हिंदू-शीख ऐक्यासाठी 'सांझीवालता' अभियानाची घोषणा

    03-Jul-2026   
 
Sanjhiwalta Campaign
 
मुंबई : (Sanjhiwalta Campaign) कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी पंजाबविषयी महत्त्वपूर्ण संदेश देताना, पंजाबची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा असे प्रतिपादन केले. हिंदू-शीख ऐक्य अधिक बळकट करण्यासाठी तसेच पंजाबच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या संवर्धनासाठी त्यांनी 'सांझीवालता' अभियानाची सुरुवात केली. यावेळी पंजाबमध्ये मंदिर उभारणी, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नव्या ट्रस्टची स्थापना आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. या अभियानाला समाजातील विविध घटक आणि उद्योगजगताने सहकार्य करावे, असे आवाहन शंकराचार्यांनी केले. 
 
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले की, पंजाब हे केवळ सीमावर्ती राज्य नसून भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. हिंदू आणि शीख समाज एकाच सांस्कृतिक वारशाने जोडलेले असून हे नाते अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे. त्याच उद्देशाने 'कांची कामकोटी पंजाबी धर्मशाळा धर्मविद्या ट्रस्ट' स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.(Sanjhiwalta Campaign)
 
या ट्रस्टच्या माध्यमातून पंजाबमधील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन मंदिरांची उभारणी, गणेश मंदिर, धर्मशाळा तसेच संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मंदिरनिर्मिती आणि धार्मिक संस्थांच्या बळकटीकरणासाठी उद्योगपती, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.(Sanjhiwalta Campaign)
 
शंकराचार्य पुढे म्हणाले की, मंदिरे ही केवळ उपासनेची स्थळे नसून समाजाला एकत्र आणणारी सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रे आहेत. धार्मिक परिवर्तनाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी अशा आव्हानांना सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर देण्याची गरज व्यक्त केली. देशभरातील मंदिरांचे पुनरुज्जीवन, वैदिक शिक्षणाचा प्रसार आणि धार्मिक संस्थांचे सक्षमीकरण करण्याच्या व्यापक योजनेचाही त्यांनी उल्लेख केला.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशात वैदिक शिक्षणासाठी १८ कोटी रुपयांची मदत दिली जात असून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासह आंध्र प्रदेशात हजारो लहान मंदिरांच्या उभारणीचे नियोजन सुरू आहे. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून भारताचा आध्यात्मिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Sanjhiwalta Campaign)
 
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, विविध उद्योगपती तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Sanjhiwalta Campaign)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर