फाळणीदरम्यान पाकिस्तानातून आलेले लोक शरणार्थी नसून ते विस्थापित होते; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    02-Jul-2026   

मुंबई: (Mohan Bhagwat)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजकारण, फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या विस्थापितांचे योगदान, संघर्षमय जीवन आणि शिक्षणाच्या उद्देशाविषयी आपले विचार मांडले. फाळणीच्या काळात सर्वस्वाचा त्याग करून भारतात आलेल्या लोकांचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले, ज्यांच्याकडे काहीच उरले नव्हते, त्यांनी बसून रडण्याचा मार्ग स्वीकारला नाही. सर्व काही गमावून ते भारतात आले आणि पुन्हा नव्याने आपले जीवन उभे केले. ते शरणार्थी नव्हते, तर विस्थापित होते." (Mohan Bhagwat)

उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी आपले घर, संपत्ती, व्यवसाय, शेती सर्व काही सोडले; कारण त्यांना भारतभूमीवर राहायचे होते. अशा भूमीवर राहायचे होते, जिथे ते आपल्या धर्माचे, स्वातंत्र्याचे पालन करू शकतील. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या उभी केलेली संपत्ती सोडून ते भारतात आले. त्या काळात त्यांच्यासाठी चुकीचा शब्द वापरला गेला. ते आपल्या मातृभूमीवरील प्रेमामुळे आणि धर्मनिष्ठेमुळे संघर्ष करणारे योद्धे होते. भारत अखंड ठेवण्याची लढाई आपण हरलो होतो; पण त्यांनी संपत्ती किंवा करिअरची निवड केली नाही, तर देश आणि धर्माची निवड केली. परिस्थिती कायमस्वरूपी नसते; ती बदलत असते." (Mohan Bhagwat)

शिक्षणाच्या उद्देशावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले, उपजीविकेसाठीचे शिक्षण आवश्यक आहे, पण तेवढेच अंतिम नाही. औपचारिक शिक्षण नसतानाही अनेक लोक मोठे होतात आणि शिक्षितांना रोजगार देतात. खरे शिक्षण म्हणजे विवेक प्राप्त करणे. त्याची सुरुवात घरातून होते आणि आई हीच मुलाची पहिली शिक्षिका असते." भगवान बुद्धांच्या शिकवणीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, "ज्या कृतीमुळे दुसऱ्याला दुःख किंवा त्रास होतो, ते पाप आहे आणि अशा कृतींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे." (Mohan Bhagwat)

ते पुढे म्हणाले, "मानवजातीला जीवनाचे ध्येय देणे आवश्यक आहे. माणसाने केवळ स्वतःसाठी जगू नये, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि इतरांच्या हितासाठी जगावे. स्वतः चांगले आचरण करून इतरांनाही चांगुलपणाची प्रेरणा द्यावी. उपदेशाने नव्हे, तर आपल्या कृतीतून मूल्यांचे दर्शन घडविणे हीच भारतीय जीवनपद्धती आहे." (Mohan Bhagwat)

या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mohan Bhagwat)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर