चिपळूणात दुर्मिळ पांढऱ्या मुंगुसाचे दर्शन

    03-Jul-2026

मुंबई (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मुंगुसाचे दर्शन झाले आहे (white-coloured mongoose). स्थानिक नागरिकांनी या मुंगुसाचे छायाचित्र आणि व्हिडिओ टिपले असून त्याची माहिती वन विभागालाही देण्यात आली आहे. (white-coloured mongoose)
 
 
सामान्यतः भारतीय राखाडी मुंगूस किंवा लहान भारतीय मुंगूस यांचा रंग करडा अथवा तपकिरी असतो. मात्र चिपळूणात दिसलेला मुंगूस संपूर्ण पांढऱ्या रंगाचा असल्याने तो अत्यंत वेगळा भासत आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, हा रंग ल्युसिझम (Leucism) किंवा काही प्रकरणांमध्ये अल्बिनिझम (Albinism) या दुर्मीळ आनुवंशिक स्थितींमुळे आढळू शकतो.अल्बिनिझममध्ये शरीरातील मेलेनिन रंगद्रव्य पूर्णपणे नसल्यामुळे प्राण्याचे केस, त्वचा आणि डोळेही फिकट किंवा लालसर दिसतात. तर ल्युसिझममध्ये शरीरावरील केस किंवा त्वचेतील रंगद्रव्य कमी असते; मात्र डोळ्यांचा नैसर्गिक रंग कायम राहतो. त्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय हा मुंगूस नेमका अल्बिनो आहे की ल्युसिस्टिक, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
 
 
अशा रंगातील प्राणी नैसर्गिक अधिवासात तुलनेने अधिक असुरक्षित असतात. त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते सहज नजरेस पडतात. परिणामी शिकारी प्राण्यांपासून बचाव करणे, भक्ष्याची शिकार करणे आणि परिसरात मिसळून राहणे त्यांच्यासाठी अधिक कठीण ठरू शकते. त्यामुळे अशा प्राण्यांचे जंगलात दीर्घकाळ टिकून राहणे आव्हानात्मक मानले जाते. मुंगूस हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. तो उंदीर, साप, सरडे, कीटक आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करून परिसंस्थेतील अन्नसाखळीचे संतुलन राखण्यास मदत करतो. त्यामुळे या दुर्मीळ मुंगुसाचे दर्शन जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. चिपळूण परिसरातील या दुर्मीळ पांढऱ्या मुंगुसाच्या नोंदीमुळे कोकणातील वन्यजीव वैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





संबंधित मजकूर