चेंबूर वृक्ष दुर्घटना : दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे स्थायी समितीचे आदेश

    02-Jul-2026
 
Chembur Tree Tragedy
 
मुंबई (Chembur Tree Tragedy) : "चेंबूर दुर्घटनेप्रकरणी जे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असतील, त्यांच्यावर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी. केवळ चौकशीचे आदेश देऊन हा विषय संपवू नये. चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी," असे कडक निर्देश स्थायी समिती सभापती प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
 
​चेंबूर पश्चिम येथे ६० ते ७० वर्षे जुने झाड शाळेच्या बसवर कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा झालेल्या मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत उमटले. या दुर्दैवी दुर्घटनेवर सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार हल्लाबोल केला. "ही दुर्घटना नैसर्गिक नसून प्रशासकीय ढिसाळपणामुळे झालेली मानवनिर्मित आपत्ती आहे," असा गंभीर आरोप सदस्यांनी केला. (Chembur Tree Tragedy)
 
सभागृह नेते गणेश खणकर यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. रस्ते विभागाला उद्यान विभागाने झाडांच्या मुळांना होणाऱ्या नुकसानीबाबत दोनदा पत्र देऊनही गेल्या अडीच वर्षांत संबंधित रोड इंजिनिअरने त्याची दखल घेतली नाही. कंत्राटदारांनी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर घाव घातल्याने ती कमकुवत झाली. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असे सांगत खणकर यांनी संबंधित इंजिनिअर, उद्यान अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली. काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनीही, नागरिकांच्या अर्जांकडे वर्षभर दुर्लक्ष करणाऱ्या 'ट्री ऑफिसर' आणि उद्यान अधीक्षकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. (Chembur Tree Tragedy)
शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी मृत विद्यार्थ्याच्या आईच्या आक्रोशाचा दाखला देत प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आणि मुंबईतील सर्व झाडांचे तातडीने वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली. शिवसेना (शिंदे गट) गटनेते अमेय घोले यांनी शाळांच्या परिसरातील धोकादायक झाडांचे सायंटिफिक ऑडिट करण्याची आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तर आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदीर्गे यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना केली. (Chembur Tree Tragedy)
 
​स्थायी समितीच्या या वादळी चर्चेत, केवळ चौकशी समित्या नेमून चालणार नाही, तर यापुढे एकही निष्पाप जीव जाणार नाही यासाठी दोषींवर सदोष मनुष्यवधासारखी कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा एकमुखी सूर उमटला. (Chembur Tree Tragedy)
 




संबंधित मजकूर