मुंबई : (Manori Desalination Plant) विविध सात धरणांमधून मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असला, तरी शहराची एकूण गरज ४,६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणारा २०० एमएलडी क्षमतेचा खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणीटंचाईच्या समस्येला मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य अबू आझमी यांनी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी सदस्य योगेश सागर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री सामंत म्हणाले की, मोडकसागर, तानसा, वैतरणा, भातसा आदी सात धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे तुटवडा निर्माण होत असून, ही समस्या सोडविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे मुंबईला अतिरिक्त २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ३५ रुपये, म्हणजेच प्रति लिटर १५ ते १७ पैसे इतका खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सदर प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्वावर विकसित करण्यात येत असून, यासाठी मे. जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड आणि मे. आय.डी.ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र संदर्भातील आवश्यक मान्यता प्राप्त झाली आहे. (Manori Desalination Plant)
प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत ४,०७७ कोटी रुपये असून, त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. कार्यादेशानुसार प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने असून, त्यानंतर २० वर्षांचा प्रचलन व परिचालन कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Manori Desalination Plant)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.