अमरनाथ यात्रेकरूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र! सुरक्षेसह "या" ५ संकल्पांचे पालन करण्याचे केले आवाहन

    03-Jul-2026   
PM Narendra Modi Amarnath Yatra Letter
 
मुंबई : (PM Narendra Modi Amarnath Yatra Letter) जम्मू-कश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शिवभक्तांना आणि यात्रेकरूंना पत्र लिहून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा बर्फानींचे दर्शन हा भाविकांच्या जीवनातील एक अत्यंत शुभ आणि अविस्मरणीय अनुभव असतो, असे सांगत पंतप्रधानांनी यात्रेकरूंना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आत्मनिर्भर भारत आणि पर्यावरण संवर्धनासाठी यात्रेदरम्यान पाच महत्त्वाचे संकल्प घेण्याचे विशेष आवाहनही त्यांनी केले आहे.
 
पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अमरनाथ यात्रा ही भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा एक शाश्वत अध्याय आहे. संपूर्ण जगातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या परंपरा पाळणारे भाविक महादेव दर्शनाचा एकच संकल्प घेऊन येथे एकत्र येतात. ही यात्रा म्हणजे भारताच्या 'विविधतेत एकता' या वैशिष्ट्याचे जिवंत रूप आहे. गेल्या अनेक दशकांपासून श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड आणि जम्मू-कश्मीर प्रशासन अत्यंत कौशल्याने या यात्रेचे व्यवस्थापन करत आहे. यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय सेना, सीआरपीएफ, जम्मू-कश्मीर पोलीस, आयटीबीपी, बीएसएफ, एनडीआरएफ या दलांसह आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर, कर्मचारी, स्वच्छता मित्र आणि लंगर चालवणाऱ्या सेवाभावी संस्थांचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांचा आतिथ्यभाव आणि भक्तांचा समर्पण भाव ही आपल्या सनातन संस्कृतीची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.(PM Narendra Modi Amarnath Yatra Letter)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपल्या जीवनात आणि यात्रेदरम्यान पाच संकल्पांचे पालन करण्याचे आवाहन केले. पहिले संपूर्ण यात्रा मार्गावर स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात आपले योगदान द्यावे. दुसरे प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे, वाहतूक नियमांचे आणि सुरक्षा निर्देशांचे पूर्ण निष्ठेने पालन करावे. पर्वतीय भागात पाऊस, थंडी आणि घसरड्या रस्त्यांची विशेष काळजी घ्यावी.(PM Narendra Modi Amarnath Yatra Letter)
 
तिसरे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी यात्रेच्या एकूण खर्चाच्या किमान १० टक्के खर्च जम्मू-कश्मीरमधील स्थानिक उत्पादने आणि वस्तू खरेदी करण्यासाठी करावा. ज्यामुळे तेथील तरुणांना रोजगार मिळेल. चौथे, अमरनाथ यात्रेचा समारोप रक्षाबंधनाला होतो. या पवित्र दिवशी आपल्या बहिणीला किंवा भावाला एक रोपटे (झाड) भेट द्यावे आणि 'एक पेड़ माँ के नाम' या पर्यावरण मोहिमेला पुढे न्यावे. पाचवे 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने वर्षभर आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत आणि 'विकसित भारत' निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे.(PM Narendra Modi Amarnath Yatra Letter)
 
"बाबा अमरनाथ यांची असीम कृपा आपल्या सर्वांवर राहो. ही यात्रा सुरक्षित, मंगलमय होवो आणि यातून आपल्या जीवनात नवीन ऊर्जा व आध्यात्मिक शक्तीचा संचार होवो," अशा शब्दांत पंतप्रधानांनी पत्राचा समारोप करत भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
अमरनाथ यात्रेत भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग
 
अशी माहिती आहे की, बालटाल मार्गासाठी १,७३५ भाविक पहाटे ३.१३ वाजता रवाना झाले, तर पहलगाम मार्गाने जाणारे २,१३० भाविक सकाळी ३.३८ वाजता निघाले. अशा प्रकारे या दोन्ही ताफ्यांमधील भाविकांची एकूण संख्या ३,८६५ इतकी आहे. या ताफ्यात २,९६५ पुरुष, ६१८ महिला, २३० साधू, ४८ साध्वी आणि चार बालकांचा समावेश आहे. हे भाविक एकूण २०१ वाहनांमधून प्रवास करत असून त्यामध्ये ८३ बस, १४ मध्यम क्षमतेची मोटार वाहने आणि १०४ हलकी मोटार वाहने आहेत. बालटालकडे जाणाऱ्या ताफ्यात ११५ वाहनांचा, तर पहलगाम तळ छावणीकडे जाणाऱ्या ताफ्यात ८६ वाहनांचा समावेश आहे. यात्रेच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल तसेच इतर सुरक्षा यंत्रणांचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यंदाची श्री अमरनाथ यात्रा ५७ दिवस चालणार असून तिची सांगता २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. शुक्रवारी दुसरा ताफा रवाना झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत जम्मूतील भगवती नगर यात्री निवासातून एकूण ८,६८७ भाविक वार्षिक श्री अमरनाथ यात्रेसाठी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाले आहेत.(PM Narendra Modi Amarnath Yatra Letter)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर