विरोधकांकडून मुद्दाम संदर्भ तोडून माझ्यावर निशाणा

पारदर्शक प्रशासनासाठी आम्ही कटिबद्ध : आमदार अमीत साटम

    04-Jul-2026
 
Amit Satam Statement
 
मुंबई : (Amit Satam Statement)  विरोधी पक्षाकडून माझ्या वक्तव्याचा संदर्भ तोडून चुकीचा अर्थ लावण्याचा आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी केला. संबंधित घटनेबाबत आपण यापूर्वीच स्पष्टीकरण दिले असून, त्यावर पुन्हा प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, मुंबईत शनिवार, दि.४ जुलै रोजी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आमदार अमित साटम यांनी स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील विविध बाधित ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
आमदार साटम म्हणाले की, "विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचे संदर्भविहीन सादरीकरण करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अशा घटनांकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करत नाही. संबंधित प्रकरणात मी तत्काळ आवाज उठवला आणि अवघ्या दोन दिवसांत मुंबई महापालिकेतील सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे आम्ही केवळ सोशल मीडियावर पोस्ट किंवा निवेदने देणारे नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे आहोत."(Amit Satam Statement)
 
मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, "मुंबईतील नागरिकांना अडचण येत असताना आम्ही घरात बसत नाही. मुंबईच्या महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करत आहेत आणि आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे."(Amit Satam Statement)
 
भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी विरोधकांवर राजकीय हेतूने लक्ष्य केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, "मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील वर्षानुवर्षे सुरू असलेले 'अंडरस्टँडिंग' आम्ही गेल्या चार महिन्यांत बंद केले आहे. दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ते पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र, मुंबई महापालिका पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याच्या भूमिकेमुळे आम्ही ती मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली."(Amit Satam Statement)
 
"स्थायी समितीतील जुनी व्यवस्था बंद झाल्याने आणि काही मोजक्या अधिकाऱ्यांमार्फत चालणाऱ्या पद्धतीला आळा बसल्यामुळे काही जणांचा राग अनावर झाला आहे. त्यामुळेच मला लक्ष्य केले जात आहे. मात्र, अशा राजकीय दबावाला किंवा टीकेला आम्ही घाबरणार नाही," असेही साटम यांनी ठामपणे सांगितले. मुंबईकरांना पारदर्शक, उत्तरदायी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी भाजप कटिबद्ध असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Amit Satam Statement)
 
 




संबंधित मजकूर