भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगणारं क्रांतिपर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांचं जीवनकार्य समजून घेतल्याशिवाय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास अपूर्णच. सावरकरांसारख्या तेजोमय व्यक्तिमत्त्वाला आपल्या हयातीत एकाचवेळी परकीयांशी आणि काही प्रमाणात स्वकीयांशीही संघर्ष करावा लागला. मात्र, या संघर्षातून तावून-सुलाखून सावरकरांनी पुन्हा एकदा ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून मार्गदर्शन करण्याचेच कार्य केले. सावरकरांच्या जीवनकार्याचा जागर करण्यासाठी आजच्या ‘जेन-झी’ला त्यांच्या चैतन्यमयी जीवनाची गोष्ट सांगण्यासाठी ‘...म्हणून स्वातंत्र्यवीर क्रांती 'RELOADED’ हा अभिवाचनाचा सांगीतिक कार्यक्रम काल दि. ३ जुलै रोजी दादर (प) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या संहितेचे लेखन नितीन वाघ आणि ऋग्वेद सोमण यांनी केले असून, दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. प्रसन्न केतकर, मंजिरी मराठे, नितीन वाघ, मेघना गुंजाळ, रमा कुलकर्णी, अवधूत गांधी अशा दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा आगळा-वेगळा प्रयोग आकाराला आणणार्या मान्यवरांचे मनोगत...
सावरकरांचं विचारसंचित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं!
सावरकरांचं चरित्र हे अतिशय जाज्ज्वल्य आणि प्रेरणा देणारं जीवन आहे. हा विषय मांडताना आम्ही अशी अजरामर गाणी निवडून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत. सावरकरांच्या विचारांचं हे संचित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. सावरकरांनी लिहीलेल्या कविता, रचलेला पोवाडा आम्ही ज्यावेळी सादर करतो, त्यावेळी त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आम्ही भाग्यवान आहोत की, त्यांच्या कलाकृती सादर करताना आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. सावरकरांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून होता. आळंदीला असताना शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर सावरकरांनी रचलेले पोवाडे गायचे, त्यांच्या गाण्याचे संस्कार माझ्यावर झाले. आताच्या भाषेत आपण ज्याला ‘जॅमिंग’ म्हणतो; तसाच काहीसा प्रकार त्या काळात सावरकरांच्या गीतांना धरून आम्ही करत असू. यापूर्वीसुद्धा दोन वेगवेगळ्या कलाकृतींसाठी सावरकरांनी लिहिलेली गाणी रेकॉर्ड केली होती. पंडित हृदयनाथ मंगशेकर असतील किंवा बाबूजी (सुधीर फडके) यांनी दिलेल्या अप्रतिम चाली हा आपल्या कलाविश्वातील ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना आनंदच होत आहे. - अवधूत गांधी
आताच्या पिढीला त्यांच्या भाषेत सावरकर कळले पाहिजे!
‘...म्हणून स्वातंत्र्यवीर क्रांती 'RELOADED’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांचा व त्यांच्या क्रांतिपर्वाचा विचार अभिवाचनाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. हा कार्यक्रम मूलभूत अशा प्रमाण ग्रंथस्रोतांवर आधारित आहे. मग ते धनंजय कीर यांनी सावरकरांचे लिहिलेले चरित्र असो किंवा डेव्हिड गारनेट याचं ‘गोल्डन एकोज’ नावाचं पुस्तक. त्या काळात जी कागदपत्रे उपलब्ध झाली, त्या पार्श्वभूमीवर ते लिखाण करण्यात आलं. सावरकरांनी देशांमध्ये आणि देशाबाहेरसुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वाने जी मोठी चळवळ उभी केली, तो विचार आम्हाला लोकांसमोर मांडायचा आहे. सावरकरांच्या गळ्यामध्ये 'D' (Dangerous) हा बिल्ला होता. अंदमानात त्यांच्या कोठडीला ‘डबल ग्रील’ होती. त्यांचं जे ‘पोटेन्शिअल’ इंग्रजांना कळलं, ते दुर्दैवाने आपल्या देशबांधवांना लक्षात आलं नाही, त्यामुळे सावरकर हे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आताच्या पिढीला त्यांच्या भाषेत सावरकर कळले पाहिजेत, या अनुषंगाने आपण हे कलाकृती साकारली आहे. प्रसन्न केतकर आणि मंजिरी मराठे हे अनुभवी माणसं या कार्यक्रमात आहेतच; मात्र त्याचबरोबर ‘जेन-झी’चे प्रतिनिधित्व करणारे नितीन वाघ आणि मेघना गुंजाळसुद्धा आहे. पतित पावन मंदिराची उभारणी असेल किंवा स्थानबद्धतेमध्येसुद्धा त्यांनी केलेली सामाजिक क्रांती असेल, अशा वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून सावरकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मागच्या काही काळापासून त्यांना ‘माफीवीर’ ठरवण्याचा ‘प्रपोगंडा’ सुरू आहे; त्यांच्या क्रांतिकार्याला नाकारण्याचं काम काही लोक करत आहेत. अशा लोकांनी हा प्रयोग जरूर बघावा. सावरकरांचे जीवनकार्य ‘सेलिब्रेट’ करणारा हा प्रयोग आहे! - दिग्पाल लांजेकर
सावरकरांच्या टीकाकारांनीसुद्धा पाहावा, असा कार्यक्रम!
विनायक दामोदर सावरकर - एक जाज्वल्य स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिविषयक स्वतःचे असे वेगळे तत्त्वज्ञान मांडणारा एक तत्त्ववेत्ता, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही खंबीरपणे त्याच्याशी मुकाबला करणारा भरतभूचा एक साधक आणि याबरोबरच ‘कमला’सारखे काव्य ज्याला स्फुरले, असा संवेदनशील मनाचा कवी, साहित्यिक. अजून अशी कैक बिरुदं सावरकरांना लावता येतील; परंतु आजकालच्या राजकीय परिस्थितीत आणि पक्षीय राजकारणात कुठेतरी आपण या अनादि-अनंत अशा व्यक्तिमत्त्वाला खुजे करून टाकलेले आहे, असे भासते. नीट अभ्यासल्यास जाणवते की, कोण्या एका पक्षाचे किंवा कोण्या एका राजकीय विचारधारेचे फक्त समर्थक असण्याइतके सावरकर छोटे नाहीत; ते स्वतःच एक विचारधारा आहेत. हजारो लाखो वर्षांत एखाद्याचवेळी असा बुद्धिमान जन्माला येतो आणि तो आपल्या भारतात यावा, यासारखे भाग्य नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या व्याप्तीचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, सावरकरांचे संपूर्ण विचार हे खरं तर आजच्या राजकीय वर्तुळात कोणालाच पूर्णपणे पेलण्यासारखे नाहीत. फक्त विरोधकांनाच नाही, तर समर्थकांनासुद्धा! त्यांच्या याच व्यापक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब म्हणजे, ‘...म्हणून स्वातंत्र्यवीर क्रांती 'RELOADED’ हा कार्यक्रम म्हणजे, आमच्या परीने या व्यक्तिमत्त्वाचा केलेला अभ्यास आणि तो अभ्यास रंजक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यावर केलेले एक रुबाबदार सादरीकरण म्हणता येईल. ९० मिनिटांच्या या कार्यक्रमात सावरकरांच्या जन्मापासून ते देश स्वतंत्र झाला, तिथपर्यंतचा त्यांच्या दृष्टिकोनातून देशाचा आणि त्याबरोबर त्यांचा स्वतःचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यांचा परिवार, बालपण, पुण्यातील कारवाया, लंडनमधील चळवळ, मार्सेलिसची उडी, त्यांना झालेल्या दोन जन्मठेपा, रत्नागिरी स्थानबद्धतेत त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे काम, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या अशी त्यांच्या चरित्राची अनेक पाने उलगडत हा प्रवास पुढे जातो. सावरकरप्रेमींना हा कार्यक्रम पाहावा, असे वेगळे सांगायची काही गरज नाही. परंतु, त्यांच्या टीकाकारांनीसुद्धा हा कार्यक्रम आवर्जून पाहावा; कारण विरोध करण्याच्या नादात आपण एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास जाणून घेण्यास मुकू नये, असे मला वाटते. ९० मिनिटे हा खरं तर सावरकरांचा जीवनपट मांडण्यास अत्यंत कमी कालावधी असला, तरीही कित्येकांसाठी कदाचित त्यांच्या विचारांना नवी दिशा देणारी ही एक सुरुवात ठरू शकेल; सावरकरांबद्दल अजून सखोल अभ्यास करण्याची प्रेक्षकांची उत्कंठा हा कार्यक्रम अनुभवून नक्कीच वाढेल, अशी खात्री मला वाटते. - ऋग्वेद सोमण