एक काळ संपला; एक वर्तुळ पूर्ण झालं!

    02-Jul-2026   
 
 
Germany Football Decline
 
वाचलेली, ऐकलेली माणसं गेली कुठे?
 
पुस्तकातून पाहिलेली माणसं गेली कुठे?
 
इलाही जमादारांची ही गझल आज पुन्हा पुन्हा आठवण्याचं कारण असं की, २०१४ साली जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव करून ब्राझीलच्या मराकाना स्टेडियममध्ये फुटबॉलचा विश्वचषक उंचावला, तेव्हा त्या मराकाना स्टेडियममध्ये मी हजर होतो. होय, तब्बल अडीच लाख रुपयांचं तिकीट काढून मी ती अंतिम लढत ब्राझीलमध्ये प्रत्यक्ष पाहात होतो.
 
होय, मी ब्राझीलमध्ये होतो, तेव्हा याच जर्मनीने उपांत्य फेरीत यजमान ब्राझीलला ७-१ असं तुडव-तुडव तुडवत पराभूत केलं होतं. आता १२ वर्षे उलटली.
 
या १२ वर्षांत जर्मनीचा जो उदय मी पाहिला, आज त्याच जर्मनीचा अस्तही मी पाहात होतो. पराग्वेने यंदाच्या विश्वचषकात जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.
 
२०१४च्या त्या रात्री मराकानावर जर्मनीने विश्वचषक उंचावला, तेव्हा फुटबॉलविश्वाला एक नवं साम्राज्य जन्माला येत असल्याचा भास झाला होता.
 
ज्या संघाने ब्राझीलसारख्या फुटबॉल महासत्तेला त्यांच्या घरच्या मैदानावर ७-१ ने चिरडलं, तोच जर्मनी आज स्वतःच्याच बचावातील भगदाडांमध्ये अडकलेला दिसत आहे. ज्या संघाच्या नावाने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरायची, त्या संघाला आज पराग्वेसारख्या जिद्दी, पण तुलनेने कमी दिग्गज संघाने ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला.
 
हा पराभव फक्त एका सामन्याचा नव्हता. हा पराभव एका परंपरेचा होता. एका मानसिकतेचा होता. एका फुटबॉल संस्कृतीच्या हरवलेल्या आत्मविश्वासाचा होता.
 
जर्मनीचा सर्वांत मोठा प्रश्न आज त्यांच्या आक्रमणात नाही. ‘मॅन्युएल न्युअर’सारखा अनुभवी गोलरक्षक पुन्हा संघात परतला, पण त्याच्याही अनुभवाने बचावातील भगदाडं बुजली नाहीत. नवोदित कुरासाओविरुद्धही जर्मनीला गोल स्वीकारावा लागला. आयव्हरी कोस्टविरुद्ध सुरुवातीलाच धक्का बसला. इक्वेडोरविरुद्ध लेरॉय सानेने दुसर्‍याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली, तरी जर्मनीला पराभव टाळता आला नाही.
 
२०१४ नंतर जर्मनीच्या मोठ्या स्पर्धांतील वाटचाल ही घसरणीची आहे. युरो २०१६ मध्ये फ्रान्सकडून उपांत्य फेरीत पराभव. २०१८च्या विश्वचषकात साखळी फेरीतच धक्कादायक गच्छंती! युरो २०२० मध्ये इंग्लंडकडून पराभव. २०२२च्या विश्वचषकात पुन्हा साखळी फेरीतच निरोप. युरो २०२४ मध्ये स्पेनकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव. आणि आता २०२६ मध्ये पराग्वेकडून राऊंड ऑफ ३२ मध्ये बाहेर. एका फुटबॉल महासत्तेच्या हळूहळू कोसळत जाणार्‍या साम्राज्याची ही नोंद आहे.
 
पराग्वेविरुद्ध जर्मनीला नशिबानेही साथ दिली नाही. ‘व्हीएआर’ने सामना संपवणारा जर्मनीचा गोल नाकारला आणि सामना ‘पेनल्टी शूटआऊट’पर्यंत गेला. पण जर्मनीसारख्या संघाने नशिबावर अवलंबून राहावं, हीच तर त्यांच्या घसरणीची खरी खूण आहे!
 
तेव्हा प्रश्न असा आहे की, जर्मनीला नेमकं झालं काय? खेळाडू आहेत. ‘बुंदेसलिगा’सारखी सक्षम लीग आहे. फुटबॉलची खोलवर रुजलेली परंपरा आहे. आर्थिक ताकद आहे. पायाभूत सुविधा आहेत. पण मैदानावर उतरल्यावर दिसणारी ती जुनी जर्मन वृत्ती कुठे हरवली? वाचलेली, ऐकलेली माणसं गेली कुठे? हा प्रश्न आज जर्मन फुटबॉललाही विचारावासा वाटतो.
 
लिन्समन, मॅथ्यूस, लोजे, लाह्म, श्वाइनस्टायगर, ओझिल, मुलर यांची ती परंपरा आज कुठे गेली? संकटातही न डगमगणारा तो आत्मविश्वास कुठे गेला? प्रतिस्पर्ध्याला अखेरच्या मिनिटापर्यंत गुदमरवून टाकणारी ती यंत्रणा कुठे गेली?
 
२०१४च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ज्या अर्जेंटिनाचा पराभव करून जर्मनीने चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले, त्याच अर्जेंटिनाचा महानायक मेल्या याने याच विश्वचषकात जर्मनीच्या दिग्गज मिरोल्लॅाव्ह लोसे यांच्या नावावर असलेला विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम मोडला. एके काळी जर्मन फुटबॉलच्या वर्चस्वाचं प्रतीक असलेले विक्रम एकामागून एक इतिहासजमा होताना पाहणं वेदनादायी आहे.
 
कदाचित फुटबॉलमध्ये प्रत्येक महासत्तेला असा काळ पाहावा लागतो. ब्राझीलने पाहिला. इटलीने पाहिला. अर्जेंटिनानेही पाहिला. पण त्या पुन्हा उभ्या राहिल्या.
 
जर्मनीही पुन्हा उभा राहू शकतो. कारण साम्राज्य कोसळतात, पण संस्कृती सहज मरत नाहीत. २०१४ मध्ये मराकानावर उंचावलेला विश्वचषक हा जर्मनीच्या सुवर्णयुगाचा शिखरबिंदू होता की अस्ताची सुरुवात, याचं उत्तर आता इतिहास देत आहे!
 
ज्या जर्मनीने ब्राझीलवासीयांच्या डोळ्यांत अश्रू आणले होते, त्याच जर्मनीच्या समर्थकांच्या डोळ्यांत आज पराभवाची पोकळी आहे. एक काळ संपला आहे; एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.




संबंधित मजकूर