एका विद्यापीठाचे अस्त होणे...

    02-Jul-2026
 
Vijaya Mehta
 
काळ अनेक कलाकार घडवतो; पण काही मोजकी व्यक्तिमत्त्वे काळालाच नवे निकष देऊन जातात. विजया मेहता या अशाच दुर्मीळ परंपरेतील. त्यांच्या निधनाने रंगभूमी ही केवळ करमणुकीचे माध्यम नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक संस्कारांचे विद्यापीठ आहे, या विचाराचा एक प्रतिनिधीच काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 
दृढ विश्वास ठेवला की, नाट्यातले ‘सत्य क्षण’ कुठेही निर्माण होऊ शकतात!’ या जगाचा निरोप घेतलेल्या विजया मेहतांचे हे वाक्य. विजया मेहतांना त्यांचा शिष्यगण ‘बाई’ म्हणायचा. ज्या गिरगावात त्यांची कारकीर्द घडली, त्या गिरगावात शिक्षिकेला ‘बाई’ म्हणण्याचा निर्विवाद नियम होता. विजयाबाई तशाच होत्या; पट्टीच्या शिक्षिका. परंतु, ही शिक्षिका शिक्षणापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिचे विद्यापीठ झाले. हे विद्यापीठ अनेक दिग्गज विद्यार्थ्यांचे कुळ ठरले. यात विक्रम गोखले होते, नाना पाटेकर होते, सुकन्या कुलकर्णी होत्या, सुहास जोशी होत्या, चित्तरंजन कोल्हटकर, रामचंद्र कुलकर्णी होते. बाई अभिनयापुरत्या मर्यादित नव्हत्या. बाईंनी रंगभूमी केली, दूरदर्शनसाठी मालिका केल्या, सिनेमाही केला. मात्र, त्या खर्‍या अर्थाने रमल्या त्या प्रायोगिक रंगभूमीवरच! महत्त्वाचे म्हणजे त्यांचे प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रयोग प्रायोगिक राहिले नाहीत; त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही रसिकजनांची भरभरून दाद मिळवली.
 
बाई नाट्यकला किंवा अभिनयकला चहू-अंगाने जगल्या. या सगळ्याच्या अनुषंगिक गोष्टींचाही प्रमुख पात्राप्रमाणे त्या विचार करायच्या. नेपथ्यातल्या प्रकाशयोजनेच्या साध्या तिरिपीचाही त्यांनी सखोल विचार केलेला असायचा. त्यांचे थिएटर शिकवणे किंवा मालिका साकारणे अथवा सिनेमा उभा करणे, हे केवळ शिकवणे नव्हते; तर त्याला एका तत्त्वज्ञानाची भक्कम बैठक होती. बाई ‘कलेसाठी कला’ या तत्त्वज्ञानाने जगल्या व मुंबईच्या मरिन ड्राईव्हच्या दुसर्‍या टोकाला ‘एनसीपीए’सारखी एक संस्था उभी करून निघून गेल्या.
 
पुरुषांच्या बेंडकुळ्या किंवा स्त्रीपात्रांचे देहप्रदर्शन; विनोदाच्या नावाखाली चाललेले हिडीस अश्लील संवाद अशा आजच्या काळात विजयाबाई नावाचे कुणी होते, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. साहित्य संघ, भवन्स, ‘आयएनटी’ अशी कितीतरी व्यासपीठे त्याकाळात नाट्यचळवळीसाठी उपलब्ध होती. विजया मेहतांना या सगळ्या वातावरणाचा भरपूर उपयोग झाला.
 
गिरगावातल्या अत्यंत सधन घरातील विजया मेहतांचा जन्म. विचाराने अत्यंत स्वतंत्र अशा पुरोगामी, ज्याला खर्‍या अर्थाने पुरोगामी म्हणावे अशा घराचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्याकाळात नाटक हे ‘करिअर’ म्हणून निवडावे, याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळाले. भवन्स, साहित्य संघ या एकमेकांना पूरक असणार्‍या या दोन्ही संस्थांनी विजयाबाईंचा आवाका समृद्ध केला. अन्य कुठल्याही विद्यार्थ्याप्रमाणे त्याही शिकतच होत्या. परंतु, शिकत असताना घडत असलेल्या प्रक्रियेतल्या उणिवा कुठेतरी त्या मनात नोंदवत होत्या. त्यावेळेसचा काळ, नाट्यनिर्मितीत निर्माण झालेले प्रवाह, भविष्याच्या दृष्टीने त्यात तयार होणार्‍या उणिवा या बाईंना जाणवत होत्या. तालमीत दृश्य आणि श्राव्य भागांवर खूप लक्ष दिले जायचे. पण, त्यामुळे अभिनय मागे पडला होता. मग या अभिनयाच्या तंत्रावर पुढच्या त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी भरपूर काम केले. ही जाण जेव्हा त्यांना आली, त्यावेळेस त्यांचे वय केवळ १९ होते.
विजयाबाई अल्काझींच्या विद्यार्थिनी. त्यामुळे रंगभूमीचे एक सुजाण, समृद्ध भान त्यांना मिळाले होते. रूढ अर्थाने त्या प्रवाहाच्या विरोधात चालल्या होत्या. त्यामुळे केवळ अभिनेत्री म्हणून या उणिवा दुरुस्त करता येणार नाहीत, याची त्यांना जाण होती. म्हणून त्यांनी दिग्दर्शनालाही सुरुवात केली. देश स्वतंत्र झाला होता. हा सगळाच काळ भारतीयांनी आदर्श म्हणून युरोपकडे पाहण्याचा होता. सरकार निरनिराळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या देऊन, आपल्याकडच्या होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात पाठवत होते. बाईंनाही सुरुवातीला अशी संधी चालून आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली आणि अधिक काम करण्याचा मार्ग स्वीकारला.
 
बाईंना खूप शिस्तीचे शिक्षक भेटले. नाटकाची सकाळची तालीम, तीही साडेसात ते साडेनऊ. असे कितीतरी प्रयोग बाईंनी सुरुवातीच्या काळात केले. संवाद सुचणे, असा एक प्रयोग त्यांनी त्याकाळात केला. सतत तालीम करायची आणि नाटक आकाराला आणायचे आणि मग ते प्रेक्षकांच्या समोर पेश करायचे, याचा रिवाज त्यांनी घडवला. विजयाबाईंकडे एक कमालीची तटस्थता होती, जी त्यांच्या मांडणीतही आली. त्या स्वतःच्या प्रेमात कधीच पडल्या नाहीत.
 
अभिनय चळवळ व थिएटर पुढे नेण्यासाठी, देशी-विदेशी अशा सर्वच लोकांबरोबर त्यांनी काम केले. स्वतःमधल्या निसर्गदत्त कलेचा त्यांनी आदर केला. स्वतःभोवती कलाकृती फिरवणारा नट किंवा नटी पाहिली की, त्यांच्या कपाळावर आठी पडत असे. अशा वागण्याला त्या ‘नाटकातली अनैतिकता’ असे म्हणत. नाटक किंवा अभिनय याच्या भोवताली जे सगळे घटक दृश्यमान चौकटीत येतात, ते सगळेच तितकेच महत्त्वाचे आहेत, असे त्या मानत. त्या स्वतः ते तत्त्वज्ञान काटेकोरपणे जगल्या. ‘बॅरिस्टर’ हे मराठी रंगभूमीवरचे अजरामर नाटक. विक्रम गोखले, विजया मेहता यांनी हे नाटक कायम लक्षात राहील असे साकारले. बाईंनी यात अभिनय साकारला असला, तरी त्यांच्यातली दिग्दर्शिका येथे जिवंत होती. कदाचित, त्यामुळेच ते चिरस्मरणात राहिले.
 
‘दृढविश्वास ठेवला की, नाट्यातले ‘सत्य क्षण’ कुठेही निर्माण होऊ शकतात,’ हे बाईंचे गाजलेले वाय. याला सामूहिकतेची एक किनार आहे. बाई तशाच जगल्या. पिटर ग्रुक दिग्दर्शकाबरोबर त्यांनी जर्मनीत साकारलेले ‘महाभारत’ हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. प्रत्यक्ष दगडाच्या खाणीत साकारलेले हे नाट्य ‘रफ थिएटर’चा अस्सल अनुभव होता. ‘खरेतर नाटक म्हणजे मिथ्य; परंतु हे मिथ्यच आपल्याला अंतिम सत्याप्रत घेऊन जाते,’ हे ‘पिकासो’चे वाक्य बाई जगल्या. असत्याकडून सत्याकडे होणारा हा प्रवास, त्यासाठी कराव्या लागणार्‍या वास्तवाची पुनर्निमिती, त्यासाठी साकारावे लागणारे नाटक आणि प्रयोगागणिक त्यात केले जाणारे सुधार, यात बाई आयुष्यभर रमल्या.
 
प्रयोग रंगवणे ही त्यांची खासियत होती. त्यासाठी त्या जीवापाड झटल्या. बाईंचे बाईपण यातूनच आकाराला आलेले होते. दीर्घायुष्य लाभलेल्या बाईंनी आपल्या नाटकाची कारकीर्द वयाच्या १८-१९व्या वर्षीच सुरू केली होती. नाटकाचा प्रयोग हेच अंतिम सत्य मानल्यामुळे त्या त्यातच रमल्या. एक दीर्घ कारकीर्द त्यांना यामुळे मिळाली. रंगभूमीकडे आज मराठी प्रेक्षक किंबहुना, देशभरातलाच प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचे दिसते. त्याचे कारण, रंगभूमीच्या कलाकारांनी रंगभूमीचे निकष पाळणे बंद केले हेच आहे. परमेश्वर कसा दिसतो, याची वर्णने आपण ऐकू शकतो. परंतु, रंगभूमीत परमेश्वर कसा असतो, याचे ‘याची देही याची डोळा’ दर्शन विजयाबाईंनी घडविले. एखाद्या महाकाय वाद्यवृंदाच्या निरनिराळ्या वाद्यांमधून निघणारे शेकडो सूर, लयी आणि ताल एका बारीक काडीच्या आधाराने नियंत्रित करणार्‍या संगीत दिग्दर्शकाप्रमाणे विजयाबाई जगल्या. त्यांनी अभिनय, संगीत, कला, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा या सगळ्याच विषयात एक वस्तुपाठ तयार करून ठेवला. त्यांनी निवडलेली वाट अवघड होती. इतकी अवघड की, त्यांच्या शिष्योत्तमांनासुद्धा त्याच वाटेवर चालत राहणे शक्य झाले नाही. बाई मात्र व्रतस्थाप्रमाणे रंगभूमीचे विश्व जगत राहिल्या.
 
‘एनसीपीए’ची थिएटर्स आजही बाईंच्या प्रयोगशीलतेची व भविष्यवेधी वृत्तीची साक्ष देतात. अभिनयाचा कॅनव्हास अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे उपलब्ध असला, तरी दिग्दर्शनाची वाट निवडून पडद्यामागे जाणे हे अवघड. अत्यंत मनस्वी कलाकारच हे करू शकतो, बाईंनी ते केले. कालचक्राच्या गतीत अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आकाराला येतात व विस्मृतीत निघून जातात. विजयाबाईंचे मात्र तसे होणार नाही. कारण, एखाद्या रंगलेल्या प्रयोगाचा प्रभाव प्रदीर्घ काळ रसिकप्रेक्षकांच्या मनावर कोरला जावा, तसे विजयाबाईंचे व्यक्तिमत्त्व मराठी मुलुखात कोरले गेले आहे.
 




संबंधित मजकूर