भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समितीचा विचार - मंत्री उदय सामंत; मुंबईत तीन निवारा केंद्र सुरु करणार

    03-Jul-2026   
 
Maharashtra Stray Dog Control Committee
 
मुंबई : (Maharashtra Stray Dog Control Committee) राज्यातील प्रत्येक महापालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी समिती तयार करण्याचा विचार करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आ. मुरजी पटेल यांनी केलेल्या मुंबई महापालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या मागणीवर ते बोलत होते.
 
राज्यात भटक्या कुत्र्यांचा वाढत असलेला उपद्रव आणि त्यामुळे जात असलेले बळी यावर आ. अर्जुन खोतकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले, नागरिकांचा मृत्यू तसेच मनपाच्या निष्क्रीयतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही, नगरपालिका आणि मनपाचे प्रशासन झोपले आहे. जालना जिल्ह्यात एका ७ वर्षांच्या मुलीला तिच्या आईवडीलांसमोर कुत्र्याने उचलून नेत मारून टाकले. पोलिसही कुत्र्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित नाही. गेल्या १५ दिवसांत ९३ लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला असून रस्त्यांवर आता कुत्र्यांची दहशत आहे. या सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी केला जाईल? तसेच या कुत्र्यांचे निर्बीजीकरण किंवा त्यांना निवाऱ्यामध्ये ठेवण्यासंदर्भात महापालिकेला सरकारच्या वतीने निधी पुरवला जाईल का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
आ. नमिता मुंदडा, सना मलिक, मुरजी पटेल, मनिषा चौधरी आणि स्नेहा दुबे यांनी या चर्चेत सहभाग घेतला. आ. अमिन पटेल यांनी नायर रुग्णालयात ७ कुत्रे असल्याची बाब उपस्थित केली. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "जालना जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती राज्यातील प्रत्येक शहरांत येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण, त्यांच्या निवाऱ्याची आणि खाण्याची जागा निश्चित करणे, अशा सूचना न्यायालयाने दिल्या असल्याने प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेला त्याचे पालन करणे बंधनकारक आहे."(Maharashtra Stray Dog Control Committee)
 
महाराष्ट्रात १४ लाख ८० हजार भटके श्वान
 
"महाराष्ट्रात जवळपास १४ लाख ८० हजार भटके श्वान असून त्यातील ९४ हजार श्वान हे मुंबई शहरात आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि कल्याण महापालिकेने प्राणी जन्म नियंत्रण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात प्राणी प्रेमींना दोष देऊन चालणार नाही. त्यांनी अशा भटक्या कुत्र्यांसाठी काही जागा निर्माण करून ठेवल्या आहेत जिथे त्यांना खायला दिले जाते. त्यामुळे तिथे शेकडो भटके श्वान येतात, असे अहवालात समोर आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
"राज्यातील २९ महानगरपालिकांच्या वतीने २०२४-२५ मध्ये १ लाख ८२ हजार ४१३ श्वानांवर निर्बीजीकरण २ लाख ९७ हजार ३८९ श्वानांवर अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले. तर, नगरपालिकेत ५१ हजार ५८ आणि ५१ हजार ५८१ निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आले. २०२५-२६ मध्ये ३ लाख १८ हजार ९२२ श्वानांवर निर्बिजीकरण आणि ४ लाख ८४ हजार ४०६ श्वानांवर लसीकरण करण्यात आले. तसेच यावर्षी ६५ हजार ३८५ निर्बिजीकरण आणि ९७ हजार ९५९ श्वानांवर लसीकरण करण्यात आले असून अजूनही ती प्रक्रिया सुरु आहे," असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.(Maharashtra Stray Dog Control Committee)
 
मुंबई तीन ठिकाणी उभारणार निवारा केंद्र
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेला मालाड, मुलूंड येथे प्रत्येकी ३ हजार चौरस मीटर आणि माहुलमध्ये ८ हजार ४११ चौरस मीटरमध्ये श्वान निवाऱ्यासाठी महसुल विभागाकडे प्रस्थापित जागा मागण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत हे तिन्ही निवारा केंद्र सुरु करण्यात येईल. सर्व महापालिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील."(Maharashtra Stray Dog Control Committee)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर