भारतीय समाजात असलेली सांस्कृतिक विविधता हे भारताचं सर्वांगीण सामर्थ्य. या विविधतेचा गौरव करणार्या असंख्य कलाकृती वेळोवेळी जन्माला आल्या. मात्र, ज्यावेळी एका कोर्या कॅनव्हासवर आपण या संस्कृतीचं दृश्य रूप अनुभवतो, त्यावेळी या चित्रांच्या अंतरंगात आपल्याला एक वेगळा विचार सापडतो. कधीकधी ही चित्रं आपल्याला शब्दांच्या पलीकडे एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. अशाच पद्धतीची वेगळी अनुभूती देणारे चित्रकार दीपक पाटील यांच्या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन सध्या ‘आर्मी अॅण्ड नेव्ही बिल्डिंग’ येथे दि. ६ जुलैपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चित्रविश्वाचा कॅनव्हास उलगडणारा लेख...
चित्रकला या माध्यमाचं खरं सामर्थ्य याच गोष्टीमध्ये आहे की, चित्रांच्या माध्यमातून आपण आपल्या जगाकडे पुन्हा एकदा नव्याने बघू शकतो. चित्रकला ही केवळ रंगांची उधळण नसते, तर ती मानवी भावना, संस्कृती आणि निसर्गाच्या विविध रूपांना एका चौकटीत जिवंत करणारी संवादाची भाषा असते. प्रख्यात चित्रकार दीपक पाटील यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून नेमकी हीच किमया साधली आहे. त्यांच्या विविध चित्रांचा आस्वाद घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांच्या रेखाटनातील जिवंतपणा आणि भारतीय संस्कृतीच्या विविध छटांना कॅनव्हासवर उतरवण्याची त्यांची अफाट क्षमता. वास्तव आणि अभिव्यक्ती यांच्या सुवर्ण संगमातून त्यांची चित्रं आकाराला येतात आणि एका प्रकारे आपल्याला वास्तवाकडे बघण्याची नवी दृष्टी देतात.
स्त्री आणि संस्कृती विशेषतः ‘लोकसंस्कृती’ हा एक अत्यंत संवेदनशील विषय. ही संवेदना अत्यंत काटेकोरपणे दर्शकापर्यंत पोहोचली पाहिजे, अथवा दिशाभूल करणारी कलाकृती तयार होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर दीपक पाटील यांनी आपल्या कुंचल्यातून ज्या स्त्रियांना रेखाटलं आहे, त्यांमध्ये त्यांच्या परिपूर्णतेचा विचार आपल्याला सहज दिसतो. कपाळावर चांदीचा पारंपरिक दागिना, नाकातून गालापर्यंत जाणारी नथ आणि गळ्यात रंगीत मण्यांचा सुबक हार दिसतो. तिच्या गडद डोळ्यांतील चमक आणि वस्त्रांवरील पिवळ्या-नारिंगी रंगांचे सूक्ष्म काम वास्तववादाच्या जवळ जाणारे आहे. हेच कौशल्य इतर चित्रांमध्येसुद्धा आपल्याला बघायला मिळते. गडद काळ्या पार्श्वभूमीवर एका लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार्या स्त्रीचा हसरा चेहरा रेखाटला आहे. तिच्या डोक्यावर नक्षीदार ओढणी असून, गळ्यात आणि कानांत चांदीचे जड दागिने आहेत. अंधार्या पार्श्वभूमीमुळे केवळ तिच्या चेहर्यावर प्रकाश केंद्रित झाला आहे, ज्यामुळे चेहर्याची ठेवण उठून दिसते.संस्कृतीच्या विविध छटा टिपताना चित्रकाराने मानवी श्रम आणि हस्तकलेच्या सौंदर्यालाही कॅनव्हासवर मांडले आहे. एका चित्रात एक महिला जमिनीवर बसून अत्यंत एकाग्रतेने गोधडी शिवताना दिसते. तिच्या हातातील कापडावर पिवळे, लाल, निळे आणि पांढरे त्रिकोणी व चौकोनी तुकडे जोडून केलेली भौमितिक नक्षी आहे. चित्राच्या खालच्या भागात रंगांचे मोकळे, जाड स्ट्रोस वापरून चित्रकाराने एक अमूर्त बाज आणला आहे. चित्रांच्या तांत्रिक चौकटीपलीकडे जाऊन जर या संपूर्ण कलाकृतींमधून डोकावणार्या संस्कृतीचा विचार केला, तर त्यातून राजस्थानी आणि वाळवंटी लोकजीवनाचा एक अत्यंत समृद्ध आणि अस्सल दस्तऐवज समोर येतो.
निसर्ग आणि वास्तुकलेचा अभ्यास करताना चित्रकाराने प्रकाश आणि सावलीचा अत्यंत अचूक वापर केला आहे. स्थिर भाव टिपण्यासोबतच, गती आणि ऊर्जेचे सादरीकरण हेदेखील पाटील यांच्या शैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य. जोधपूरचा किल्ला आणि किल्ल्याच्या खालचे शहर यांच्यातला चित्रसंवाद लोभसवाणा आहे. त्याचबरोबर सोनेरी किरणांचा जो अविष्कार या चित्रात आपल्याला बघायला मिळतो, तो अवर्णनीय आहे. त्याचबरोबर चित्रकार आपल्याला जैसलमेर, बूंदी गल्ल्यांमधूनसुद्धा फिरवून आणतो. एका बाजूला चित्तोडगडावरचा सूर्यास्त, तर दुसर्या बाजूला वाराणसीच्या घाटावरील सूर्यास्त या माध्यमातून दर्शकाला एक वेगळाच प्रवास घडतो. या चित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या दर्शकाला ज्या पद्धतीने पहिल्यांदाच या सर्व निसर्ग संस्कृतीची अनुभूती प्राप्त होते, अगदी तशीच अनुभूती या चित्रांमधून आपल्याला अनुभवायला मिळते. एका बाजूला आपल्या निसर्ग संस्कृतीच्या भव्यतेचे दर्शन घडवताना, या संस्कृतीचे एक महत्त्वाचे घटक असलेल्या माणसाला चित्रकार विसरत नाही आणि त्याच्यासुद्धा भिन्न-भिन्न प्रतिमा तो साकारतो. वास्तविक, कुठल्याही परिसराला अर्थ प्राप्त होतो, तो तिथल्या माणसांमुळेच. मात्र, त्या परिसराचा अवकाश लक्षात घेता, या भव्य सृष्टीसमोर माणसांचा जगणं अगदीच छोटं भासतं. तरीसुद्धा माणसांना कमी न लेखता, त्यांच्या जीवनातील परस्परपूरक संवाद या चित्रांच्या माध्यमातून घडल्याचे आपल्याला जाणवते. एक खरा रसिक चित्रांकडे केवळ बघत नाही, तर निरखून पाहतो. बघणं आणि निरखून पाहणं, यातला प्रवास दर्शकाला स्वतःहूनच करायचा असतो. मात्र, त्यासाठी पूरक अशा विविध कलाकृतीसुद्धा त्याच्या दृष्टिपथात याव्या लागतात. असं म्हणतात की, डोळ्यांना दिसत असतं, मात्र आपणच ते बघत नाही. ही बघण्याची प्रक्रिया आकलनातून पूर्ण होते. एकदा ही प्रक्रिया लक्षात आली की आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा आपण आपल्या अवतीभोवती अधिक सक्रियपणे गोष्टी बघत राहतो; कारण तो विचार आपल्या जीवनामध्ये उतरलेला असतो. हा प्रवास पूर्णत्वास नेण्यासाठी दीपक पाटील यांच्यासारख्या चित्रकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून साकारलेली अनुभूती रसिकप्रेक्षकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
९९६७८२६९८३