मुंबई : (Maharashtra Energy Drinks Ban) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या ५०० मीटर परिसरामध्ये अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, "स्टिंग' एनर्जी ड्रिंकमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे कॅफिन, अतिप्रमाणातील साखर आणि 'कार्मोजिन' सारखे कृत्रिम रंग सर्रास वापरले जात आहेत. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा आणि पाथर्डी येथे 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पेयाच्या बाटलीवर 'लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठी शिफारस केलेली नाही' असे लिहिलेले असतानाही सर्सास शाळा-कॉलेजच्या परिसरात या पेयाची विक्री केली जाते. हे पेय दारूपेक्षाही घातक आहे," असे त्यांनी सांगितले.(Maharashtra Energy Drinks Ban)
यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली देत ५०० मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच अशा प्रकारची विक्री आढळल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याबाबत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आले असून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.(Maharashtra Energy Drinks Ban)
आमदार राहुल कुल यांनी 'फ्लेवर पानां'च्या नावाखाली होणाऱ्या अंमली पदार्थांची विक्रीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "फ्लेवर पानांच्या नावाखाली शाळकरी मुलांना अंमली पदार्थ विकले जात आहेत. तसेच दुधाच्या भेसळीत फ्लेवर मिल्क म्हणून जास्त साखर आणि कृत्रिम द्रव्ये वापरून मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात असून याची सखोल चौकशी व्हावी. त्यामुळे याच्या तपासणीचे धोरण राबवावे," अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी या गंभीर बाबींची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत सध्या विशेष तपासणी व कारवाईची मोहीम सुरू असल्याचे सांगितले. तसेच, शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात 'फ्लेवर पानां'च्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखालील भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.(Maharashtra Energy Drinks Ban)
२२ प्रयोगशाळा उभारणार
ते पुढे म्हणाले की, "राज्यात अन्न व औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी सध्या संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथे तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याशिवाय रायगड, नाशिक, यवतमाळ आणि पुणे येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अन्ननमुने तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान होईल," असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.(Maharashtra Energy Drinks Ban)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....