झोप हरवलेले वैद्य

    02-Jul-2026   

Overworked Doctors 
 
काल जागतिक डॉक्टर दिनानिमित्त, आपण अनेक डॉक्टरांचे आभार मानले. रुग्णांसाठी दिवस-रात्र झटणार्‍या या सेवाभावी वर्गाला शुभेच्छाही दिल्या. मात्र, त्याच वेळी समोर आलेले वास्तव तेवढेच चिंताजनक आहे. रुग्णांचे प्राण वाचवणारे निवासी डॉक्टरच अपुरी झोप, सलग ३६ तासांहून अधिक ड्युटी आणि वाढत्या मानसिक ताणामुळे, गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ डॉक्टरांचाच नसून, संपूर्ण आरोग्यव्यवस्थेशी संबंधित आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’च्या ‘रिव्हा मेडिकल सिस्टम (आरएमएस) २.०’ सर्वेक्षणानुसार, राज्यातील १०९ निवासी डॉक्टरांपैकी ५३.२ टक्के डॉटर्स, सलग ३६ तासांहून अधिक ड्युटी करतात, तर ५६ टक्के डॉक्टरांना त्यानंतरही आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही. तब्बल ८२.६ टक्के डॉक्टरांनी तर पुरेशी झोप मिळत नसल्याचेच सांगितले असून, ६१.५ टक्के डॉक्टर्स कामाचा ताण अत्यंत जास्त असल्याचे मान्य करतात. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, १६.५ टक्के डॉक्टरांनी आत्महत्येचे विचार येत असल्याचेही नमूद केले.
 
रुग्णालयातील आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया आणि वॉर्ड यांची जबाबदारी, मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टरांवर असते. मात्र, वाढता रुग्णभार, रिक्त पदे आणि मर्यादित मनुष्यबळ यामुळे, त्यांच्यावर असह्य ताण पडत आहे. थकलेल्या डॉक्टरांकडून अखंड सेवा करुन घेणे म्हणजेच, रुग्णांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. यामुळे डॉक्टरांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होणे, उपचारात चुका होण्याचा धोका वाढणे आणि डॉक्टरांचे वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होणे, हेही या समस्येमागचे गंभीर पैलू आहेत. डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचेच. पण, त्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे वातावरण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कामाचे तास, पुरेशी विश्रांती, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची सुविधा, रिक्त पदे भरुन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, ही आता केवळ डॉक्टरांचीच नव्हे; तर संपूर्ण आरोग्यव्यवस्थेची गरज झाली आहे. निरोगी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम डॉक्टरच अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि विश्वासार्ह रुग्णसेवा देऊ शकतात, हे विसरून चालणार नाही.
 
आमिषाचा सापळा
 
उच्च पगार, मोफत निवास, तातडीची भरती आणि परदेशात उज्ज्वल भवितव्य अशा आकर्षक आश्वासनांनी, सध्या अनेक तरुण सामाज माध्यमांवरच्या जाहिरातींकडे आकर्षित होत आहेत. मात्र, थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागांत अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची, व्यथा या स्वप्नामागील भीषण वास्तवावर प्रकाश टाकते. ही केवळ रोजगारातीलच फसवणूक नसून, डिजिटल माध्यमांच्या वापराने होणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारीचे गंभीर स्वरूपही यातून अधोरेखित होते. प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील २५हून अधिक; तर देशभरातील ४००पेक्षा अधिक युवक या जाळ्यात अडकले आहेत. फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवून गेलेल्या तरुणांना, नंतर म्यानमार सीमावर्ती भागांत बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून दररोज १६ ते १८ तास ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे काम करून घेतले जात असल्याची माहिती, त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, मानसिक छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचाही सामना या तरुणांना करावा लागत आहे.
 
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अडकलेल्या तरुणांशी संवाद साधला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून त्यांच्या सुरक्षित सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतूनच एक महत्त्वाचा धडा समोर येतो. परदेशात नोकरी शोधताना, केवळ सामाजिक माध्यमांवरील जाहिराती किंवा एजंटांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. संबंधित कंपनीची नोंदणी, भरती संस्थेची अधिकृत मान्यता, रोजगार करार आणि ‘व्हिसा’ प्रक्रियेची स्वतंत्र पडताळणी करणेही अत्यावश्यक आहे. रोजगाराच्या संधींचे स्वागत व्हायलाच हवे. मात्र, आकर्षक आमिषे आणि विश्वासार्ह संधी यांतील फरक ओळखणेही तितकेच आवश्यक आहे. एका चुकीच्या निर्णयाची किंमत कधीकधी स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि आयुष्याच्या रूपाने मोजावी लागू शकते. त्यामुळे परदेशातील नोकरीची कोणतीही संधी स्वीकारण्यापूर्वी, सखोल पडताळणी हाच सुरक्षित मार्ग ठरतो.




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर