मुंबईत पावसाचा जोर: ९१ ठिकाणी झाडे पडली, ९ शॉर्टसर्किट, ४ घरे बाधित; आठ जण जखमी

    03-Jul-2026
Mumbai Heavy Rain
 
मुंबई : (Mumbai Heavy Rain) गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात झाडे पडणे, शॉर्टसर्किट होणे तसेच घरांच्या भिंती किंवा इमारतींचे काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र, रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती.
 
गेल्या २४ तासांत कुलाबा येथे १५८ मिमी तर सांताक्रूझ येथे २०५ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १५.६ मिमी आणि सांताक्रूझ येथे १७.४ मिमी पाऊस झाला. बीएमसीच्या स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रांनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात २३ मिमी, पूर्व उपनगरांत २८ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ३२ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये सतत पावसासह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.(Mumbai Heavy Rain)
 
बीएमसीला शहरात १३, पूर्व उपनगरांत २२ आणि पश्चिम उपनगरांत ५६, अशा एकूण ९१ ठिकाणी झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. संबंधित विभागांनी तातडीने झाडे व फांद्या हटविण्याचे काम केले.
सांताक्रूझ पश्चिम येथील राहत रोडवरील एका खासगी इमारतीच्या आवारात पडलेल्या झाडाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर शेजारील आणखी एक झाड कोसळले. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शहरात ९ ठिकाणी शॉर्टसर्किट तर ४ ठिकाणी भिंत किंवा घराचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या.(Mumbai Heavy Rain)
 
तलावांमध्ये वाढू लागला पाणीसाठा
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सातही तलावांमध्ये ११,७५,३३२ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला असून तो एकूण क्षमतेच्या ८.४८ टक्के आहे. बुधवारी हा साठा १०,३८,८७१ दशलक्ष लिटर (७.१८ टक्के) होता.
 
सततच्या पावसामुळे जलाशयांमधील पाणीसाठा वाढू लागला असून, ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक मानली जात आहे.(Mumbai Heavy Rain)
 
 




संबंधित मजकूर