जेव्हा एखादा छंद, एखादे प्रोफेशन नुसते आवड न राहता जीवनप्रेरणेचा स्रोत होतो, तेव्हा ती सर्वार्थाने ‘पॅशन’ ठरते. रंगभूमी, त्यातील विविधांगी सृजनात्मक प्रयोग हेच ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे ‘पॅशन’ होते आणि या ‘पॅशन’शी त्या अखेरपर्यंत एकरुपही होत्या. नुकतीच विजयाबाईंची प्राणज्योत मालवली आणि रंगभूमीवरील ‘विजया’पर्वाचा पडदा पडला. त्यानिमित्ताने विजया मेहता आणि त्यांची ‘कलासक्त पॅशन’ शब्दबद्ध करणारा हा लेख...
१९६० साली ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची स्थापना झाली. तिची स्थापना म्हणजेच, विजया मेहता यांचा जन्म, असे मला म्हणता येईल. या स्थापनेच्या वेळीच बाईंची नाटक करण्याविषयीची भूमिका तयार झाली असावी. इचलकरंजीच्या नाट्य संमेलनातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या होत्या की, "नाटक हा एक सृजनशील धर्म आहे. नाटकात संगीत, शिल्प, चित्रकला या सर्वांची मूलतत्त्वे आहेत.” या संस्थेची स्थापना झाली तेव्हा के. नारायण काळे यांनी आग्रह धरला की, या संस्थेच्या प्रयोगाला प्रतिज्ञेची जोड असायला हवी. ‘रंगायन’ने ती तंतोतंत पाळली.
त्यांनी वर केलेल्या प्रतिपादनाला केव्हाच प्रत्यक्षात उतरवले होते. त्याला अनुषंगूनच बाईंनी या संस्थेत प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना सामावून घेतले असावे. प्रा. श्री. पु. भागवत, प्रा. मंगेश राजाध्यक्ष, चित्रकार गायतोंडे, वसंत सरवटे, संगीतकार आणि गायक जितेंद्र अभिषेकी, कवी मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर, नाट्यसमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रा. निस्सीम इझिकेल, अशा लोकांशी त्यांचे असलेले नाते ही त्यांची श्रीमंती होती. ‘रंगायन’ ही संस्था म्हणजे एक चळवळ होती. चांगल्या गंभीर प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्ग निर्माण करावा, या हेतूने त्यांनी ‘प्रेक्षक सभासद’ योजना सुरू केली. ‘रंगायन’नेच महेश एलकुंचवारांची ओळख मराठी नाट्यसृष्टीला करून दिली. बाईंनी कधीच एकाच धारणेची, विचारसरणीची नाटके केली नाहीत. त्यांनी ‘आयनेस्को’ केला आणि ‘ब्रेख्त’ही केला. या दोन नाटककारांची जीवनविषयक भूमिका परस्परविरोधी होती. ‘आयनेस्को’मुळे मराठी प्रेक्षकांनी अतिवास्तववादाची ओळख झाली. ‘ब्रेख्त’मुळे ‘थिएटर ऑफ एलिएनेशन’ची ओळख झाली.
‘एक होती राणी’, ‘एक शून्य बाजीराव’ , ‘खुर्च्या’ यांसारखी नाटके बाईंनी ‘रंगायन’तर्फे सादर केली. ‘एक शून्य बाजीराव’च्या बाबतीत त्या दिग्दर्शक म्हणून अपयशी ठरल्या. हे अपयश त्यांनी जाहीरपणे कबूलही केले. प्रायोगिक रंगभूमीचा वस्तुपाठ म्हणता येईल, अशी ही संस्था १९७२ मध्ये फुटली. त्यातून ‘आविष्कार’ ही संस्था जन्माला आली. पंडित सत्यदेव दुबे म्हणायचे की, "संस्था फुटल्या पाहिजेत. एका संस्थेच्या चार संस्था झाल्या पाहिजेत.”
‘रंगायन’ जरी १९७२ मध्ये फुटली, तरी बाई १९७० पासूनच व्यावसायिक रंगभूमीकडे वळल्या होत्या. रंगभूमी जरी व्यावसायिक असली, तरी बाईंनी या रंगभूमीवरही काही आशयनिष्ठ प्रयोग केले. व्यावसायिक रंगभूमी आणि तिचा प्रेक्षक यांना धीट केले. जयवंत दळवींपासून ते महेश एलकुंचवार यांच्यापर्यंतच्या नाटककारांची नाटके बाईंनी व्यावसायिक रंगभूमीवर आणली. ‘दिग्दर्शकाचा स्वतंत्र असा ठसा मराठीत विजयाबाईंनी प्रथम आणला,’ असे जयवंत दळवींनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे आणि बाईंचाही असा आग्रह होता की, "माझ्या निर्मितीला वाव असेल, अशीच नाटकं मी व्यावसायिक रंगभूमीवर करीन.”
जयवंत दळवी नाटक लिहायचे ते २००-३०० पानांचे. लेखक म्हणून नाटक कसे बांधायचे, याची त्यांना कल्पना नव्हती. ते मुळात कादंबरीकार, कलाकार. मग लिहिलेले बाड ते बाईंकडे द्यायचे. मग बाई त्यावर शिल्पकाम करायच्या. त्या बाडातला नकोसा भाग काढून टाकायच्या- नाटकाचे काही अंश वर-खाली करायच्या आणि त्यातून त्याच बाडाचे रेखीव असे नाटक निर्माण व्हायचे.
बाईंनी मराठी नाटकाच्या प्रेक्षकांची अभिरुची बदलली. साचेबद्ध कौटुंबिक नाटक पाहणारा नि तशीच नाटके आवडणारा प्रेक्षक आता जयवंत दळवी यांच्या अत्यंत धाडसी विषय असलेल्या ‘पुरुष’ या नाटकालाही गर्दी करू लागला. त्याचबरोबर बाईंनी एलकुंचवारांचे‘वाडा चिरेबंदी’ हे नाटकही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करून दाखवले. एकूण बाईंचे महत्त्वाचे काम म्हणजे, प्रायोगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांचा त्यांनी प्रत्येक नाटकात मेळ साधला. संहितेच्या निवडीपासून ते सादरीकरणाच्या पद्धतीपर्यंत ते प्रकर्षाने दिसून येते. ज्यांनी या अवस्थांतराचा अनुभव घेतला; त्यांना नक्की हे पटेल की, विजयाबाईंनी मराठी व्यावसायिक रंगभूमी तिच्या प्रेक्षकांसह प्रगल्भ केली.
बाईंचे गुरू इब्राहिम अल्काझींच्या म्हणण्याप्रमाणे, नाटकाच्या अभिव्यक्तीचे चार घटक महत्त्वाचे असतात. पहिला नाटककार, दुसरा नटसंच, तिसरा घटक म्हणजे रंगभूमीची वास्तू आणि चौथा घटक अर्थातच, प्रेक्षक. या चारही घटकांना संस्कारित करणे आवश्यक असते. त्यांच्या एकत्रित कृतीतूनच नाट्यानुभव नटापासून प्रेक्षकांपर्यंत आणि नंतर देशाच्या सांस्कृतिक जाणिवेपर्यंत पोहोचू शकतो. ही धारणा बाईंनी अवलंबिली. या चारही घटकांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न बाईंनी केला. त्यामुळे ‘विजया मेहता’ या व्यक्तीचे रूपांतर एका नाट्यचळवळीत झाले.
१९७५ साली मी बाईंनी घेतलेले सरकारी नाट्य शिबीर केले. ते एका महिन्याचे निवासी शिबीर होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मींच्या मनावर ‘विजया मेहता’ या नावाचे जे दडपण होते, ते दूर झाले. बाईंचा स्वभाव अत्यंत खेळकर; परंतु गंभीर होता. माझ्या बॅचला अजय वढावकर होता, प्रतिमा कुलकर्णी आणि सतीश राजमाचीकर होता. नाटक म्हणजे खेळ (Play) हे त्यांच्या शिकवण्यातूनही जाणवायचे. बाई प्रत्येक शिबिराला पाहुणे शिक्षक बोलवायच्या. अशा लोकांशी त्यांची एवढी जवळीक असणे, हा त्यांच्या ‘नाटक’ या ‘पॅशन’चाच भाग होता. ‘नाट्यकलेत सर्व कलांचा संगम आहे,’ या त्यांच्या म्हणण्याचा प्रत्यय त्या बोलावतात त्या पाहुण्या शिक्षकांच्या निवडीतून येतो. तसे शिक्षक आम्हाला शिकवायला जे आले होते, त्यांची नावे ऐकल्यावर हे लक्षात येईल. मामा पेंडसे, दामू केंकरे, राम पटवर्धन, द. ग. गोडसे, अशोक परांजपे, विश्वनाथ मोरे. सर्व अंगांनी मुलांचे नाट्यप्रशिक्षण व्हावे, हा त्यांचा हेतू होता. मला त्याचा प्रत्यय मी स्वतः नाटक दिग्दर्शित करताना आला.
शिबिराच्या शेवटी बाईंनी आमचे एक नाटकही बसवले- नाटकाचे नाव ‘खोट नाटक’- लेखक वृंदावन दंडवते. त्यानिमित्ताने बाईंची नाटक उभे करण्याची पद्धत कळली. त्या हातात छडी घेणार्या दिग्दर्शिका नव्हत्या. त्या स्वतः काही करून दाखवायच्या नाहीत. पात्रांनाच सांगायच्या ‘चला रे करा आपापल्या भूमिका.’ नटसंच त्यांच्या-त्यांच्या भूमिकेला अनुसरून रंगमंचावर वावर करायचा. मग बाई सांगायच्या- हे ठेवा, हे काढा. मग उरेल ते नाटक असायचे. कलाकाराला दिलेल्या स्वातंत्र्यातूनच तो घडतो. म्हणूनच तर नाना पाटेकर, विक्रम गोखले बाईंना गुरू मानतात. ‘आम्हाला नट म्हणून बाईंनी घडवलं,’ असे ते म्हणतात.
सगळे काही seriously enjoy करण्याचे ते शिबीर होते. या शिबिरातल्या बाईंच्या आठवणी खूप आहेत. परंतु, दिलेल्या शब्दांच्या मर्यादेत त्या मांडणे शक्य नाही.
बाईंचे खरे नाव ‘पॅशन’... कलासक्त पॅशन- ही पॅशन इतकी जबरदस्त ऊर्जामय होती की, बाईंच्या वैयक्तिक आयुष्यातले दुःखद चढ-उतार चालू असतानाही, त्या नाटक करीत राहिल्या. किंबहुना, नाटकामुळेच त्या ते चढ-उतार सहज पार करू शकल्या असाव्यात. अगदी आता-आतापर्यंत त्या नाटकाच्या संपर्कात होत्या. अलीकडेच त्यांनी ‘एनसीपीए’ला मोठे शिबीर घेतले होते.
त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राचे ‘झिम्मा’ हे नाव अर्थपूर्ण आहे. आयुष्यभर त्या नाटकाशी ‘झिम्मा’ खेळत राहिल्या. या पुस्तकाच्या वेष्टनावर आणि अंतरंगात या पुस्तकाचे वर्णन- ‘आठवणींचा गोफ...’ आठवणींच्या धाग्यांचे हे मुलायम विणकाम, ‘रंगलेला प्रयोग’ असे केलेले आहे, ते योग्यच आहे. कारण, योजनाबद्ध रितीने, वाचकांना रुचेल, पचेल अशा पद्धतीनेच ते रंजकपणे लिहिलेले आहे आणि कदाचित ते योग्यच आहे, असे म्हणता येईल. पण, यापलीकडे बाईंच्या नाट्यप्रवासातल्या त्यांच्या आत्मशोधाविषयी अधिक सखोलपणे काही वाचायला मिळेल, अशी असलेली अपेक्षा मात्र पूर्ण होत नाही.
रवीन्द्र लाखे
९८६९३९६३६९