कर्मयोगी प्राचार्यांची ‘हरित’ यशोगाथा!

    03-Jul-2026
 
Dr Manohar Meshram
 
जव्हारच्या खडकाळ भूमीवर ३५ एकरांचे देखणे नंदनवन फुलवणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ. मनोहर राजाराम मेश्राम यांचा प्रेरणादायी प्रवास...
 
दश कूप समा वापी, दश वापी समो ह्रदः|
दश ह्रद समः पुत्रो, दश पुत्र समो द्रुमः॥
 
अर्थात, दहा विहिरींच्या बरोबरीने एक तलाव, दहा तलावांच्या बरोबरीने एक मोठा जलाशय, दहा जलाशयांच्या बरोबरीने एक सत्पात्र पुत्र आणि दहा पुत्रांच्या बरोबरीने एक उत्तम वृक्ष असतो. अशाप्रकारे भारतीय संस्कृतीने अगदी प्रारंभीपासूनच निसर्गाला देवाचे रूप मानले आहे. याच प्राचीन मूल्यांना आपल्या जगण्याचा आणि कर्तव्याचा ध्यास बनवून, खडकाळ जमिनीवर हिरवेगार नंदनवन फुलवणार्‍या एका आधुनिक ऋषीचा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ ठरत आहे. हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच, ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हारचे प्राचार्य आणि ध्येयवादी पर्यावरणदूत डॉ. मनोहर राजाराम मेश्राम!
 
दि. २१ ऑक्टोबर १९६५ रोजी गोंदिया-भंडारा परिसरातील सुकळी या छोट्याशा गावात डॉ. मेश्राम यांचा जन्म झाला. बालपणापासूनच शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने आकार दिला, तो ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’चे सचिव डॉ. मोरेश्वर गोसावी यांच्या मार्गदर्शनाने! त्यांच्या प्रेरणेतून डॉ. मेश्राम यांनी शिक्षणाचा केवळ व्यवसाय न करता, त्याला समाजपरिवर्तनाचे माध्यम बनवले. नाशिक, श्रीवर्धन ते जव्हार अशा विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणात काम करताना त्यांनी प्रत्येक आव्हानाचे संधीत रुपांतर केले.
 
सन २०१८ मध्ये जेव्हा डॉ. मेश्राम यांनी जव्हार महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली, तेव्हा त्यांच्यासमोर केवळ शैक्षणिक प्रशासनाचेच नव्हे; तर महाविद्यालयाच्या सुमारे ३५ एकर खडकाळ, ओसाड आणि निर्जीव वाटणार्‍या जमिनीचेही आव्हान होते. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भीक्ष आणि हिवाळ्यानंतर करपून जाणारी जमीन पाहून अनेकांनी येथे वृक्षलागवड अशय मानली होती. परंतु, ‘एमएस्सी’ (वनस्पतीशास्त्र), ‘एमफिल’, ‘पीएचडी’ आणि ‘एलएलबी’ अशा उच्चविद्याविभूषित प्राचार्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिकाने या आव्हानाचा स्वीकार केला.
 
ध्येय जर प्रामाणिक असेल, तर निसर्ग स्वतः रस्ता दाखवतो, या विश्वासाने त्यांनी कामाला सुरुवात केली. शासनाकडून कोणताही विशेष निधी न स्वीकारता, केवळ संस्थेचे सहकार्य आणि स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी दरवर्षी सुमारे १५ हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड सुरू केली. आज या परिसरात साग, बांबू, जांभूळ, काजू, आंबा आणि करंज अशा हजारो देशी वृक्षांनी दाट वनराईचे रूप धारण केले आहे. झाडांची फक्त लागवडच केली नाही, तर एखाद्या माता-पित्याप्रमाणे ती त्यांनी काळजी घेऊन जगवलीसुद्धा. उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून त्यांनी बेडा ओहळावर ‘वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवून एक भव्य बंधारा उभारला. यामुळे परिसराची भूजल-पातळी तर वाढलीच. शिवाय, आज जव्हारसारख्या दुर्गम भागातही या महाविद्यालयाचा परिसर नैसर्गिक शीतलतेचा अनुभव देतो. या वनराईमुळे तिथे जैवविविधता वाढली असून, चक्क बिबट्याचा वावरही वाढला आहे, जो पर्यावरणीय संतुलनाचा सर्वोत्तम संकेत आहे.
 
डॉ. मेश्राम यांचे हे ‘हिरवे स्वप्न’ शैक्षणिक गुणवत्तेशी जोडलेले आहे. त्यांच्याच गतिमान नेतृत्वात महाविद्यालयाला ‘नॅक (NAAC) मूल्यांकनात ‘B+’ श्रेणी प्राप्त झाली. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्र, सुसज्ज अभ्यासिका आणि क्रीडांगण उपलब्ध करून देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘नेट’-‘सेट’ सारख्या राष्ट्रीय परीक्षा देता याव्यात, यासाठी ते मुंबई विद्यापीठ स्तरावर सातत्याने यशस्वी पाठपुरावा करत आहेत.
 
जव्हार, मोखाडा तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यात डॉ. मेश्राम हे अनेक समाजोपयोगी कामात मार्गदर्शक म्हणून नेहमीच अग्रेसर असतात. ‘एक उत्तम विद्यार्थी घडवला म्हणजे एक परिवार घडतो, परिवार गावांसाठी आदर्श ठरत संपूर्ण गावास प्रेरणेतून घडवतो,’ या संकल्पनेतून त्यांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले आहे.
 
डॉ. मनोहर मेश्राम यांच्या जीवनप्रवासातून आपल्याला हाच व्यावहारिक धडा मिळतो की, मोठे बदल घडवण्यासाठी मोठ्या बजेटची नाही; तर मोठ्या आणि पवित्र विचारांची गरज असते. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांना ‘एक विद्यार्थी - एक झाड’ या संस्कृतीशी जोडले.
 
आजच्या या जागतिक हवामानबदलाच्या गंभीर काळात डॉ. मेश्राम यांनी दाखवलेला हा मार्ग केवळ कौतुकास्पद नसून, प्रत्येकाने अनुकरण करावा असा आहे. खडकाळ जमिनीचा छातीवर हिरवेगार जंगल उभे करणार्‍या या अद्भुत कर्मयोग्याला आणि त्यांच्या निसर्गाभिमुख प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
कमलेश संखे 




संबंधित मजकूर