मुंबई : (Maharashtra Heavy Rain) राज्यात विशेषत: ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत. या भागात ६ तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळे येतील, सरासरीपेक्षा कितीतरी अधिक मोठा पाऊस होईल. प्रवास टाळता आला, तर तो टाळायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात ४ ते ७ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून, ठाणे, पुणे घाटमाथा, पालघर, सातारा, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विविध ठिकाणी २०० ते २५० मिमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचे तसेच घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Heavy Rain)
'शासनाचे अलर्ट पाहूनच बाहेर पडावे'
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पावसासंदर्भातील अलर्ट आपण संबंधित भागातील नागरिकांना देत आहोत. एसएमएस पाठवत आहोत. अनेक भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आता ज्या प्रकाराचा पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे काही अपघात होऊ नयेत, यासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळेस आपण नीटपणे अलर्ट देत आहोत, ती लोकांनी फॉलो करावीत आणि शक्यतो शासनाचे अलर्ट पाहूनच बाहेर पडावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Heavy Rain)
आपत्कालीन संपर्क क्रमांक
विभाग संपर्क क्रमांक
बृहन्मुंबई महानगरपालिका 1916
पालघर 02525 297474
+91 82379 78873
ठाणे महानगरपालिका 022-25364779
02225301740
91 93723 38827
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष 1800-222-108
8657887101
पनवेल महानगरपालिका 02227458040/41/42
‘निंदकाचे घर असावे शेजारी’
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टिंग केले आहे. तिथे दोन खड्डे आहेत. मात्र पूर्ण रस्त्यावर कुठेही खड्डे नाहीत. मात्र काही लोकांना यातच आनंद वाटत आहे. कुठलाही रस्ता बांधल्यानंतर पहिल्या पावसात त्याच्यावर खड्डे पडतात. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर दुसरी लेअर टाकली जाते. विरोधकांनी टीका केली असली तरी आम्ही ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे मानतो, असे फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Heavy Rain)