मुंबई हे कधीही न थांबणारे शहर. येथे वेळ धावतो, माणसे धावतात आणि आयुष्यही धावतच पुढे सरकते. या अखंड गतीत काही ठिकाणे मात्र माणसाला स्वतःशी भेट घडवतात. दादरमधील परमपूज्य श्रीरामकृष्ण जांभेकर महाराज समाधीमंदिर हे त्यांपैकीच एक. या मठात पाऊल ठेवले की, महानगराचा कोलाहल मागे पडतो आणि भारतीय संतपरंपरेने जपलेली साधना, सेवा आणि लोककल्याणाची अखंड परंपरा नव्याने उलगडू लागते.
नरसेवा हीच नारायणसेवा हा विचार आपण सहज उच्चारतो; परंतु तो संतांनी जगला. भारतीय संतपरंपरेचे वैशिष्ट्य हेच की, तिने अध्यात्माला कोणत्याही चौकटीत बंदिस्त केले नाही. संतांनी ईश्वराचा शोध हिमालयात जितका घेतला, तितकाच तो समाजातील दुःखी,पीडित माणसामध्येही घेतला. म्हणूनच भारतीय परंपरेतील मठमंदिरे ही लोककल्याणाची केंद्रे झाली. यामध्ये जसे ध्यान होते; तसेच अन्नदानही होते. येथे मंत्रजागराबरोबरच, रुग्णसेवा, निराधारांना आधार आणि भरकटलेल्या जीवनाला दिशा देण्याचे कार्यही अविरत चालते. अध्यात्म आणि जनसेवा यांचा हा समन्वय, हाच भारतीय मठसंस्थेची खरी ओळख!
मुंबईच्या दादर परिसरातील समुद्रालगत, भागोजी कीर स्मशानभूमी लगत असलेले परमपूज्य श्रीरामकृष्ण जांभेकर महाराज समाधीमंदिर ही त्या परंपरेची अर्थपूर्ण अभिव्यक्ती. हे या मठाचे स्थान पाहताना, प्रथमच लक्ष वेधून घेते, ते त्याचे साधेपण. येथे भव्यतेचा आग्रह नाही; आहे तो फक्त साधनेचा! येथे सेवेची परंपराच मोठी आहे. या मठाकडे केवळ धार्मिक स्थळ म्हणून पाहिले, तर त्याचे महत्त्व अपूर्णच राहील. कारण हा मठ एका अशा एका विभूतींचा वारसा जपत आहे, ज्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक सिद्धीचा उपयोग समाजाच्या दुःखनिवारणासाठी केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोंबुर्ले या गावाशी जडलेली श्रीरामकृष्ण जांभेकर महाराजांची जीवनकथा सामान्य माणसाच्या आयुष्यासारखीच. पोस्ट खात्यातील नोकरी, संसारातील जबाबदार्या, जीवनातील आघात आणि त्यातून अधिकाधिक दृढ होत गेलेली गायत्री मंत्रावरील निष्ठा,या सर्वांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ त्यांना साधनेच्या अधिक जवळ घेऊन गेली. सय्यद बाबांच्या सान्निध्यात मिळालेली आध्यात्मिक दिशा, त्यानंतरचे वैराग्य आणि अखेरीस लोककल्याणासाठी केलेले संपूर्ण समर्पण, यामुळे त्यांना संतपद प्राप्त झाले. पण त्यांनी सिद्धी आणि चमत्काराने गर्दी जमवण्यापेक्षा, जनसेवेलाच प्राथमिकता दिली.
जांभेकर महाराजांच्या जीवनाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे, क्षमता असूनही त्यांनी कधीही स्वतःभोवती दैवी वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या ठायी सिद्धींचे उल्लेख आढळतात; परंतु महाराजांनी त्या सिद्धींना साधनेचे ध्येय मानले नाही. उलट, दुःखी माणसाला श्रद्धेकडे वळविण्यासाठी, त्याच्या मनात ईश्वराविषयी विश्वास जागविण्यासाठीच त्या सामर्थ्याचा उपयोग केला. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा चित्तपरिवर्तन असल्याचेच त्यांच्या चरित्रातून दिसते.
महाराजांची अक्कलकोट स्वामी समर्थांप्रति नितांत श्रद्धा होती. तसेच, शिर्डीच्या साईबाबांप्रतिही त्यांच्या मनात तोच भाव होता. महाराज प्रत्येक बाबतीत स्वामी समर्थांचा सल्ला घेत. स्वामी समर्थांना ते आजोबा, तर साईबाबांना पिता म्हणत. दुःख आणि संकटे घेऊन येणार्यांना ते तुझे गार्हाणे आजोबांपुढे मांडल्याचेही अनेकदा सांगत. मठामध्ये त्यांनी स्वामी समर्थांची तसबीर लावली होती. कोणी काही खायला आणल्यास, महाराज त्याचा नैवेद्य सर्वप्रथम स्वामींना दाखवत. अक्कलकोट येथे मुक्कामी जाऊन, समर्थसेवा करणे, हा तर महाराजांसाठी परमानंदाचा क्षण.
त्यांच्या शिकवणीत कर्म आणि भक्ती यांच्या अद्वैताचे दर्शन होते. नामस्मरण करा, पण निष्क्रिय राहू नका, श्रम करा; कारण श्रमाशिवाय आत्मसन्मान जागत नाही, व्यसनांपासून दूर राहा; कारण चित्तशुद्धीशिवाय साधना निष्फळ, कर्जाच्या मोहात अडकू नका; कारण परावलंबित्व मनुष्याचे स्वातंत्र्य हिरावून घेते अशी महाराजांची जनसामान्यांना दिलेली शिकवण होती. अन्नदानाचे महत्त्व महाराजांनी कृतीतून दाखवून दिले. त्याकाळीही मठामध्ये २५० ते ३०० माणसांच्या पंगती उठत. महाराजांच्या याच विचारांचे मूर्त रूप आजही या मठात दिसते.
आज धार्मिक संस्थांचे मूल्यमापन अनेकदा त्यांच्या वास्तूंच्या भव्यतेवर किंवा गर्दीवर केले जाते. परंतु, एखाद्या मठाचे खरे महत्त्व तेथे किती लोक आले, यावर ठरत नाही; तर तेथून किती लोक अधिक सजग, अधिक संवेदनशील आणि अधिक कर्तव्यनिष्ठ होऊन बाहेर पडले, यावर ठरते. जांभेकर महाराजांचा मठ या अर्थाने एक संस्कारपीठच आहे!
१९४० मध्ये महाराजांच्या महासमाधीनंतर दादर येथील समाधीमंदिर त्यांच्या विचारांचे केंद्र बनले. आज या पवित्र परिसरात चार संतमहात्म्यांच्याही समाधी आहेत. या समाधी भारतीय संतपरंपरेतील अखंड गुरुशिष्य परंपरेच्या साक्षीदार ठरतात. या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे उपासना आणि सेवा यांची फारकत पडलेली नाही. नित्यपूजा, आरती, नामस्मरण, गायत्री उपासना, पारायणे आणि विविध धार्मिक अनुष्ठाने यांबरोबरच, अन्नदानाची परंपरा आजही अखंड सुरू आहे. महाराजांनी आयुष्यभर जपलेला ‘भूतदया हेचि भांडवल संता’ हा विचार आजही या संस्थेच्या कार्यातून प्रत्ययास येतो. अन्नदान हा साधनेचाच अविभाज्य भाग मानले जाते.
महाराजांनी आपल्या आयुष्यात कीर्तन, नामस्मरण आणि सत्संग यांना समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम मानले. त्याच परंपरेला पुढे नेत आजही या संस्थेत कीर्तनसेवेचे संवर्धन केले जाते. नव्या पिढीतील युवकांनी संतवाङ्मय, अभंग, हरिकथा आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा अभ्यास करावा, या हेतूने कीर्तन प्रशिक्षणाची परंपरा सुरू आहे. हा उपक्रम केवळ कलाविकासासाठी नसून, संस्कारक्षम समाजनिर्मितीचा प्रयत्न आहे.
संस्थेच्या कार्यात आधुनिक काळाशी साधलेला संवादही महत्त्वाचा. ‘बिल्वपत्र भक्तिसार’ या ग्रंथाचे सामुदायिक पारायण, विविध धार्मिक उत्सवांचे सुसुत्र आयोजन, गुरुपौर्णिमा, नवरात्र, दत्तजयंती, माघोत्सव यांसारख्या पर्वकाळात होणारे आध्यात्मिक कार्यक्रम आणि भाविकांचा वाढता सहभाग या सर्वांमधून, परंपराही जपल्या जातात.
समाजोपयोगी कार्यालाही या संस्थेने तितकेच महत्त्व दिले आहे. गरजूंच्या वैद्यकीय गरजांसाठी उभारलेला माऊली संजीवन मदत निधी हे याचे उत्तम उदाहरण, तसेच विविध सेवायोजना आणि भक्तांच्या सहभागातून राबवल्या जाणार्या उपक्रमाच्या माध्यमातून, संस्थेने महाराजांच्या लोककल्याणाच्या संकल्पनेला जपले आहे. सेवा ही कृपा दाखविण्याची गोष्ट नसून, ईश्वराने दिलेल्या सामर्थ्याचे समाजाला अर्पण आहे, हा भारतीय अध्यात्माचा विचारच संस्थेच्या कार्याचा गाभा आहे.
या सर्व कार्यामुळेच दादर येथील श्रीरामकृष्ण जांभेकर महाराजांच्या मठाचा आवाका हा एका संताच्या समाधी मंदिरा इतकाच मर्यादित राहात नसून, तो भारतीय संतपरंपरेतील त्या चिरंतन विचाराचा वाहकही ठरतो. यामध्ये भक्ती आणि सेवा, साधना आणि समाजकारण, श्रद्धा आणि उत्तरदायित्व यांचा सुंदर समन्वय आढळतो. म्हणूनच, सेवा, साधना अणि समाजसेवेच्या माध्यमातून जांभेकर महाराजांच्या विचारांचा प्रसार करत, संतांनी प्रज्वलित केलेला दीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ‘श्री रामकृष्ण जांभेकर महाराज सेवा समिती’ अव्याहतपणे करत आहे, असे म्हणता येते.