॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३०॥

    02-Jul-2026
 
Soundarya Lahari
 
भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणां
इति स्तोतुं वाञ्छन् कथयति
भवानि त्वमिति यः|
तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं
मुकुन्द-ब्रह्मेन्द्र स्फुट मकुट नीराजितपदाम्॥२२॥
अन्वय : यः भवानि त्वं दासे मयि सकरुणां दृष्टिं वितर इति स्तोतुं वाञ्छन् भवानि त्वम् इति (एव) कथयति, (हे भवानि,) त्वं तस्मै तदा एव मुकुन्द-ब्रह्म-इन्द्र-स्फुट-मकुट-नीराजित-पदाम् निज-सायुज्य-पदवीं दिशसि|
 
शब्दार्थ : ‘भव’ हे महादेव शिवाचे नाम आहे. जीवन देण्याचे, जीवन निर्माण करण्याचे सामर्थ्य म्हणजेच भव! शिवपत्नी श्री ललितादेवी, श्रीमाता या रूपात जीवन देण्याचे जीवनाच्या निर्मितीचे कार्य करते; म्हणूनच तिचे नाव भवानी (भव शिवाची पत्नी भवानी). ‘मन्मथ’ अर्थात कामदेव याचेसुद्धा एक नाम ‘भव’ आहे. शिवाने भस्मसात केलेल्या कामदेवाला तिने जीवनदान दिले आणि अनंग स्वरूप असूनही संपूर्ण विश्वावर राज्य करू शकेल, असे सामर्थ्यसुद्धा प्रदान केले म्हणूनच तिचे नाव भवानी!
या श्लोकात आचार्य शंकर भवानीच्या अपार करुणेचे आणि तिच्या भक्तवत्सल स्वभावाचे, अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन करतात. एखादा भक्त जेव्हा देवीची स्तुती करण्यास सिद्ध होतो, तेव्हा त्याच्या मनात पुढीलप्रमाणे विचार असतो, "हे भवानीमाते, तू माझ्यासारख्या दासावर करुणामय दृष्टी टाक.” पण भक्तीच्या भारावलेपणात, प्रेमाच्या उत्कटतेत किंवा शब्द जुळवण्याच्या असमर्थतेत त्याच्या मुखातून केवळ "भवानि त्वम्” इतकेच शब्द बाहेर पडतात; पुढचे वाक्य अपूर्णच राहते!
 
परंतु, ‘भवानी’ हे देवीला तिचे अत्यंत प्रिय असणारे नाव आहे. भक्त आपल्याला या नामाने हाक मारत असल्याचे पाहून ती इतकी प्रसन्न होते की, ती भक्ताच्या शब्दांची पूर्णता किंवा त्याच्या स्तवनाची व्याकरणशुद्धताही पाहात नाही; ती फक्त त्याच्या हृदयातील भाव, त्याची आर्तता, त्याचे शरणागत मन पाहून द्रवित होते. त्या अर्धवट उच्चारलेल्या नामातही तिला संपूर्ण भक्तीच दिसते आणि म्हणूनच ती क्षणार्धात त्या भक्ताला आपल्या सायुज्यपदाची प्राप्ती करून देते; अर्थात त्याला स्वतःशी तादात्म्य पावण्याचे, स्वतःमध्ये विलीन होण्याचे परमोच्च मोक्षपद बहाल करते.
 
हे पद किती श्रेष्ठ आहे, याचे वर्णन करताना आचार्य सांगतात की, मुकुंद अर्थात विष्णू, सृष्टिकर्ता ब्रह्मदेव आणि देवराज इंद्र हे तिन्ही महान देवताही स्वतःच्या मुकुटांनी त्या पदाची ‘नीराजन’ म्हणजे आरती करतात. त्यांचे मुकुट देवीच्या चरणांना स्पर्शून वंदन करतात. यातूनच हे स्पष्ट होते की, जे पद स्वतः त्रिमूर्तीदेखील वंदनीय मानतात, तेच पद भवानी आपल्या भक्ताला अत्यंत सहजपणे, केवळ त्याच्या प्रेमळ हाकेने देऊन टाकते. यातूनच देवीचे मातृवत्सल रूप उलगडत आहे. जशी आई आपल्या बाळाच्या अस्पष्ट, अपूर्ण बोबड्या बोलण्यातूनही त्याचे मन जाणते आणि त्याला प्रेमाने कवटाळते; तसेच भवानी आपल्या भक्ताच्या अपूर्ण स्तवनातही त्याची भक्ती ओळखते आणि त्याला मोक्षरूपी सर्वोच्च वरदान देऊन कृतार्थ करते.
 
सनातन धर्म परंपरेत मुक्तीच्या चार अवस्था मानल्या आहेत. सालोय मुक्ती, सारुप्य मुक्ती, सान्निध्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती. मुक्तीच्या या चारही अवस्थांच्या पलीकडील अवस्था म्हणजेच कैवल्यपद. सालोय मुक्तीमध्ये जीवात्मा सर्व स्वरूपाच्या सुख-दुःखाचा भोग घेत, द्वैती पद्धतीने ईश्वराची उपासना करत, आपला कर्मश्लेष कमी करत करत एका अशा टप्प्यावर पोहोचतो, जिथे त्याला इष्टदेवतेच्या लोकांत निवास करण्याचं भाग्य प्राप्त होतं. म्हणजेच, विष्णूचा उपासक असेल, तर तो विष्णुलोकांत जाईल, गणपतीचा उपासक असेल, तो गणेशलोकांत जाईल. हीच सालोय मुक्ती.
 
सारुप्य मुक्तीमध्ये साधक द्वैती उपासनेपासून प्रारंभ करतो. ही द्वैती उपासना करताना तो मूर्तिपूजा करतो. मूर्तिपूजा करताना त्याची आत्मोन्नती होऊन हळूहळू त्याला एका क्षणाला असं जाणवतं की, त्याच्या समोर असलेली ईश्वरी मूर्ती आणि तो स्वतः यांच्यामध्ये अभिन्नत्व आहे. साधकाला येणारी ही अनुभूती म्हणजेच सारुप्य मुक्ती. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते. रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा करताना कधीकधी इतके भावविभोर होऊन जात, की मातेच्या त्या स्वरूपाला स्वदेहामध्ये साक्षात अनुभवू लागत. अशा वेळी पूजा करताना, मग रामकृष्णांचा हातातली फुलं कालीमातेच्या मूर्तीवर अर्पण होण्याऐवजी स्वदेहावरच अर्पण होत. हीच सारुप्य मुक्ती.
 
सान्निध्य मुक्तीमध्ये साधकाला त्याच्या उपास्य ईश्वरी शक्तीच्या सहवासाचा लाभ होतो. जसं श्री ललितांबिकेच्या सेवेत अष्टवाग्देवी असतात, त्या सान्निध्य मुक्ती अनुभवत आहेत. किंवा असा उल्लेख केला जातो की ‘परमहंस’ या पदाला प्राप्त झालेले जे उपासक असतात, ते ललितादेवीच्या राजवाड्यात कारंडव करत निवास करतात. ते श्री ललितादेवीच्या पदन्यासाची नक्कल करत, तिच्याप्रमाणे डौलदार चालण्याचाही प्रयास करतात. परमहंसपदाला प्राप्त झालेले जे साधक आहेत, ते सान्निध्य मुक्ती अनुभवत आहेत. सान्निध्य मुक्ती अनुभवणार्‍या उपासकाला ईश्वरी शक्तीच्या सान्निध्याचा जसा लाभ होतो, तसंच तिच्या रूपाचा, तिच्या गुणांचा अभ्यास करण्याची त्याची पात्रता तयार होते. त्यामुळेच ईश्वरी शक्तीला साकल्याने जाणून घेणे त्याला शक्य होते.
 
ब्रह्म, विष्णू आणि महेश आणि इंद्रासारखे अन्य देवी-देवता हे श्री ललितांबिकेच्या सेवेमध्ये नित्य सादर असतात. त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांना श्री ललितादेवीच्या स्वरूपाचं, सौंदर्याचं, तिच्या गुणांचं अत्यंत कौतुक असतं. ते जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकताही असते. परंतु, देवीच्या सेवेमध्ये असलेल्या या सेवकांची वाणीदेखील, देवीच्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन करण्यात अपयशी ठरते. अशा वेळी या देवपत्नी अत्यंत दुष्कर असं व्रत स्वीकारून, शिवाची म्हणजे परमशिवाची उपासना सुरू करतात. कारण, श्री ललितादेवीच्या सान्निध्याचा लाभ, त्या शिव-स्वरूप झाल्यानंतरच त्यांना प्राप्त होणार आहे. अर्थात, ईश्वरी शक्तीचे सान्निध्य लाभल्याने, ईश्वरी शक्तीच्या सर्व गुणांना जाणून घेणे आपल्याला शय होते; त्या गुणांना आत्मसात करणेही शय होते. त्यातूनच आपल्या मोक्षाचा मार्ग अधिक प्रशस्त होतो. हीच सान्निध्य मुक्ती.
 
चौथ्या प्रकारची मुक्ती आहे, सायुज्ज मुक्ती. यामध्ये साधक किंवा उपासक हा आपल्या उपास्य शक्तीमध्ये सर्वार्थाने विलीन होतो. म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही. देवीशी युद्ध करणारे जे राक्षस होते, ते सर्व तिची ‘विरुद्धभक्ती’ करायचे. म्हणजेच देवीच्या गुणांचा, तिच्या रूपाचा, तिच्या सामर्थ्याचा ते द्वेष करत. पण ही द्वेषरूपी उपासनाच आहे, तिचा उल्लेख ‘विरुद्धभक्ती’ असा केला जातो. हीसुद्धा इतकी पराकोटीची असायची आणि त्यातून इतकं अफाट सामर्थ्य प्राप्त व्हायचं, की त्यातून ते त्रैलोयावर राज्य करण्यास पात्र होत. परंतु तरीही, देवीबद्दल असलेला त्यांचा द्वेष किंवा ‘विरुद्धभाव’ हा देवीशी थेट संघर्ष करण्यासाठी त्यांना उद्युक्त करत असे. ज्यावेळी ते देवीशी थेट संघर्ष करत आणि देवीच्या हातून या असुरांच्या मृत्यूची वेळ येते, त्यावेळी मरणप्राय यातना सोसणारे हे असुर देवीला एकच वरदान मागतात, की आम्हाला तू सायुज्य मुक्ती प्रदान कर. अर्थात आम्हाला तुझ्यामध्ये विलीन होऊ दे; त्याशिवाय वेगळं स्वरूप किंवा वेगळं अस्तित्वच आम्हाला नको. हीच सायुज्य मुक्ती.
 
भवानी रूपाचे केवळ स्मरण साधकाला सायुज्य मुक्तीचा लाभ घडवून देते, असे आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहेत. अर्थात, निखळ भक्तीमध्येही तुम्हाला मुक्ती प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे, हेच आचार्य इथे ध्वनित करत आहेत. देवीच्या भवानी या रूपाची, एखाद्या साधकाला उपासना करायची असेल किंवा नामस्मरण करायचे असेल, तर त्याने आदि शंकराचार्य विरचित ‘भवानी अष्टकम्’ हे स्तोत्र पठण करावे. अत्यंत सुमधुर भावपूर्ण आणि ध्यान लागू शकेल, असे गेय स्तोत्र आहे. ‘गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि’ हे स्तोत्र परम शरणागत भावाने रचिले आणि गायले जाते, साधकाचे अष्टसात्त्विक भाव जागृत करण्याचे सामर्थ्यही या स्तोत्रात आहे.
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर