क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून राज्यात मोठी गुंतवणूक होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- कॅनडातील क्यूबेक प्रांतांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट

Maharashtra Quebec Partnership
 
मुंबई : (Maharashtra Quebec Partnership) "कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असून महाराष्ट्र क्युबेकसोबत या क्षेत्रासाठी भागीदारी करण्यास तयार आहे. या भागीदारीतून राज्यात निश्चितच मोठी गुंतवणूक येईल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
कॅनडातील क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शुक्रवार, दि.३ जुलै रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. (Maharashtra Quebec Partnership)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१८ मध्ये मॉन्ट्रियल येथे भेट दिली असता, त्यावेळी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीनीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान तसेच आदिवासी कल्याण या विषयावर सामंजस्य करार करण्यात आले होते. हे करार महाराष्ट्र आणि क्यूबेकमधील संबंध अधिक दृढ असल्याचे प्रतीक आहे. तसेच नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वात आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी मुंबई भेटीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी विषयी सकारात्मक चर्चा झाली होती.
 
क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट म्हणाले की, क्यूबेक कॅनडामध्ये प्रगत राज्य असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सेंटर, शिक्षण, क्रिटिकल मिनरल्स यामध्ये मोठी गुंतवणूक आहे. क्युबेक महाराष्ट्रासोबत विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी करण्यास तयार आहे. पेन्शन फंड संस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास क्युबेकने तयारी केली आहे. भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात रस असल्याचेही स्किट यांनी सांगितले. (Maharashtra Quebec Partnership)
 
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे, कॅनडातील क्यूबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सहाय्यक उपमंत्री डॉमिनिक मार्कोट्टे, सल्लागार श्रीमती लिया फर्टीन, संचालक मायकल कॉन्स्टेनिन, स्टीफन फलेक्कर, क्यूबेक प्रांतातील सीडीपीक्यू गुंतवणूक संस्थेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नटराजन वेंकटरमण आदी उपस्थित होते. (Maharashtra Quebec Partnership)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर