मुंबई पालिकेचा कडक निर्णय; पदोन्नती नाकारणाऱ्यांना दोन वर्षे 'नो-प्रमोशन'

    02-Jul-2026

Mumbai BMC Promotion Policy
 
मुंबई (Mumbai BMC Promotion Policy) : मुंबई महानगरपालिकेत पदोन्नती नाकारणाऱ्या आणि नवीन पदावर रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता पालिका प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. सुधारित धोरणानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नती नाकारली, तर त्याला पुढील दोन वर्षांसाठी पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे.
 
कर्मचाऱ्यांकडून वारंवार पदोन्नती नाकारली जाणे किंवा वेळेत पदभार न स्वीकारणे, यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत होता. नुकतेच, पालिकेच्या १७ सहाय्यक अभियंत्यांनी आणि दोन कार्यकारी अभियंत्यांनी पदोन्नती नाकारल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी प्रशासनाला यामागची कारणे शोधण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर जुन्या धोरणाचा आढावा घेऊन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी हे नवीन परिपत्रक जारी केले. (Mumbai BMC Promotion Policy)
 
नवीन नियमावलीनुसार, पदोन्नतीचे आदेश कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात आणि ई-मेलद्वारे पाठवले जातील. आदेश मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा लागेल. लेखी पत्र किंवा ई-मेल यापैकी जे आधी मिळेल, तीच तारीख अंतिम मानली जाईल. जर एखादा कर्मचारी १५ दिवसांत नवीन पदावर रुजू झाला नाही, तर त्याने पदोन्नती नाकारली असल्याचे आपोआप गृहीत धरले जाईल आणि त्याला याची लेखी कारणे सक्षम प्राधिकरणाकडे द्यावी लागतील. तसेच, पदोन्नतीचे आदेश मिळाल्यानंतर संबंधित विभाग प्रमुखांना त्या कर्मचाऱ्याला सात दिवसांच्या आत कार्यमुक्त करणे बंधनकारक असेल. विभाग प्रमुखांनी तसे न केल्यास, कर्मचारी थेट नवीन पदावर रुजू होऊ शकतात. (Mumbai BMC Promotion Policy)
 
पदोन्नती नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुढील दोन वर्षे पदोन्नतीसाठी विचार केला जाणार नाही. हा काळ संपल्यानंतर कर्मचाऱ्याला स्वतःहून नवीन अर्ज करावा लागेल; ही पात्रता आपोआप पुनर्संचयित होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, असे कर्मचारी आपली जुनी सेवा ज्येष्ठता गमावतील आणि या काळात पदोन्नती मिळालेले त्यांचे कनिष्ठ कर्मचारी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ ठरतील. केवळ बदली टाळण्यासाठी जर कोणी पदोन्नती नाकारत असेल, तर अशा कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली केली जाऊ शकते. तसेच जे कर्मचारी स्वतःहून खालच्या पदावर जाण्याची विनंती करतील, त्यांनाही दोन वर्षे पदोन्नती मिळणार नाही. पालिकेने १९ सप्टेंबर १९९२ चे जुने नियम रद्द करून हे नवीन परिपत्रक तात्काळ प्रभावाने लागू केले आहे. (Mumbai BMC Promotion Policy)
 
 




संबंधित मजकूर