एकतर युद्ध करा किंवा युद्धासोबत जगायला शिका, या दोनच उक्तींवर सध्या जगाची वाटचाल सुरू आहे. तामिळनाडूच्या तिरपूर शहराने दुसरा मार्ग निवडत, वस्त्रोद्योग क्षेत्रात ४६ हजार कोटींच्या निर्यातीचा विक्रम केला. आता त्यांनी एक लाख कोटी रुपये निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. नकाशात इवल्याशा दिसणार्या या जिल्ह्याने, हा विक्रम कसा गाठला, त्याचेच हे आकलन...
तिरपूर’ या शहराबद्दल तुम्ही फारसे ऐकले नसेल. मात्र, या शहरात तयार झालेल्या कुठल्या ना कुठल्या ब्रॅण्डचे कपडे तुम्ही कधी ना कधी परिधान केले असतील, हे मात्र नक्की. तिरपूरची ओळख करून देताना, जाणकार या शहराचे वर्णन असेच करतात. खरेतर भारतातील कुठल्याही शहरासारखे दिसेल, असेच हे शहर. या शहराला भारताची ‘निटवेअरची राजधानी’ म्हणून ओळखतात. विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराची, शानशौक कुठल्या अन्य शहराप्रमाणे नसेलही. पण, येथील उद्योगांच्या कामगिरीमुळे, आता जगभरातील माध्यमांच्या नजरा या शहराकडे वळल्या आहेत.
परिस्थिती प्रतिकूल असो वा कोणतेही संकट तोवे, जर तुम्ही तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडत राहिलात, तर एक दिवस जगही तुमच्या कार्याची दखल घेते, हेच या शहराने दाखवून दिले आहे. या शहराने २०२५-२६ या आर्थिक वर्षात, एकूण ४६ हजार कोटींची उलाढाल करून दाखवली आहे. ‘तिरपूर एसपोर्टर्स असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्के म्हणजेच, एक हजार, २५३ कोटी इतकी झाली आहे. युद्धाचे सावट, अमेरिकेचे आयातशुल्क या पार्श्वभूमीवरही, वाढ नोंदवण्यात ‘तिरपूर’ला यश आले. २०३० पर्यंत एकूण निर्यात ३० लाख कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य, असोसिएशनने ठेवले आहे.
भारताने सध्या एकूण कापड निर्यातीत २०३० पर्यंत ३८ अब्ज डॉलर्सवरून वाढ करून, शंभर अब्ज डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनीही, अलीकडेच या शहराचा दौरा केला होता. भारताच्या विणकाम वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या या शहराने, या वर्षातील एकूण उत्पादनाचा ६० टक्के वाटा उचलल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, आयातशुल्कासारख्या संकटाचा सामना करूनही, या शहराने फक्त तगच धरला नाही; तर या क्षेत्राला तारूनही नेले आहे.
‘बनियन सिटी’, ‘निटवेअर कॅपिटल ऑफ इंडिया’ आणि ‘डॉलर सिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्या या शहरात, देशातील कापूस उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन होते. येथे १० हजारांहून अधिक उद्योग कार्यरत असून, एकूण सहा लाख जणांना रोजगार देणारे या शहराने दिला आहे. पण, हे शहर जगाच्या नकाशावर इतके महत्त्वाचे का झाले, त्याचाही एक इतिहास आहे.
एकेकाळी या शहराला कृषिप्रधान शहर म्हणून ओळख होती. ७०च्या दशकात इटलीतील उद्योग समूहांशी झालेले करार, या शहराला निर्यातीकडे घेऊन गेले. विणकाम, रंगाई, प्रक्रिया, शिवणकाम आणि निर्यात यांची मजबूत औद्योगिक साखळीच, येथे विकसित झाली. युरोप, अमेरिका आणि पॅसिफिक देशांमध्ये ‘तिरपूर’च्या वस्त्रांना, मोठीच मागणी निर्माण झाली. यामुळे, भारताची जागतिक वस्त्रोद्योगातील ओळखही अधिक मजबूत झाली. इतका भरभक्कम इतिहास असणार्या या शहराला ‘कोरोना’ची झळ बसलीच होती. सहा लाख नोकर्या देणार्या कामगारांचे शहर असल्याने, हे शहर या महामारीपासून कसे नामानिराळे असेल? याकाळात इथल्या उद्योगाला दोन हजार, ४०० कोटींचे नुकसान सोसावे लागले. ‘मदरकेअर’ आणि ‘फॉरेवर २१’ या कंपन्यांनी तर दिवाळखोरीच जाहीर केली; पण या परिस्थितीवरही मात करून दाखवलीच.
लॉकडाऊननंतर सुमारे एक हजार युनिट्स मागे २० ते २५ टक्के कामगारांसह सुरू झालेला हा उद्योग, पुन्हा उभा राहिला. याकाळात ‘फेस मास्क’ला जगभरात मोठीच मागणी होती. संकटाकाळात मिळालेल्या संधीचे सोने तिरपूरवासी करणार नाहीत, असे कधीच होत नाही. त्याची प्रचिती पुन्हा आली. या निर्णयाचा फायदाच झाला आणि ढेपाळणार्या उद्योगाने पुन्हा उभारी घेतली. ‘कोविड’ महामारीच्या काळात चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, मास्क उत्पादन निर्णय फायदेशीर ठरला. देशांतर्गत मागणीही वाढली. मजबूत वितरण शृंखला, कुशल मनुष्यबळ, संकटातही न डगमगता सचोटीने काम हाकण्याचे कसब, यामुळे तिरपूरचे स्थान जागतिक पटलावर महत्त्वाचे झाले.
तिरपूरमध्येही आता पर्यावरणीय समस्याही उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया आणि शाश्वत उत्पादननिर्मितीची अंमलबजावणी ही तिरपूरसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळेच उद्योगांनी हरित तंत्रज्ञान, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक उत्पादननिर्मितीकडे वाटचाल सुरू केली आहे.
या उद्योगाने एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, सरकारकडे अतिरिक्त पाठबळाची गरज व्यक्त केली आहे. कामगारांसाठी निवारा, महिलांसाठी वसतिगृहे, कापसावरील आयातशुल्क माफी ही त्यांची अपेक्षा आहे. केंद्र सरकारतर्फे ‘एस्पान्शन अॅण्ड एम्प्लॉयमेंट मिशन’ (टीम) आणि ‘टेस इको’ हे महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात येत असून, पारंपरिक वस्त्रोद्योग लस्टरचे अत्याधुनिकीकरण याअंतर्गतच होणार आहे. भारतीय वस्त्रोद्योग स्पर्धात्मकता, अत्याधुनिकीकरण आणि शाश्वत उत्पादन पद्धतीअंतर्गत, तिरपूरला जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण होण्यास मदत होणार आहे.
वस्त्रोद्योग निर्यातीचा सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) लाभही, आता मिळणार आहे. डिजिटल मॉनिटरिंग, कौशल्य-विकास, पायाभूत सुविधा आणि राज्य सरकारच्या धोरणांशी समन्वय अशीच या उपक्रमाची रचना आहे. या धोरणांमुळे ‘तिरुपूर’चा वस्त्रोद्योग हा केवळ भारताच्या निर्यात अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार न राहता गुणवत्ता, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या बळावर, जागतिक वस्त्रोद्योगात भारताचे नेतृत्व अधिक मजबूत करणारा उद्योग म्हणून गणला जाईल, यात शंका नाही.