हसू अन् रडू! निमित्त ‘मायक्रोचिप’चे!

    04-Jul-2026   

Microchip Technology In Fifa Wordcup 
 
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आता बादफेरीचे सामने सुरू झाले आहेत. जिंकणार्‍या संघाच्या चेहर्‍यावर हसू फुलते, तर हरणार्‍या संघाचा चेहरा अश्रूंनी झाकोळला जातो. जय-पराजयाचा हा हिंदोळा खेळाचा एक अविभाज्य भाग आहे; पण जेव्हा टेनोलॉजीच्या आधारे जय-परायजय निश्चित होतो, तेव्हा मानवी भावभावनांचा उद्रेक कसा होतो, याचा प्रत्यय रोनाल्डोच्या पोर्तुगाल आणि क्रोएशियाच्या बाद फेरीच्या सामन्यात अनुभवास आला. ‘मायक्रोचिप’ने क्रोएशियाचा गोल फेटाळला आणि साडेचार कोटी लोकसंख्येचा देश शोकसागरात बुडाला. मैदानावर क्रोएशियासमर्थकांनी बाटल्या फेकून आपला निषेध व्यक्त केला.
 
त्याचे झाले असे, क्रोएशियाने १-२ असे पिछाडीवर असताना सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना दुसरा बरोबरीचा गोल केला. गोलबरोबरीमुळे सामना अतिरिक्त वेळेत नेल्याचा जल्लोष सुरू झाला होता. मात्र, पुढच्या काही क्षणांत स्टेडियममधील आनंद हा संताप आणि अविश्वासात बदलला. कारण मैदानावरील पंचांनी नव्हे, तर चेंडूमध्ये बसवलेल्या मायक्रोचिपने क्रोएशियाचा गोल रद्द केला आणि पोर्तुगालला २-१ असा विजय मिळवून दिला आणि रोनाल्डोची टीम अंतिम १६ संघाच्या फेरीत पोहोचली.
 
‘फिफा विश्वचषक २०२६’च्या ‘राऊंड ऑफ ३२’ सामन्यात पोर्तुगालने रोनाल्डोच्या पेनल्टी गोल आणि गोंकालो रामोसच्या भरपाई वेळेतील हेडरच्या जोरावर आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या क्षणी जोस्को ग्वार्डिओलने जवळून चेंडू जाळ्यात धाडत क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिल्याचे दिसत होते. संपूर्ण क्रोएशियन संघ आणि चाहते अतिरिक्त वेळेच्या तयारीत असतानाच ‘व्हीएआर’ने हस्तक्षेप केला.
 
तपासात प्रश्न फक्त एकच होता, चेंडू ग्वार्डिओलकडे जाण्यापूर्वी इगोर माटानोविचचा त्याला स्पर्श झाला होता का? कारण स्पर्श झाला असेल, तर पुढे उभा असलेला क्रोएशियन खेळाडू ऑफसाईड ठरत होता. टीव्हीवरील ‘रिप्ले’मध्ये तो स्पर्श कुठेच स्पष्ट दिसत नव्हता. उलट, अनेकांना माटानोविचने चेंडूला स्पर्शच केला नसल्याचा विश्वास होता.
 
पण तेवढ्यात निर्णय दिला ‘स्निको’ तंत्रज्ञानाने!
 
विश्वचषकासाठी वापरण्यात येणार्‍या ‘अदिदास ट्रायोंडा’ चेंडूमध्ये बसवलेल्या ‘मायक्रोचिप’ने माटानोविचचा चेंडूला झालेला अत्यंत सूक्ष्म स्पर्श टिपला होता. टीव्ही प्रेक्षकांना दाखवण्यात आलेल्या सेन्सर ग्राफमध्ये चेंडूला स्पर्श होताच, एक छोटासा ‘स्पाईक’ दिसला आणि त्यावरून स्पर्श झाल्याचे निश्चित झाले. नॉर्वेचे पंच एस्पेन एस्कास यांनी अनेक ‘रिप्ले’ पाहिल्यानंतर अखेर गोल रद्द केला. तोच सामन्यातील जवळपास शेवटचा निर्णय ठरला आणि काही क्षणांत अंतिम शिट्टी वाजली.
 
निर्णय जाहीर होताच, स्टेडियममध्ये संतापाचा स्फोट झाला. क्रोएशियाचे खेळाडू पंचांभोवती जमा झाले, तर संतप्त समर्थकांनी मैदानात प्लास्टिकच्या बाटल्यांचा वर्षाव केला. सोशल मीडियावरही चर्चेचा भडका उडाला. ‘डोळ्यांना दिसत नाही, तो स्पर्श मशीनने कसा शोधला’, ‘फुटबॉल आता खेळाडू खेळतात की संगणक,’ असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. हेच तंत्रज्ञान जर १९८६ सालच्या वर्ल्डकपमध्ये असते, तर मॅराडोनाचा संघ वर्ल्डकप जिंकूच शकला नसता. त्याचा तो एतिहासिक ‘हॅण्ड ऑफ गॉड’चा गोल ‘मायक्रोचिप’ने रद्द ठरविला असता.
 
यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये ‘स्निको’ हे क्रिकेटप्रेमींना चांगले परिचित असलेले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागला की नाही, हे ठरवण्यासाठी वर्षानुवर्षे त्याचा वापर होत आहे. आता तेच तंत्रज्ञान फुटबॉलमध्येही निर्णायक ठरत आहे.
 
विश्वचषकातील प्रत्येक चेंडूमध्ये बसवलेली ‘मायक्रोचिप’ चेंडूचा वेग, दिशा, फिरकी, हालचाल आणि प्रत्येक स्पर्श सेकंदाच्या हजाराव्या भागात नोंदवते. त्यानंतर ‘स्लो-मोशन रिप्ले’, ऑडिओ आणि ‘सेन्सर डेटा’ यांची सांगड घालून ‘व्हीएआर’ अधिकार्‍यांना अचूक निर्णय घेता येतो. विशेष म्हणजे, २०२२च्या विश्वचषकात प्रथमच फुटबॉलमध्ये दाखल झालेल्या या तंत्रज्ञानाने आजवर अनेक निर्णयांमध्ये मदत केली होती; पण विश्वचषकातील ‘नॉकआऊट’ सामन्याचा निकाल बदलणारा आणि एका महासंघाचे स्वप्न संपवणारा निर्णय प्रथमच इतया थेट पद्धतीने ‘स्निको’ने दिला आहे.
 
या तंत्रज्ञानाचा शोध इंग्लंडचे संगणक शास्त्रज्ञ अ‍ॅलन प्लास्केट यांनी १९९०च्या दशकात लावला होता. १९९९ मध्ये क्रिकेट प्रसारणातून त्याचा पहिला वापर झाला. इयान बेल हा क्रिकेटर या तंत्रज्ञानाचा पहिला बळी मानला जातो. तब्बल सव्वा दोन दशकांनंतर त्याच तंत्रज्ञानाने फुटबॉलच्या सर्वांत मोठ्या स्पर्धेत क्रिस्टियानो रोनाल्डोच्या विश्वचषक स्वप्नाला नवसंजीवनी दिली आणि क्रोएशियाचे स्वप्न एका ‘मायक्रोचिप’ने चिरडले. हसू आणि रडू यात होती, ती एक ‘मायक्रोचिप!’




संबंधित मजकूर