ना‘राज’ ठाकरे अस्वस्थ

    03-Jul-2026
 
Raj Thackeray And Aaditya Thackeray
 
अस्वस्थ असलेले ना‘राज’ ठाकरे सध्या समाजमाध्यमांद्वारे आणि मुख्य माध्यमांतही व्यक्त होत आहेत. मुळात एखाद्या नेत्याचे अस्वस्थ होणे आपण समजूही शकतो. जेव्हा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण, आपल्या पक्षाच्या अधोगतीची उत्तरे शोधण्यापेक्षा इतरांना प्रश्न विचारायचे, असे सध्या राज ठाकरेंच्या बाबतीत घडताना दिसते.
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा वापरूनदेखील यश का मिळत नाही, याची कारणमीमांसा आवश्यकच. कारण, जनसंपर्क न वाढवता, फक्त माध्यमांसमोर व्यक्त होणे म्हणजे राजकीय नेतृत्व नव्हे. त्यासाठी स्वतः लोकांच्या संपर्कात राहावे लागते, मुंबई-पुण्याच्या पलीकडे राज्यभर दौरे करावे लागतात, या बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या शिकवणीचा सध्या दोन्ही ठाकरे बंधूंना विसर पडलेला दिसतो. उद्धव ठाकरेही विदर्भ दौर्‍यावर नुकतेच जाऊन आले. पण, तोही खासदारफुटीनंतर झालेला साक्षात्कारच!
 
मुळात आपल्या पक्षात एखादा कार्यकर्ता-नेता आला, तर तो स्वच्छ आणि दुसर्‍या पक्षात गेला; तर ते गलिच्छ राजकारण, हे राज ठाकरेंचे सोयीस्कर तत्वज्ञान. पण, हे करीत असताना स्वतः तेच शिवसेनेतून बाहेर पडले होते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. मग त्यालाही कुणी ‘गलिच्छ राजकारण’ म्हणावे का? मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवकही उद्धव ठाकरेंनी फोडले होते, ते कसले राजकारण होते? शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबतच्या राजकारणाला मग काय नाव द्यावे? काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि पुन्हा त्याच काँग्रेससोबत अनेक वेळा त्यांनी आघाडीही केली. काँग्रेसमधील मतभेदांमुळे खुद्द इंदिरा गांधी यांनी ‘इंदिरा काँग्रेस’ स्थापन केली होती. इंदिरा गांधी आणि ‘सिंडिकेट’मधील संघर्ष सर्वश्रुतच. अशी काँग्रेसचीच कितीतरी शकले पडली. आताही ज्या ‘एसआयआर’वरून तृणमूल काँग्रेसचा पुळका राज ठाकरेंना आला होता, ती तृणमूल काँग्रेससुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेला एक पक्ष. मग तेव्हाचे राजकारण गलिच्छ नव्हते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकतील का? त्यामुळे राज ठाकरेंनी उबाठाच्या पक्षफुटीतून धडे घेऊन आता स्वपक्षीयांकडेच लक्ष दिलेले बरे!
 
‘युवराजां’चे अज्ञान
 
दिल्लीतील काँग्रेसचे युवराज आपले अज्ञान सातत्याने पाजळत असतात. आता ‘मातोश्री’च्या युवराजांनाही तीच सवय लागलेली दिसते. वरळीतील आपले जवळचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यापासून तर आदित्य ठाकरेंना काय बोलावे, हेच सुचेनासे झाले आहे. कारण, आदित्य ठाकरे वरळीत निवडून आले तेच मुळी सचिन अहिर यांच्या जीवावर. आता भविष्यात वरळीही जिंकणे अवघड ठरेल, या भीतीतूनच आता ‘ऑपरेशन टायगर’ला ते ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ म्हणत आहेत. ‘दिल्लीतील भाजपचे नेते हे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमकुवत करत आहेत,’ असे सांगताना उबाठाच किती खिळखिळा झाला आहे, याचे युवराजांनी आत्मपरीक्षण करावे. फडणवीस हे पक्षशिस्तीत आणि संयमाने काम करणारे नेते. म्हणूनच, तर त्यांनी पक्षआदेशावर उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारले होते. पण, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेला ‘कमबॅक’ आदित्य ठाकरे विसरले आहेत, असे वाटते.
 
‘जे नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांचे झाले, ते फडणवीसांचे होईल,’ असे युवराजांनी वर्तविलेले भाकीत हे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे आणि अज्ञानाचेच लक्षण म्हणावे लागेल.कारण, युवराज हे विसरतात की, नितीन गडकरी असोत वा शिवराज सिंह चौहान, या दोन्ही नेत्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीचे सोनेच केले. पण, मुळात ज्यांना महाराष्ट्राचेच राजकारण अजून कळलेले नाही, ज्यांना आपलाच पक्ष, आपलेच आमदार टिकवता आले नाही, त्यांनी दिल्लीच्या राजकारणावर काहीबाही भाष्य करणे म्हणजे निव्वळ बाष्कळपणाच!
 
तसेच काल माध्यमांशी बोलताना युवराज म्हणाले की, ‘मुंबईतील पावसाळ्यात होणार्‍या दुरवस्थेस भाजपच जबाबदार आहे.’ पण, मुंबई महापालिका ‘मातोश्री’च्या ताब्यात असताना, नालेसफाई आणि मुंबईची ‘तुंबई’ होत नव्हती का? तेव्हा किती दोषी अधिकार्‍यांवर तत्काळ जबाबदारी निश्चित करुन कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता? याची युवराजांनी आधी उत्तरे द्यावी. त्यामुळे युवराजांनी दिल्लीच्या तर नाहीच, आता मुंबईच्या चिंतेतही खरं तर वेळ दवडू नये. आज अहिरांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे, उद्या आणखीन कुणी जवळचाच साथ सोडेल. तेव्हा युवराजांनी आता स्वपक्षाची चिंता केली तरी पुरे!
 
अभिनंदन परुळेकर 




संबंधित मजकूर