मुंबई : (Asiatic Society Elections) मतदार यादीतील गोंधळामुळे, मागची अनेक महिने रेंगाळलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक अखेर ४ जुलै रोजी संपन्न होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार दि. ४ जुलै रोजी होऊ घातलेल्या एशियाटिक सोसायटी च्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टूमारो पॅनल ला पाठिंबा देणारे पत्रक महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध ३० नामवंत मंडळींनी एकत्रित येऊन प्रकाशित केले आहे.
एशियाटिक सोसायटीला तिच्या विद्यमान दूरवस्थेतून बाहेर काढण्याची आणि तिला नवसंजीवनी मिळवून देण्याची क्षमता केवळ एशियाटिक टूमॉरो मध्येच असल्याने एशियाटिक सोसायटीच्या मतदारांनी या पॅनेलच्या समर्थनार्थ मतदान करावे असे आवाहन या सर्व मंडळींनी केले आहे. या आवाहनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संस्कृत आणि प्राच्यविद्येच्या तज्ज्ञ -अभ्यासक डॉ सिंधू डांगे, माजी केंद्रीयमंत्री आणि अर्थतज्ञ सुरेश प्रभू, मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञ गो बा देगलूरकर आणि ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, प्रसिद्ध लेखक अमिष त्रिपाठी, ज्येष्ठ दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे विश्वस्त आणि माजी खासदार प्रदीप रावत, चित्रकार सुहास बहुळकर, अभिनेते मनोज जोशी गोशी इत्यादींचा यामध्ये समावेश आहे.
मागच्या काही काळापासून सदर निवडणूक स्थगित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने नव्याने दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. निवडणूक कार्यक्रमाच्या या टप्प्यावर हस्तक्षेप करण्यासारखे हे प्रकरण नाही, त्यामुळे याचिका फेटाळत असल्याचे निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या संदर्भात आपली प्रतिक्रीया देताना ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे म्हणाले की " १८०४ पासून सुरु असलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये ज्ञानाचं भांडार लोकांसाठी उपलब्ध आहे. मात्र या विपुल ज्ञानसाठ्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. येणाऱ्या काळात, ज्या माणसांनी परिवर्तनाचा विचार मांडला आहे, त्यांनी हे सर्व साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा प्रयत्न न करणारी लब्धप्रतिष्ठीत, हस्तीदंती मनोऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसांमुळे आज संस्था लोकांपासून दूर गेली आहे. एशियाटिकच्या समृद्ध वारश्याचा अनुभव सर्वांपर्यंत जायला हवा"
एशियाटिकसाठी मतदान कसे कराल?
एशियाटिक सोसायटी संस्थेच्या सभासदांनाच मतदानाचा अधिकार आहे.
सभासद सदस्यांनी आपले मूळ ओळखपत्र सोबत आणण्यास बंधनकारक आहे.
मतदाराने संस्थेच्या मंजूर नियम व नियमावली नुसार आणि दि. ०३/१०/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अध्यक्ष पदासाठी ( पांढरी मतपत्रिका - १ मत), उपाध्यक्ष पदासाठी (हिरवी मतपत्रिका - ४ मते) मानद सचिव पदासाठी ( निळी मतपत्रिका - १ मत), कार्यकारी मंडळाच्या पदासाठी (गुलाबी मतपत्रिका - ६ मते), पडताळणी समिती सदस्यपदासाठी (पिवळी मतपत्रिका - ७ मते) इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावासमोरील चौकटीमध्ये X अशी खुण करुन आपले मतदान नोंदविणे अपेक्षित आहे.