राज्य सहकारी संघाचा निधी सुरु करण्याबाबत महिन्याभरात निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वस्त

सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गौरव

Maharashtra State Cooperative Union Fund
 
मुंबई : (Maharashtra State Cooperative Union Fund) आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरु करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
 
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शनिवार, दि. 4 जुलै रोजी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
 
 
 
या पुरस्कार सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुंबई बँकेचे संचालक व आमदार प्रसाद लाड, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष व आमदार विनय कोरे, आ. परिणय फुके, आ. अभिजित पाटील, आ. चित्रा वाघ, आ. राहुल आवाडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या सहकार क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.(Maharashtra State Cooperative Union Fund)
 
 
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सहकार चळवळ अतिशय जुनी आहे. विशेषतः १२५ वर्षांपूर्वी सहकार क्षेत्राचे मर्म महाराष्ट्राने जाणले व हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार मोठा झाला. आज दोन लाखापेक्षा जास्त वेगवेगळ्या सहकारी संस्था महाराष्ट्रात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पुढे ते म्हणाले, दि. ६ जुलै २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सहकारी चळवळीची ताकद ओळखली व देशात पहिल्यांदा स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार केले. या सहकार मंत्रालयाचे पहिले सहकार मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केले. अमित शहा यांना सहकाराचा पूर्ण अनुभव आहे. राष्ट्रीय सहकार धोरणही जाहीर झाले आहे. या धोरणात पुढील २० वर्षांमध्ये जीडीपीत सहकाराचा हिस्सा ३ पटीने वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचेही ते म्हणाले.(Maharashtra State Cooperative Union Fund)
 
 
 
ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्ष झाली. मोठी उज्वल परंपरा असलेला सहकारी संघ आहे .त्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी उत्तम काम सुरु केले आहे. संघाच्या माध्यमातून सहकाराला नवीन दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सहकाराच्या क्षेत्रात प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत. यासाठी पूर्वी जो शिक्षण निधी मिळायचा तो बंद झाला आहे. तो शिक्षण निधी पुन्हा सुरु झाला पाहिजे. येत्या महिन्याभरात याचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी दरेकरांना आश्वासित केले.(Maharashtra State Cooperative Union Fund)
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या काही सहकारी सोसायट्या आहेत. त्यात ४० ते ४५ टक्के सोसायट्या सहकारी गृहनिर्माण आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्था हा सर्वात उपेक्षित घटक होता. पण प्रवीण दरेकरांच्या पाठपुराव्यामुळे सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळा चॅप्टर तयार करण्यात आला. ४०० चौरस फुटात राहणारा माणूस एक हजार चौरस फुटात राहायला गेला. हे स्वयंपुनर्विकासाने घडवून दाखवले. या योजनेमुळे मुंबईतील मराठी माणसाचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होते आहे.
 
 
 
तत्पूर्वी प्रस्तावित सादर करताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ १०७ वर्षांपूर्वी स्थापन झाला आहे. मध्यंतरीच्या काळात संघाचे कामकाज ठप्प झालेले. संघाला उर्जितावस्था दिली पाहिजे यासाठी त्याचे नेतृत्व सहकारातील लोकांनी मला दिले. मुख्यमंत्र्यांचे प्रेम, पाठबळ माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. स्वयं पुनर्विकास योजनेला मुख्यमंत्र्यांनी ताकद दिली.(Maharashtra State Cooperative Union Fund)
  
पुरस्कार्थी
 
यामध्ये सहकार महर्षी पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना तर सहकार भूषण पुरस्कार आमदार विनय कोरे, सहकार रत्न पुरस्कार डॉ. रेवती पटवर्धन, सहकार गौरव पुरस्कार दीपक पटवर्धन, सहकार महिला शक्ती पुरस्कार शोभा सावंत, सहकार विभूषण पुरस्कार शिवाजीराव नलावडे, सहकार प्रेरणा पुरस्कार शहाजी पाटील व राजेश लवेकर, सहकार नवोल्लेष पुरस्कार सिद्धार्थ कांबळे, प्रकाश दरेकर व श्रीकांत कवठणकर, सहकार ग्रामविकास पुरस्कार डॉ. नामदेव उसेंडी, सहकार उत्कृष्ट बँकिंग पुरस्कार राजेंद्र सरकाले, सहकार कृषी रत्न पुरस्कार संजय सुनिल, दिलीप पाटील व सचिन देशमुख, दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार विजय काळे व गोकुळ राजपूत, सहकार समाजसेवा पुरस्कार चंद्रकांत पाटील, सहकार नेतृत्व पुरस्कार अशोक जगताप, आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार व्ही. जी. पवार (ज्ञानदीप पतसंस्था), सहकार उद्योग पुरस्कार ऑलवे वसईकर, सहकार परिवर्तन पुरस्कार दशरथ घनवट आणि युवा व ग्राहक पुरस्काराने रोहित निकम व विठ्ठलराव भोसले यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.(Maharashtra State Cooperative Union Fund)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर