॥गीतासार भाग २०॥

    02-Jul-2026
 
 
Gita Saar
 
धर्म
 
मागील लेखात आपण पाहिले की, ग्रहण केल्या जाणार्‍या संस्कारांना ‘धर्म’ म्हणतात, जी मूलतत्त्वांची उस्फूर्त अवस्था आहे. ही अवस्था सतत ग्रहण केल्या जाणार्‍या संस्कारांनी येते. धर्म म्हणजेच मूळअवस्थेची धारणाशक्ती, जिच्याद्वारे ती मूळ अवस्था आपला सर्व व्यापार करते. या दृढ धारणाशक्तीला वेदव्यास ‘धर्म’ असे म्हणतात. प्राणवायू आणि उद्जन वायूचा धर्म असा आहे की, सहजपणे एकमेकांशी संयुक्त होऊन एक नवा जलरूप पदार्थ बनविणे. या दोघांमधील संतुलित अवस्था जर बदलली, तर पाण्याऐवजी हायड्रोजन पॅरॉसाईड (H2.O2.) पदार्थ बनतो. ही मूलतत्वे (Elements) ओतांच्या (Electrons) परस्परसापेक्ष काळ, अवस्था आणि गतीने घडलेले असतात. आठ ओत अशा प्रकारे सापेक्ष काळात, सापेक्ष गतीने आणि सापेक्ष अवस्थेमध्ये आल्यामुळे प्राणवायू होतो. चार सापेक्ष ओतांनी नत्रवायू (Nitrogen) बनतो. अशा प्रकारे ओतांच्या सापेक्ष काळ, गती आणि अवस्थेद्वारेच ही सर्व मूलतत्त्वे बनली आहेत. ही मूलतत्त्वे आज ११४ मानली गेली आहेत, ज्यांच्यापासून इतर सर्व पदार्थ झाले. या मूलतत्त्वांची आपापली एक धारणा असते, ज्याला त्या मूलतत्त्वाचा स्वभाव किंवा धर्म म्हणतात. अशा तर्‍हेने प्रत्येक अस्तित्व आपल्या धर्मावरच स्थित आहे, ज्यामुळेच या विश्वाचा विस्तार आणि विकास संभव आहे.
 
असे मानले जाते की, आजचा मानव हा अमिबापासून उत्पन्न झाला. प्रत्येक प्राणी अवस्थेचा किंवा योनीचा एक धर्म असतो. या प्राणिधर्मातसुद्धा अतिशय मंद गतीने, परंतु निश्चित रूपाने त्या प्राणिमात्रांची उत्क्रांती होते. धर्मामुळे उत्क्रांती संभव आहे आणि उत्क्रांतीमुळे धर्म. धर्म आणि उत्क्रांतीचा हा परस्पर विनियोग सदासर्वकाळ चालू आहे. गीतेच्या धर्माची परिभाषा, अशा प्रकारेच आपापल्या मूळ अवस्थेच्या ग्रहणशक्तीवर आधारित आहे. गायीच्या जठराची उत्क्रांती अवस्था, तिला गवत खाण्यास भाग पाडते आणि वाघाच्या जठराची प्राप्त अवस्था मांसभक्षण करण्यास भाग पाडते. ही अनिवार्यता त्या प्राणिमात्राचा स्वभाव अथवा रस होतो आणि तोच त्या प्राणिमात्राचा धर्म होय. गाय आणि वाघाचे आपापले धर्म आहेत, जे त्यांनी उत्क्रांत अवस्थेद्वारा ग्रहण केले आहेत. प्रत्येक अवस्थेचा एक धर्म असतो, जो त्याच्या गत संस्कारधारणेद्वारा त्यास प्राप्त होतो.
 
उत्क्रांत अवस्थेद्वारे जुने अनावश्यक संस्कार अथवा धारणा आपोआप नष्ट होतात आणि नवे संस्कार धारणारूपात ग्रहण केले जातात. हाच नव्या योनीचा धर्म होतो. प्रत्येक अवस्था अथवा योनी आपापल्या धर्माद्वारे चालते, कार्य करते आणि त्या अवस्थेस अधिक उत्क्रांत बनवते. यासाठी प्रत्येक अवस्था अथवा योनी (Species)चा धर्म, त्या योनीसाठी अत्यंत आवश्यक असाच आहे. मानव आपल्या उत्क्रांत संस्काराद्वारे उत्क्रांतीच्या अंतिम अवस्थेप्रत पोहोचला आहे. मानवाने माशाप्रमाणे पाण्यात विहार करणे, पक्ष्यांसारखे आकाशात भ्रमण करणे सोडून अधिक उन्नत अवस्था प्राप्त केली आहे. तो आता आपले सर्व व्यवहार करीत आहे. सर्व प्राण्यांमध्ये मानवाचे पोट लहान व मेंदू मोठा आहे. एवढा मोठा हत्ती, पण त्याचा मेंदू मानवापेक्षाही लहान आहे. एक बकरीसुद्धा माणसापेक्षा अधिक खाते, इतके मानवाचे पोट लहान आहे. प्रकृतीने मानवाला प्रकृतीकडून कमी घेण्यासाठी, व जगास आपल्या उन्नत मेंदूद्वारे अधिक देण्यासाठी निर्मिले आहे. उन्नत मानवअवस्था सांभाळून, आपल्या उन्नत मेंदूद्वारे विश्वातील गहन तत्त्वांचा शोध घेऊन सार्‍या विश्वाचे जीवन सुखमय आणि अधिक उन्नत बनविणे, हाच मानवाचा धर्म. परंतु, आज मानव आपला धर्म विसरून, सांप्रदायिक कल्पनांच्या आहारी गेला असून, तो स्वतःला उन्नत अवस्थेपासूनच खाली खेचत आहे. कथित धर्माच्या नावावर युद्ध आणि मारहाण चालली आहे. सांप्रदायिकता वाढत आहे; परंतु ही मानवधर्माची अधोगती आहे. मानवासाठी एकच धर्म असू शकतो आणि तो म्हणजे, सर्वांना समान मानून व्यवहार करणे. त्या मूल अवस्थेचे प्रत्यक्ष अनुभवाने ज्ञान प्राप्त करून, त्या अवस्थेरूप होणे होय. त्या अवस्थेचे ज्ञान केवळ कल्पनेने प्राप्त होणार नाही, तर त्यासाठी ध्यान, धारणा व समाधी लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारची मानवअवस्था प्राप्त झालेल्या उच्च धारणेस गीता ‘धर्म’ म्हणते. मानवाच्या एकाच धर्माविषयी गीतेत अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. जसे,

श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्|
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः॥अ.३,श्लो.३५॥
 
चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्‍याच्या धर्मापेक्षा, कमी गुणाचा स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. आपल्या धारणा धर्मात मरणेसुद्धा कल्याणकारकच आहे आणि दुसर्‍याचा धर्म साधनेत व व्यवहारात भयप्रद आहे. प्रत्येक मानवाचा स्वतःचा एक धर्म असतो, ज्याला शास्त्रात ‘पिंडधर्म’ असे म्हणतात. ज्याचा भक्तिमार्ग हा पिंडधर्म आहे, त्याने दुसर्‍याचा उच्च वाटणारा योगमार्ग न अनुसरता, स्वतःच्या भक्तिमार्गानेच त्याने आपली उन्नती करावी. त्याच्यासाठी योगमार्ग असंभव आणि म्हणूनच भयावह आहे. भक्तिमार्गी योगमार्गाने गेल्याने व योगमार्गी भक्तिमार्गाने गेल्याने काहीच साध्य होणार नाही, तो कोठचाच राहणार नाही. शेवटी ती संभ्रमावस्था त्यासाठी भयावह असेल. आजकाल कुंडलिनी जागृत करण्याचे प्रयत्न चालू आहेत, ज्यामुळे भावूक व मोहित होतात. काही महात्मे, महाराज शिष्यांच्या भ्रूमध्यात स्पर्श करून अथवा मस्तकावर हात ठेवून अथवा अन्य प्रकारे प्रयत्न करून, शिष्यांची कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे गीतेच्या वचनांविरुद्ध आहे, तो अधर्म आहे, अशा प्रकारे कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. असे प्रयोग केल्यामुळे, त्या व्यक्तीस उगाचच उन्नत अवस्था प्राप्त झाल्यासारखे भासेल. परंतु, ती कृत्रिम अवस्था त्याच्या पिंडधर्माला धरून नसल्यामुळे लवकरच संपून जाईल व ती व्यक्ती पहिल्या अवस्थेपेक्षा अधिक अवनत अवस्थेस जाईल. जसा उंच फेकलेला दगड पुन्हा जमिनीवर येतो, तेव्हा आघातामुळे जमिनीस खड्डा पडून तो दगड जमिनीच्या थोडा खालीच जातो. गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या प्रयत्नांनी व्यक्ती उन्नत अवस्था प्राप्त करू शकतेच, कोणाचा हात मस्तकावर ठेवून घेतल्याने नव्हे. गीतेत स्पष्ट सांगितले आहे,

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्|
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः॥अ.६,श्लो.५॥
 
मानव आपल्या उन्नत सत्कर्माद्वारेच आपला उद्धार करू शकतो, कोणत्याही गुरुद्वारे नव्हे. गुरू मार्गदर्शन करतील, उद्धार नव्हे. यासाठी गोस्वामी तुलसीदास म्हणतात, ‘नर करनी करे तो नर का नारायण होत.’
 
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७




संबंधित मजकूर