मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुणे शहरालगतच्या बावधन-भुगाव-भुकूम परिसरातील टेकड्यांवर अत्यंत दुर्मिळ आणि लाजाळू स्वभावाच्या चौशिंगा या हरिणाचे दर्शन घडले आहे (Pune hills). पुण्यातील वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि वन्यजीवप्रेमी छायाचित्रकार रोहित खरे यांना हा दुर्मिळ प्राणी प्रत्यक्ष दिसला (Pune's hills). रोहित खरे यांनी प्रसंगावधान राखत चौशिंग्याची स्पष्ट छायाचित्रे टिपल्याने या नोंदीला भक्कम छायाचित्रात्मक पुरावा प्राप्त झाला आहे (Pune hills). पुणे शहराच्या अगदी जवळ चौशिंग्याचे अस्तित्व सिद्ध होणे ही केवळ एक वन्यजीव नोंद नसून, शहराच्या उर्वरित नैसर्गिक अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारी घटना मानली जात आहे. (Pune hills)
चौशिंगा हा जगातील एकमेव असा हरिणवर्गीय प्राणी आहे ज्यामध्ये प्रौढ नराला चार शिंगे असतात. अत्यंत लाजाळू असल्याने तो बहुतांश वेळा एकटाच किंवा जोडीने आढळतो.पुणे परिसरात यापूर्वी चौशिंग्याच्या नोंदी प्रामुख्याने सिंहगड, राजगड आणि कात्रज परिसरापुरत्याच मर्यादित होत्या. शहरालगतच्या बावधन-भुगाव-भुकूम टेकड्यांमध्ये त्याची प्रत्यक्ष छायाचित्रांसह झालेली नोंद ही अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, चौशिंगा आणि परिसरातील इतर वन्यजीव बावधन-भुगाव-भुकूम हिल कॉरिडॉर या नैसर्गिक टेकडीमार्गाचा वापर भ्रमणमार्ग म्हणून करतात. या टेकड्या पश्चिमेकडील डोंगररांगांना शहरातील इतर नैसर्गिक अधिवासांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरत आहेत.
बावधन-भुगाव-भुकूम टेकड्यांवर चौशिंग्याचे पुन्हा छायाचित्रात्मक पुरावे मिळाल्याने पुणे परिसरात या दुर्मिळ प्राण्याची लोकसंख्या अद्याप अस्तित्वात असल्याची आशा निर्माण झाली आहे. वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि त्यांची टीम या परिसरात नियमित वैज्ञानिक सर्वेक्षण आणि कॅमेरा ट्रॅपद्वारे निरीक्षण आणि अधिवास मूल्यांकन करत आहे. त्यामुळेच चौशिंग्यासह इतर दुर्मिळ सस्तन प्राण्यांच्या अधिवासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.
पूर्वीच्या नोंदी
वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, महात्मा टेकडी तसेच एनडीए-भुगाव-भुकूम परिसरातील टेकड्या या आजही पुण्यातील अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे शेवटचे नैसर्गिक आश्रयस्थान मानल्या जातात. ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक संजीव नलावडे आणि डॉ. आशिष नेर्लेकर यांनी त्यांच्या Retreating Mammals of Pune तसेच Faunal Biodiversity of Fergusson College Hill या वैज्ञानिक अभ्यासांमध्ये पूर्वी वेताळ टेकडीवर चौशिंगा आणि भेकर (Barking Deer) दोन्ही आढळत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे वेताळ टेकडीवरील चौशिंगा कालांतराने नामशेष झाला असून सध्या तेथे प्रामुख्याने भेकराचेच अस्तित्व उरल्याचे या अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे.
कॉरिडॉरच्या संवर्धनाची गरज
बावधन-भुगाव-भुकूम हिल कॉरिडॉर हा पुणे शहरातील उरलेला अत्यंत महत्त्वाचा शहरी नैसर्गिक अधिवास आहे. या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन विकास आराखड्यांमध्ये वन्यजीव मार्गांचे संरक्षण, टेकड्यांवरील अनियंत्रित बांधकामांवर नियंत्रण, नैसर्गिक वनस्पतींचे संवर्धन आणि नियमित जैवविविधता सर्वेक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. चौशिंग्याचे हे पुनर्दर्शन केवळ एका दुर्मिळ प्राण्याच्या अस्तित्वाची नोंद नसून, पुण्याच्या उर्वरित टेकड्या अजूनही समृद्ध जैवविविधतेचे आश्रयस्थान असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी घटना ठरत आहे. - अर्णव गंधे, वन्यजीव अभ्यासक