मुंबई : (Tulja Bhavani Temple Land Scam) लाखो हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशीवच्या जिल्हाधिकार्यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी याबाबत निवेदन दिले होते. तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर म्हणजेच सुमारे ४ हजार १२१.१४ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही. असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे.(Tulja Bhavani Temple Land Scam)
न्यासाला अंधारात ठेवून खाजगी व्यक्तींच्या नावे जमीन
श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आल्याचा आरोप आहे.(Tulja Bhavani Temple Land Scam)
संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावे
"या प्रकरणात बेकायदेशीर हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित मोठ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, अशी महासंघाची मागणी आहे. शासनाने विशेष अधिकारांचा वापर करून सर्व अनधिकृत खरेदीखते आणि ७/१२ वरील नोंदी तत्काळ रद्द कराव्यात आणि पूर्ण १ हजार ६६६.१४ हेक्टर जमीन पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घ्यावी, अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत."(Tulja Bhavani Temple Land Scam)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....