विचारांचे खुले दालन की वैचारिक एकारलेपण?

    02-Jul-2026
 
Asiatic Library
 
ग्रंथालयात जपलेले ग्रंथ ज्ञान निर्माण करीत नाहीत; त्या ग्रंथांभोवती उभा राहणारा मुक्त संवाद ज्ञानाला जन्म देतो. कोणत्याही महान ज्ञानसंस्थेचे हेच खरे तत्त्व आहे. एखादी संस्था महान ठरते, ती तिच्या वास्तुमुळे, संग्रहामुळे किंवा इतिहासामुळे नव्हे; तर ती विचारांच्या मुक्त देवाणघेवाणीसाठी कितपत सक्षम व्यासपीठ निर्माण करते, यावर! म्हणूनच, ‘एशियाटिक’चा इतिहास समजून घेण्यासाठी तिच्या वैचारिक संस्कृतीचे परीक्षण अपरिहार्य ठरते.
 
जगातील सर्व महान ज्ञानसंस्थांनी एक समान तत्त्व स्वीकारले आहे. ऑसफर्ड, केम्ब्रिज, सोरबॉन, हार्वर्ड, लायब्ररी ऑफ काँग्रेस किंवा ब्रिटिश लायब्ररी यांचे महत्त्व त्यांच्या संग्रहात जितके आहे, तितकेच त्यांच्या बौद्धिक वातावरणात आहे. तेथे ग्रंथ जपले जातात, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, प्रश्न विचारण्याचा अधिकार जपला जातो. मतभेदांना स्थान दिले जाते. पुराव्यांच्या आधारे विचारांची चिकित्सा केली जाते. ज्ञानसंस्था म्हणजे, सहमती निर्माण करणारी यंत्रणा नसते; ती विवेकपूर्ण असहमतीला सभ्य रूप देणारी संस्कृती असते.
 
‘एशियाटिक’च्या इतिहासातही अशाच अनेक वैचारिक प्रवाहांचे दर्शन घडते. प्राच्यविद्या, इतिहास, भाषाशास्त्र, पुरातत्त्व, समाजविचार, साहित्य, धर्म आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांतील संशोधक येथे एकत्र आले. त्यांच्या निष्कर्षांत मतभेद होते; त्यांच्या पद्धती भिन्न होत्या; त्यांच्या निष्कर्षांवर पुढील पिढ्यांनी टीकाही केली. पण याच प्रक्रियेत संस्थेचे बौद्धिक जीवन समृद्ध झाले. कारण, संशोधनाचा उद्देश अंतिम सत्य घोषित करणे नसून, सत्याच्या अधिक जवळ जाणे, हा असतो.
 
याच ठिकाणी ‘वैचारिक एकारलेपणा’ हा प्रश्न उभा राहतो. कोणत्याही ज्ञानसंस्थेसाठी सर्वांत मोठा धोका आर्थिक अडचणी, इमारतींचे जीर्णत्व किंवा तांत्रिक मर्यादा नसतो; तो विचारांच्या संकुचित होत जाणार्‍या अवकाशाचा असतो. जेव्हा संस्था प्रश्नांपेक्षा निष्कर्षांना अधिक महत्त्व देऊ लागते, तेव्हा तिची बौद्धिक ऊर्जा कमी होऊ लागते. जेव्हा मतभिन्नतेकडे संशयाने पाहिले जाते, तेव्हा संशोधनाचे स्वरूपही संकुचित होते. भारतीय परंपरेचा विचार केला, तर तिचे मोठेपण एकमतात नव्हते; तर बहुविचारात होते. ‘एशियाटिक’सारख्या संस्थेने या परंपरेचे आधुनिक रूप जपले, तरच ती आपल्या इतिहासाला न्याय देऊ शकेल.
 
‘एशियाटिक’च्या इतिहासातील सर्वांत मोठी परंपरा म्हणजे ज्ञानाला कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त न ठेवण्याची वृत्ती. इतिहासकार, भाषातज्ज्ञ, तत्त्वज्ञ, साहित्यिक, पुरातत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सर्वांना येथे समान बौद्धिक प्रतिष्ठा मिळाली. कोणत्याही एका शास्त्राने दुसर्‍यावर वर्चस्व गाजविले नाही. उलट, विविध ज्ञानशाखांच्या संवादातून संशोधन अधिक समृद्ध झाले.
 
भविष्यातील ‘एशियाटिक’ने हीच परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेली पाहिजे. कोणतीही संस्था वैचारिकदृष्ट्या जिवंत राहते, ती स्वतःशी असहमती व्यक्त करण्याची क्षमता जपते म्हणून. जेथे सर्व प्रश्नांना आधीच निश्चित उत्तरे असतात, तेथे संशोधन संपते. जेथे प्रत्येक नवीन कल्पना संशयाने नव्हे, तर उत्सुकतेने ऐकली जाते, तेथेच ज्ञान पुढे सरकते. म्हणूनच, ‘एशियाटिक’ने मतभिन्नतेला संघर्ष मानू नये; ती ज्ञाननिर्मितीची अपरिहार्य प्रक्रिया मानली पाहिजे. संस्थेची प्रतिष्ठा सर्वजण सारखे विचार करतात म्हणून वाढत नाही; तर भिन्न विचार असूनही संवादाची सभ्यता टिकते, म्हणून वाढते.
 
तितकेच महत्त्वाचे म्हणजे संस्थात्मक नम्रता. कोणतीही पिढी अंतिम सत्याची मालक नसते. प्रत्येक पिढीला आपल्या पूर्वसुरींकडून वारसा मिळतो आणि पुढील पिढीसाठी तो अधिक समृद्ध करून सोपविण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. ज्ञानसंस्था म्हणून ‘एशियाटिक’चेही हेच कर्तव्य आहे. तिने भूतकाळाचा आदर करावा; पण त्याचे ओझे वाहू नये. तिने परंपरेचे जतन करावे; पण नवविचारांना दारे उघडी ठेवावीत. परंपरा आणि परिवर्तन यांच्यातील हा संतुलित संवादच कोणत्याही महान संस्थेचे दीर्घायुष्य निश्चित करतो.
 
संजय देशमुख
(लेखक मुंबई विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू आहेत.)




संबंधित मजकूर