तंत्र, मंत्र अन् फुटबॉलची जादू...

    03-Jul-2026   
 
Harry Kane Black Magic
 
मैदान खेळाचे असो किंवा राजकारणाचे, कर्तृत्व जेथे संपते, तेथून बुवाबाजी सुरू होते. अपयशाच्या गडद सावलीला घाबरून अनेकजण मग या यशासाठी बुवाबाजीला बळी पडतात. पण इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने या सगळ्याला लाथाडले आणि इंग्लंडला ६० वर्षांतील दिमाखदार विजय मिळवून दिला.
 
‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६’ स्पर्धेत ‘राऊंड ऑफ ३२’च्या नॉकआऊट सामन्यात इंग्लंडने काँगोचा पराभव करत ‘राऊंड ऑफ १६’मध्ये दमदार प्रवेश केला. मात्र हा सामना जितका मैदानावरील केनच्या जादूई फुटबॉल खेळामुळे गाजला, त्याहूनही अधिक मैदानाबाहेरील त्याच्यावर करण्यात आलेल्या जादूटोण्यामुळे गाजला!
 
या संपूर्ण नाट्याला सुरुवात झाली, ती ग्रुप स्टेजमधील इंग्लंड-घाना सामन्यापासून. दि. २३ जून रोजी झालेला हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. त्या सामन्यापूर्वी घानातील प्रसिद्ध स्वयंघोषित तांत्रिक नाना क्वाकू बोंसम याने जगभरात खळबळ उडवणारा दावा केला होता. "मी हॅरी केनवर जादूटोणा केला आहे. तो घानाविरुद्ध गोल करू शकणार नाही,” असे त्याने जाहीरपणे सांगितले.
 
योगायोग असा की, त्या सामन्यात केन पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि अखेरच्या क्षणी मिळालेली सुवर्णसंधीही त्याने दवडली. इंग्लंडला विजय मिळवता आला नाही आणि सामना ०-० असा बरोबरीत सुटला.
 
यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पूर आला. घानाच्या ‘जुजू’ने काम केले; तांत्रिकाचा शाप खरा ठरला, अशा हजारो पोस्ट व्हायरल झाल्या. फुटबॉलपेक्षा जादूटोण्याचीच चर्चा अधिक रंगली.
 
काँगोच्या मॅचच्या आधी त्याने केनवर केलेली काळी जादू मागे घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. आणि पुन्हा योगायोग पाहा, ०-१ अशा पिछाडीवरून केनने दोन जादूई गोल करून इंग्लंडला दिमाखदार विजय मिळवून दिला! या विजयासह इंग्लंडने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात तब्बल ६० वर्षांनंतर एका ऐतिहासिक विक्रमाची पुनरावृत्ती केली!
 
मात्र, नॉकआऊट फेरीपूर्वी या कथेला नवे वळण मिळाले. त्याच नाना क्वाकू बोंसमने आपण हॅरी केनवरील जादूटोणा मागे घेतल्याचा आणि त्याला ‘शापमुक्त’ केल्याचा दावा केला. या दाव्याकडे अनेकांनी केवळ विनोद म्हणून पाहिले, तर काहींनी त्याला अंधश्रद्धेचे नवे उदाहरण म्हटले.
 
पण काँगोविरुद्धच्या सामन्यात जे घडले, त्यामुळे या कथेला आणखी रंग चढला. हॅरी केनने अप्रतिम खेळ करत दोन गोल झळकावले आणि इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ग्रुप स्टेजमध्ये संघर्ष करणारा तोच केन नॉकआऊटमध्ये पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतल्याचे पाहायला मिळाले.
 
अर्थात, या पुनरागमनामागे कोणत्याही तांत्रिकाची शक्ती नव्हती. नॉकआऊट सामन्यासाठी इंग्लंडने आखलेले वेगळे डावपेच, सहकार्‍यांकडून मिळालेली उत्तम साथ आणि केनची दर्जेदार फिनिशिंग हेच त्याच्या यशाचे खरे कारण होते. मात्र, फुटबॉलमध्ये अशा योगायोगांना दंतकथेचे स्वरूप मिळायला वेळ लागत नाही.
 
विश्वचषकाच्या प्रत्येक आवृत्तीत एखादी अशी कथा जन्माला येते, जी खेळाइतकीच चर्चेचा विषय बनते. यंदाच्या स्पर्धेत हॅरी केन, घानाचा तांत्रिक आणि ‘शापमुक्ती’ची ही कथा त्यांपैकीच एक ठरली आहे!
 
शेवटी मात्र फुटबॉलचा खरा मंत्र तोच, ‘मैदानावर विजय मिळवून देतात, ते जादूटोणे नव्हे, तर खेळाडूंचे कौशल्य, आत्मविश्वास, डावपेच आणि योग्य क्षणी दाखवलेली गोल करण्याची क्षमता!’ हॅरी केनने काँगोविरुद्ध केलेले दोन गोल हे त्याचेच जिवंत उदाहरण ठरले. फुटबॉलच्या मैदानावर जादू झाली, हे अंतिम सत्य होते, पण जादू चालली, ती त्या तांत्रिक नाना क्वाकू बोंसमची नव्हे, तर केनच्या खेळाची...




संबंधित मजकूर