मुंबई (Nitin Gadkari on India's Cultural Unity) : श्रीगुरुजींच्या विचारांच्या आधारे आपल्याला देशाचा आर्थिक विकास साधायचा आहे. सरकार आणि गुंतवणूकदारांनी मिळून एकत्र येत २१ व्या शतकात भारताला एक समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करायचा आहे. त्याचबरोबर, मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीच्या आधारे व्यक्तिनिर्माणाचे कार्य करून प्रगती आणि विकासाचा डोलारा जर सांभाळायचा असेल, तर'चरित्रवान नागरिकांची रचना देखील तेवढेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित 'कालजयी श्रीगुरुजी' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. २ जुलै रोजी निको हॉल, वडळा येथे संपन्न झाला. या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळ विभागाचे विभाग संघचालक रवींद्र संघवी, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, विवेक पुस्तक प्रकाशन विभागाचे संपादक रवींद्र गोळे, विशेषांकाचे मुख्य प्रायोजक केतन वेल्हाळ आणि प्रताप नरसिंह मूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, वर्तमानकाळात जगणारे अनेक नेते असतात, परंतु भविष्य कसे घडावे याकरिता चिंतन करून जे दूरगामी कार्य करतात, त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक 'श्रीगुरुजी' यांचे व्यक्तिमत्व अग्रस्थानी होते. त्यांची दूरदृष्टी, त्यांचा निर्धार आणि त्यांनी संघाला दिलेली दिशा ही आजच्या आधुनिक काळातही तेवढीच महत्त्वाची आणि मार्गदर्शक आहे. आजच्या काळात राष्ट्रीय विचारांना जी देशव्यापी मान्यता मिळाली आहे, त्याचे संपूर्ण श्रेय श्रीगुरुजींच्या विचारधारेला जाते. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
📍मुंबई
साप्ताहिक विवेक'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य द्वितीय सरसंघचालक आदरणीय गोळवलकर गुरुजी यांच्या जीवन कार्यावर आधारित 'कालजयी श्रीगुरुजी' या विशेषांकाचे आज प्रकाशन केले व कार्यक्रमाला संबोधित केले.
संघ स्थापनेबाबत बोलताना गडकरी म्हणाले, भूतकाळात समाजात राष्ट्रीय चेतनेची कमतरता असल्यामुळे आपला समाज विभाजित झाला होता. इंग्रजांच्या इतिहासाचे मूल्यांकन केल्यास हे स्पष्ट होते की, सुरुवातीला त्यांच्याजवळ फार मोठी फौज किंवा अफाट सामर्थ्य नव्हते; मात्र दुर्भाग्याने आपल्या देशातील सर्व राज्ये एका छत्राखाली एकत्र येऊ शकली नाहीत. आपला समाज जातीयवाद, संप्रदायिकता, विषमता आणि विविध प्रकारच्या सामाजिक दोषांमुळे ग्रस्त होता. अशा परिस्थितीत, समाजाची रचना ही मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीवर व्हावी आणि याच भक्कम आधारावर राष्ट्र पुन्हा उभे राहावे, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
पुढे ते म्हणाले, संघ संस्थापक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि प.पू. श्रीगुरुजी यांनी नेहमीच राजकारणाला सिमित महत्त्व दिले. त्यांचे मूळ 'मिशन' हे 'राष्ट्रकारण' करणे हेच होते. राष्ट्रनिर्माणाच्या या पवित्र कार्याला कोणताही 'शॉर्टकट' असू शकत नाही, तर ते प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या आचरणातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्र आणि समाजाचा मूळ घटक हा व्यक्ती आहे. जोपर्यंत आपण अशा व्यक्तींवर उत्तम संस्कार करून योग्य 'व्यक्तिनिर्माण' करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही, हा डॉ. हेडगेवारांचा सिद्धांत संघाने नेहमीच पुढे चालवला. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
सामाजिक समरसता हीच खरी राष्ट्रभक्ती असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, देशात आर्थिक समानता जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच सामाजिक समरसताही आवश्यक आहे. कोणताही व्यक्ती जात, पंथ, धर्म किंवा भाषेने मोठा ठरत नसून, तो केवळ स्वतःच्या गुणवत्तेने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले हे विचारवंत आणि महापुरुष कुठल्या एका विशिष्ट जातीचे नसून ते संपूर्ण समाजाचे आणि राष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे कोणताही संकुचित भाव मनात न ठेवता, 'हे राष्ट्र एक आहे आणि या राष्ट्राचा भाव एक आहे' ही भावना जोपासली पाहिजे. आपण सर्वांनी संघटित होऊन एकात्म राष्ट्र होणे हीच खऱ्या अर्थाने खरी राष्ट्रभक्ती आहे. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
यावेळी विश्राम बापट लिखित ‘संघ शाखेची गोष्ट’ या पुस्तिकेचे आणि १०१ प्रचारकांची माहिती सांगणारे ‘समिधा’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पुस्तक प्रकाशन विभागाचे संपादक रवींद्र गोळे यांनी केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
भारताची एकात्मता केवळ राजकीय नसून सांस्कृतिक असणेही महत्त्वाचे
संघाच्या विचारांमध्ये 'इंटिग्रेटेड अप्रोच' (एकात्मिक दृष्टिकोन) आहे. याचा अर्थ एका बाजूला समाजाची भौतिक प्रगती आणि विकास तर व्हायलाच हवा, परंतु हा विकास होत असताना 'व्यक्तिकेंद्रीत' समाजव्यवस्था कशी घडवता येईल, यावर भर दिला पाहिजे. आर्थिक संपन्नतेसोबतच समाजाचा एकमेकांवरील विश्वास जपून 'एकात्म समाज' निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे भारताची एकात्मता केवळ राजकीय नसून सांस्कृतिक असणेही महत्त्वाचे असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
पाश्चात्यीकरण नको, आधुनिकीकरण हवे!
आजच्या युगात 'पाश्चात्यीकरण' आणि 'आधुनिकीकरण' या दोन गोष्टींमधील फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या समाजाचे पाश्चात्यीकरण होता कामा नये, मात्र आधुनिकीकरण निश्चितपणे व्हायला हवे. ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सकारात्मक परिवर्तन स्वीकारले पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. (Nitin Gadkari on India's Cultural Unity)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक