मुंबई : (Ancient Shivling Found in Trimbakeshwar Temple) नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पथकास एक प्राचीन दगडी शिवलिंग आढळून आले आहे. मंदिरातील प्राचीन व ऐतिहासिक 'अमृतकुंड' या जलकुंडाची स्वच्छता करत असताना त्याच्या तळाशी कोरीव काम केलेले हे शिवलिंग पुरातत्व विभागास सापडले. हे शिवलिंग अमृतकुंडाच्या तळाशी अनेक दशकांपासून साचलेल्या गाळ आणि चिखलाखाली पूर्णपणे गाडले गेले होते. प्राथमिक अंदाजानुसार हे शिवलिंग किमान २४० वर्षे जुने आहे. मात्र ते सुमारे ३३५ वर्षे किंवा त्याहून अधिक प्राचीन असण्याचीही दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राचीन जलकुंडातील पाणी काढून गाळ उपसण्याचे काम सुरू असताना त्याच्या तळाशी संबंधित शिवलिंग आढळले. पुरातत्व विभागाचे पथक गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरातील सुमारे ६५ फूट खोल दगडी जलकुंड रिकामे करून त्यातील गाळ काढण्याचे काम करत होते. आधुनिक पंपांच्या साहाय्याने कुंडातील पाणी बाहेर काढण्यात आले आणि शतकानुशतके साचलेला गाळ हटविण्यात आला. त्यानंतर कुंडाच्या तळाशी काळ्या दगडातील सुबक शिवलिंग हळूहळू स्पष्ट दिसू लागले. आतापर्यंत या शिवलिंगाचा उल्लेख केवळ स्थानिक ज्येष्ठांच्या आठवणी आणि मौखिक परंपरेतच होता. मात्र आता ते प्रत्यक्ष स्वरूपात सर्वांसमोर आले आहे. (Ancient Shivling Found in Trimbakeshwar Temple)
ज्या ऐतिहासिक अमृतकुंडात हे शिवलिंग सापडले आहे, त्या मुख्य मंदिराचा पुनर्निर्माण मराठा साम्राज्याचे तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी इ.स. १७५५ ते १७८६ या कालावधीत करून घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या आधारावर हे शिवलिंग आणि त्यावरील कोरीव काम किमान २४० वर्षे जुने असल्याचे मानले जात आहे. (Ancient Shivling Found in Trimbakeshwar Temple)