अखंड भारताचे प्रणेते आणि बंगाल सुपुत्र - देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

    04-Jul-2026


Dr Syama Prasad Mookerjee Jayanti
 
भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि काश्मीरच्या प्रश्नावरून ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ ही बुलंद घोषणा देणारे अखंड भारताचे प्रणेते आणि बंगालचे सुपुत्र देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची दि. ६ जुलै रोजी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचे आणि विचारवारशाचे स्मरण करणारा हा लेख...
 
"जो देश आपल्या भूमीला, संस्कृतीला, एकतेला विसरतो; तो देश इतिहासातून पुसला जातो,” हेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारसरणीचे एका वाक्यात सार म्हणता येईल.
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म कलकत्त्यातील एका प्रसिद्ध कुटुंबात दि. ६ जुलै १९०१ रोजी झाला. त्यांचे वडील आशुतोष मुखर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते व त्यांनी कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदही भूषवले होते. त्यांची आई जोगमाया देवी या अत्यंत धार्मिक आणि आदर्शवादी होत्या. या माता-पित्यांनी श्यामाप्रसाद यांच्या जडणघडणीत आणि संस्कारात मोलाची भूमिका बजावली. श्यामाप्रसाद यांच्या जीवनावर आईच्या धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा मोठा प्रभाव होता.
 
दि. २३ जून १९५३ रोजी काश्मीरमधील कारावासात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यावर जोगमाया देवी यांनी अत्यंत धैर्याने उद्गार काढले होते, "माझ्या मुलाचे निधन हे भारतमातेचे नुकसान आहे, असे मला अभिमानाने वाटते!” आईच्या या महान विचारांमुळे आणि त्यागामुळे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळाली. दि. २३ जून हा दिवस स्मृतीचा नाही, शपथेचा आहे. ज्या दिवशी बंगालच्या मातीने भारताच्या अखंडतेसाठी आपला सुपुत्र दिला.
 
‘भारतीय जनसंघ’ म्हणजेच, आजचा भाजप ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारताला दिलेली मोठी देणगी आहे. दि. ८ एप्रिल १९५० रोजी डॉ. मुखर्जी यांनी ‘नेहरू-लियाकत करारा’च्या निषेधार्थ केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यागपत्र दिले. दि. १४ एप्रिल रोजी आपल्या त्यागपत्रासंबंधात एक विस्तृत निवेदन त्यांनी लोकसभेत सादर केले. त्यामध्ये राष्ट्रविरोधी आणि हिंदूविरोधी धोरणांचा उल्लेख त्यांनी केला होता आणि देशाला इशारा दिला होता की, आपण जर या धोरणांवर अंकुश ठेवला नाही; तर देशांमध्ये इ. स. १९४७ पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा बिकट परिस्थिती निर्माण होईल. त्यांच्या या इशार्‍यामुळे संपूर्ण देश हादरला होता. तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी उठवली गेली होती. दिल्लीमधील राष्ट्रवादी मंडळींनी डॉ. मुखर्जी यांचा जाहीर गौरव करण्याचा निर्णय घेतला. हा गौरव समारंभ दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानामध्ये झाला, ज्याच्या एका कोपर्‍यात आता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रतिमा लावलेली आहे.
 
बंगालची भूमी, भारताचा योद्धा
 
कलकत्त्यात जन्मलेले श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या विचार आणि क्रांतीच्या परंपरेचे वारसदार होते. विवेकानंदांनी ज्या भूमीतून आध्यात्मिक जागृती केली, सुभाषचंद्र बोस यांनी ज्या भूमीतून रणशिंग फुंकले, त्याच भूमीत मुखर्जींनी वैचारिक अखंडतेचा पाया रचला. केवळ ३३व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र यांवर त्यांचे प्रभुत्व होते; पण पद, कीर्ती, विद्वत्ता यांपेक्षा त्यांना मोठे होते, ते भारताचे अखंडत्व. त्यांचे म्हणणे असे होते की, विद्वान असणे म्हणजे फक्त ग्रंथ वाचणे नव्हे; तर राष्ट्रासाठी लढणे.
 
एक देश में दो निशान, नही सहेगा हिंदुस्थान, एक विधान, एक प्रधान, एक निशान
 
स्वातंत्र्यानंतरही जम्मू-काश्मीरला ‘कलम ३७०’ने दिलेला विशेष दर्जा म्हणजे, भारताच्या शरीरात टोचलेला काटा होता. ‘एका देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान, दोन झेंडे’ ही कल्पना डॉ. मुखर्जींसाठी असह्य होती. त्यांनी संसदेत, जनतेसमोर, रस्त्यावर एकच प्रश्न विचारला की, ‘भारत जर एक आहे, तर त्याचे कायदे, त्याचा झेंडा, त्याचा नेता वेगवेगळा कसा?’ हेच तत्त्व घेऊन त्यांनी १९५३ मध्ये ‘जम्मू-काश्मीर सत्याग्रह’ सुरू केला. परवानगीशिवाय राज्यात प्रवेश केल्यामुळे त्यांना अटक झाली. श्रीनगरच्या तुरुंगातच दि. २३ जून १९५३ रोजी त्यांचे संशयास्पद निधन झाले.
 
त्या एका बलिदानाने भारताच्या राजकीय मानसिकतेत परिवर्तन घडवले. आज ‘कलम ३७०’ निष्प्रभ झाले आहे. पण, त्यामागे मुखर्जी यांच्या रक्ताचा आणि विचारांचा पाया आहे.
 
तत्त्वनिष्ठ राजकारणाचा पाया
 
सत्तेसाठी तडजोड करणार्‍या राजकारणाला त्यांनी कधीही थारा दिला नाही. १९५१ मध्ये त्यांनी ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना केली. त्यांचा कार्यक्रम स्पष्ट होता- सांस्कृतिक राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाभिमुख राजकारण. जनसंघ हा केवळ पक्ष नव्हता, तो एक विचार होता. आजचा भाजप ही त्याच विचाराची विस्तारित, सशक्त शाखा आहे. मुखर्जींच्या बीजापासूनच आजचा वटवृक्ष उभा आहे.
 
शिक्षण आणि संस्कृतीची जडणघडण
 
डॉ. मुखर्जी केवळ राजकारणी नव्हते, ते शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत राष्ट्रीय विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांची धारणा अशी होती की, जो देश आपल्या इतिहासाला, भाषेला, संस्कृतीला विसरतो; तो गुलाम होतो. म्हणूनच, त्यांनी मॅकॉलेच्या शिक्षणपद्धतीला विरोध केला आणि भारतकेंद्री शिक्षणाचा पुरस्कार केला. आज नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्या मूल्यांवर उभे आहे, त्याचा पाया श्यामाप्रसादांच्या विचारात आहे.
 
आजच्या युद्धजन्य जगासाठी मुखर्जींचा संदेश
 
२०२६ मध्ये जग पुन्हा एकदा अस्थिर आहे. भू-राजकीय संघर्ष, दहशतवाद, आर्थिक युद्ध आणि विचारधारात्मक हल्ले यांचा काळ आहे. सीमेवर बंदूक चालते, तर अंतर्गत विचारांवर घाला घातला जातो. अशा काळात डॉ. मुखर्जी यांचा संदेश अधिकच सयुक्तिक व मौल्यवान ठरतो. ‘राष्ट्र एकता’ हीच सर्वांत मोठी सुरक्षा आहे. ज्या दिवशी देशात दोन ‘निशाण’ राहतील, त्या दिवशी शत्रूला संधी मिळते. तत्त्वनिष्ठ नेतृत्वाशिवाय राष्ट्र टिकत नाही. सत्तेसाठी तडजोड करणारे नेतृत्व देशाला कमकुवत करते. मुखर्जींनी मंत्रिपदाचा त्याग केला; पण तत्त्वाचा नाही. सांस्कृतिक राष्ट्रवादाशिवाय राष्ट्र टिकत नाही, या विचाराचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला.
 
बलिदानाला मिळालेला न्याय डॉ. मुखर्जींनी आयुष्यभर ज्या ‘कलम ३७०’ विरोधात लढा दिला, ते कलम दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्दबातल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरला असलेला स्वतंत्र दर्जा इतिहासजमा झाला. हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्याला वाहिलेली ती आदरांजली होती. बंगालच्या सुपुत्राने पाहिलेले स्वप्न, भारताच्या संसदेने भाजपच्या कारकिर्दीत पूर्ण केले.
 
‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जगणे, देशविघातक विचारांना तथ्य आणि तर्काच्या आधारावर उत्तर देणे आणि आपल्या पुढच्या पिढीला भारताचा इतिहास, परंपरा आणि मूल्ये शिकवणे, हीच खरी श्यामाप्रसादांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. बंगालने भारताला नेहमीच विचारवंत दिले आहेत. विवेकानंदांनी आध्यात्मिक दिशा दिली, सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी एकतेचा पाया रचला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन हा एक प्रश्न आहे- देशासाठी तू काय दिलेस? त्यांनी आयुष्य दिले. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण एकसंघ भारतात श्वास घेतो आहोत. आज जेव्हा आपण विकसित भारत म्हणतो, तेव्हा त्यामागे मुखर्जींचा त्याग आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवणे, हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहे!
भारत माता की जय, वन्दे मातरम् |
 
प्रदिप पाटील
(लेखक भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नाशिक आहेत.)
९९६०४९५३९५




संबंधित मजकूर