श्रीराम मंदिरातील देणगी चोरीची घटना दुर्दैवी; दोषींवर कठोर कारवाई करा : दत्तात्रेय होसबाळे

    03-Jul-2026   
Dattatreya Hosabale Ram Temple Donation Theft
 
मुंबई : (Ram Mandir Donation Scam Investigation)अयोध्येतील भव्य श्रीरामलल्ला मंदिरातील देणगीमध्ये झालेली चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे संपूर्ण हिंदू समाज आणि रामभक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे, अशी तीव्र भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी संघाची भूमिका मांडली असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटले आहे की, श्रीराम जन्मभूमी येथे उभारलेले भव्य मंदिर हे अनेक पिढ्यांच्या संघर्षातून तसेच कोट्यवधी रामभक्तांच्या समर्पण, त्याग आणि बलिदानातून साकार झाले असून, आज ते संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे प्रमुख केंद्र बनले आहे. अशा पवित्र ठिकाणी घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे सर्वजण अत्यंत दुःखी आणि संतप्त आहेत.
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आग्रहास्तव उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या निर्णयाचे स्वागत करत होसबाळे यांनी सांगितले की, एसआयटीच्या शिफारशींनुसार कायदेशीर कार्यवाही सुरू झाली आहे. या तपासानंतर जे कोणी दोषी आढळतील, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
 
मंदिर प्रशासनाकडून काही प्रमुख अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ट्रस्टने या अत्यंत निंदनीय घटनेकडे गांभीर्याने पाहावे आणि मंदिराच्या व्यवस्थापनातील व कार्यपद्धतीतील सर्व त्रुटी त्वरित दूर कराव्यात. योग्य आर्थिक व्यवस्थापन, निर्दोष व पारदर्शक कार्यपद्धती राबवावी. मंदिरातील पवित्रता, सात्त्विकता आणि खऱ्या अर्थाने धर्ममय वातावरण अधिक मजबूत करावे, जेणेकरून रामभक्तांचा विश्वास अखंड व अढळ राहील. सध्या निर्माण झालेली संभ्रम आणि अनिश्चिततेची परिस्थिती लवकरात लवकर दूर करण्यासाठी मंदिर प्रशासन आणि सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत.
(Ram Mandir Donation Scam Investigation)
 
योग्य आर्थिक व्यवस्थापन आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या बळावर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाचा विश्वास आणि श्रद्धा अधिक दृढ करेल, असा विश्वास दत्तात्रेय होसबळेंनी याप्रसंगी व्यक्त केला. या कठीण प्रसंगी संपूर्ण हिंदू समाजाने संयम आणि धैर्य राखावे, असे आवाहन संघाने केले आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदूविरोधी व राष्ट्रविरोधी शक्तींचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी समाजाने सजग आणि एकजुटीने उभे राहावे, असे आवाहनही दत्तात्रेय होसबळे यांनी शेवटी केले आहे.
(Ram Mandir Donation Scam Investigation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर