मुंबई : (Mumbai University LLB Zero Marks) मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी विद्यापीठ प्रशासनावर नाराजी व्यक्त करत बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
"विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका. शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेलाच द्या," अशा शब्दांत आमदार तांबे यांनी भूमिका मांडली.(Mumbai University LLB Zero Marks)
पुनर्तपासणीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्तपासणीसाठी वेळ, पैसे आणि मानसिक ताकद असतेच असे नाही. त्यामुळे चुकीच्या निकालामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Mumbai University LLB Zero Marks)
गेल्या काही दिवसांपासून होणारी पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील त्रुटी आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे सांगत, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि परीक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र आणि पारदर्शक ऑडिट करण्यात यावे, त्याचबरोबर या संपूर्ण यंत्रणेतील त्रुटी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा हलगर्जीपणाचा खेळ पुन्हा होणार नाही, यासाठी सक्षम आणि जबाबदार परीक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.(Mumbai University LLB Zero Marks)