मुंबई : (Bhandup Road Cave-In) मुसळधार पावसामुळे शनिवारी भांडूप पश्चिमेतील सोनापूर जंक्शन, एलबीएस मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या जागेलगत मुख्य रस्ता अचानक खचल्याने मोठी दुर्घटना घडली. रस्ता खचल्यामुळे तेथे उभा असलेला ट्रक थेट खड्ड्यात कोसळला, तर दोन झाडेही उन्मळून पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली.
ही घटना सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. आणखी रस्ता खचण्याचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात तातडीने बॅरिकेडिंग करण्यात आले असून नागरिकांना त्या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खचलेल्या रस्त्याचा भाग हटविणे, ट्रक बाहेर काढणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्यालगत एका खासगी विकासकाकडून इमारतीच्या पायाभरणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आला होता. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मातीचा आधार निखळून फुटपाथसह रस्त्याचा मोठा भाग खचला. या दुर्घटनेत सवरक्षक लोखंडी पत्रेही खाली कोसळले.(Bhandup Road Cave-In)
घटनास्थळाजवळ नाला असल्याने मुसळधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढला आणि ओलसर झालेली माती खचल्याने हा प्रकार घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच नालेसफाई आणि परिसरातील विकासकामांवर मोठा खर्च होत असतानाही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला.(Bhandup Road Cave-In)
दरम्यान, संबंधित बांधकाम कोणत्या विकासकाकडून सुरू होते, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि रस्ता खचण्यास नेमके कोण जबाबदार आहे, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.(Bhandup Road Cave-In)