मुंबई: (Sakinaka Open Manhole Accident) मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमुळे एक जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा सुमारे चार तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख अस्लम शेख अशी झाली असून या घटनेमुळे मुंबईतील पावसाळी सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Sakinaka Open Manhole Accident)
प्राथमिक माहितीनुसार, खैरानी रोडवर एका खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. यासाठी मॅनहोलचे झाकण उघडण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी नागरिकांना इशारा देण्यासाठी आवश्यक बॅरिकेड्स किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने उघडा मॅनहोल दिसून न आल्याने अस्लम शेख यांचा तोल गेला आणि ते थेट मॅनहोलमध्ये पडले. (Sakinaka Open Manhole Accident)
घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान शेख यांची छत्री आणि चप्पल सापडली होती. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने ते वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती. (Sakinaka Open Manhole Accident)
अखेर सुमारे चार तासांच्या शोधमोहीमेनंतर अग्निशमन दलाने अस्लम शेख यांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी नेमके कोणते काम सुरू होते, याची माहिती महानगरपालिकेकडे नव्हती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Sakinaka Open Manhole Accident)
या घटनेनंतर उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून अशा परिस्थितीत उघडे मॅनहोल नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. (Sakinaka Open Manhole Accident)