेरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हा काव्यगत न्यायच म्हणायला हवा. मुख्यमंत्री असताना उबाठांच्या सरकारने हिंदुत्व खुंटीला टांगले होते. त्यांचे सरकार ‘अझान’ स्पर्धा घेण्यात आणि मैदानाला ‘टिपू सुलताना’चे नावे देण्यात मग्न होते. ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उर्दू दिनदर्शिका छापणे, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांचा गुन्हेगार याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करणे, उर्दू भवनाच्या निर्मितीसाठी निधी देणे यांसारखे उदात्त कार्यक्रम त्यांचे सरकार आखत होते. इतकेच नव्हे, तर भगव्या ध्वजाला ‘फडके’ म्हणण्यापर्यंत उबाठांची मजल गेली होती. ‘ईशनिंदा’ कायदा करण्याचे आश्वासन त्यांनी मौलवींच्या शिष्टमंडळाला दिले होते. तसेच संसदेत त्यांच्या गटाने ‘वफ’ कायद्यातील सुधारणांविरोधात मतदान केले होते. ‘कोविड’च्या काळात मंदिरे बंद ठेवली होती. पण, मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवली होती. मंदिरांवर अवलंबून असलेल्या मराठी व हिंदू व्यावसायिकांचा विचार त्यांच्या मनाला तेव्हा यत्किंचितही शिवला नव्हता. ‘हिंदू’ शब्दही त्यांनी तोंडातून काढणे थांबविले होते. इतकेच नव्हे, तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चेंबूरमध्ये चित्ता कॅम्प येथे सभेत मुस्लीम जमाव पाहून त्यांनी चक्क हिंदीत भाषण केले. तेव्हा त्यांचे मराठीप्रेम कुठे गेले? म्हणजे ना मराठीवर प्रेम, ना हिंदुत्वाबद्दल आस्था! या गोष्टी त्यांच्या दृष्टीने केवळ मते मिळविण्याचे सोयीस्कर साधन आहे. पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडाने त्यांचे हिंदुत्व किती बेगडी आणि बनावट आहे, ते स्पष्ट झालेच.
 
काही प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडून, फुटीरांनी भाजपला पाठिंबा दिला. पण, महाराष्ट्रात उबाठांनी अनेकदा सूचक संदेश देऊनही भाजप त्यांना पुन्हा ‘रालोआ’मध्ये घेण्यास अनुत्सुकच. परिणामी, त्यांची स्थिती अधांतरी झाली आहे. या अधांतरी अवस्थेमुळे उबाठांची पूर्ण कुचंबणा होत आहे. त्याचा राग आल्यामुळेच भाजपविरोधात त्यांनी या आंदोलनाचा निर्णय घेतला असावा. उबाठांचे हे कथित आंदोलन त्यांची गोंधळलेली मन:स्थिती दर्शविते. भाजपने त्यांची चारी बाजूंनी कोंडी केल्यामुळे भाजपवरील राग काढण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी या बेगडी आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्याचे फलित शून्यच!




संबंधित मजकूर