मुंबई : (Bhaurao Belwalkar Road Naming) कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली क्रॉस रोड क्रमांक ३ या मार्गाला शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कार्यकर्ते स्व. पुरुषोत्तम रामचंद्र तथा भाऊराव बेलवलकर यांचे नाव देण्यात आले. पायोनियर शाळेत संपन्न झालेल्या या नामकरण सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह तथा सध्याचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भैय्याजी जोशी उद्बोधन करताना म्हणाले की, मला संघ समजला तो भाऊरावांसारख्या जीवनामुळे. संघ जगणारे लोक आहेत म्हणून लोकांना संघ समजतोय. संघाच्या या खडतर मार्गाने जाताना भाऊरावांना मी कधीही रागावलेले पाहिलेले नाही, असे त्यांचे आदर्श जीवन होते. संघात पद, प्रसिद्धी काही मिळणार नाही हे माहित असूनही हजारो निःस्वार्थी, समर्पित आणि ध्येयवेडी माणसे संघकार्यात झोकून देतात. त्यांचे नेतृत्व करणारे भाऊराव होते. ही संघ गंगोत्री आता कुणीही थांबवू शकत नाही. भाऊरावांचे जीवन म्हणजे समर्पित संघकार्याच्या माध्यमातून भारतमातेची अखंड केलेली साधना आहे.
अतुल भातखळकर याप्रसंगी म्हणाले की, आमदार म्हणून अनेक विकासकामे केली, मात्र योग्य व्यक्तीचे नाव योग्य मार्गाला देण्याचे समाधान या निर्णयामुळे मिळाले. काही वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मांडला तेव्हा अनेकांनी 'भाऊराव बेलवलकर कोण?' असा प्रश्न विचारला होता. आयुष्यभर संघकार्य करूनही प्रसिद्धीपासून दूर राहणे, हीच त्यांच्या स्वयंसेवक जीवनाची खरी पोचपावती होती असेही त्यांनी नमूद केले.(Bhaurao Belwalkar Road Naming)
भाऊरावांचे जेष्ठ सुपुत्र रामचंद्र बेलवलकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक असून आज खऱ्या अर्थाने संघ तपस्वी असलेल्या भाऊरावांचा जीवन गौरव यानिमित्ताने होत आहे. मुंबई महानगराचे प्रचारक शिवरामपंत जोगळेकर यांच्याशी त्यांचा दृढ परिचय झाला आणि ते संघमय झाले. संघकार्याबरोबरच त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही अत्यंत समर्थपणे पार पाडल्या होत्या. कबड्डी, हुतूतू, बिलियर्ड्स आणि कॅरम या खेळांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते असेही ते म्हणाले.
नामकरण सोहळ्याची सुरवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भाऊरावांच्या व्यक्तित्वाचा परिचय चंद्रशेखर वझे यांनी तर आभार प्रदर्शन रामकृष्ण बेलवलकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गायनाने झाली.(Bhaurao Belwalkar Road Naming)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक