अंगात कलावंताची कल्पकता, हातात बासरी आणि मनात निसर्गाविषयी अपार भक्ती बाळगणारे ‘अंबाडी मॅन’ अर्थात, अनंत भोयर यांच्याविषयी...
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या गदारोळात, जेव्हा शेतीचा मूळ आत्मा हरवत होता, तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जात मातीला पुन्हा जिवंत करण्याचे स्वप्न नागपूरच्या काटोल तालुयातील, कचारी सावंगा येथील अनंत भोयर यांनी पाहिले. शिल्पकार, लेखक, संगीतप्रेमी, विचारवंत आणि एक यशस्वी उद्योजक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या अनंत यांनी, गेली दोन तपे, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला जीवनध्यास बनवले आहे. आज त्यांचे कार्य, संपूर्ण देशात पुनरुत्पादक शेतीचा एक आशेचा किरण ठरले आहे.
नागपूरच्या कचारी सावंगा या गावी दि. २६ नोव्हेंबर १९६५ रोजी एका शेतकरी कुटुंबात अनंत यांचा जन्म झाला. अनंत यांनी विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, प्रचलित शिक्षण पद्धतीत ‘जीवन-शिक्षणाचा’ अभाव असल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याला रामराम ठोकला. अनंत यांचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी वडिलांसोबत शेतात जाताना, रासायनिक शेतीमुळे शेतकरी कसा व्यापार्यांच्या विळख्यात अडकतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. अन्नदाता असूनही स्वतःच्या पिकाचा भाव स्वतः ठरवणार्या शेतकर्याची लाचारी, त्यांच्या संवेदनशील मनाला बोचत होती. यातूनच त्यांनी जिथे उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी शेतकर्याच्या हातात असेल, अशी शेती करण्याचा संकल्प केला.
या ध्येयाने प्रेरित होऊन, त्यांनी नैसर्गिक शेतीकडे पाऊल टाकले. सुरुवातीला जेव्हा त्यांनी रासायनिक पद्धतीला नाकारले, तेव्हा त्यांच्या वाटेला उपहास आणि टीका आलीच. त्यांच्या प्रयोगावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. परंतु, अंतःकरणातील मातीविषयीची निष्ठा आणि लाभलेल्या सहचारिणीच्या भक्कम सोबतीमुळे, अनंत त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. विदर्भात जिथे संत्री, कापूस आणि सोयाबीनचा वरचष्मा आहे, तिथेच अनंत यांनी १४ एकरात बहुपीक पद्धती राबवली. त्यांनी लाल अंबाडी, चवळी, बरबटी, हळद, मोहरी, जवस अशा पिकांची लागवड करून, शेतात जणू जैवविविधतेचा सोहळाच भरवला. विशेषतः अंबाडीच्या औषधी आणि पोषक मूल्यांना ओळखून, त्यांनी त्यावर प्रक्रिया सुरू केली. यामुळेच आज त्यांना देशात, ‘अंबाडी मॅन ऑफ इंडिया’ म्हणून गौरवाचे स्थान आहे.
आपल्या शेतीमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, त्यांनी ‘गावकुस’ ब्रॅण्डची स्थापना केली. आज या अंतर्गत देशभरात ४०हून अधिक प्रक्रियायुक्त उत्पादने, ऑनलाईन विकली जात आहेत. टनाने उत्पादन घेण्यापेक्षा, ते तोळ्याने विकून अधिक उत्पन्न मिळविणे महत्त्वाचे, हा त्यांचा विचार तरुण शेतकर्यांसाठी मार्गदर्शक आहे. अनंत यांचे मोठेपण यात आहे की, त्यांनी आपली प्रगती स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही. ‘गावकुस’ आणि ‘ग्रामोन्नती’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी, हजारो शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले. भाजीपाला आणि फुलांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी, स्वतःच्या कल्पकतेने पिरॅमिड आकाराचा, अल्पखर्ची ‘सोलर ड्रायर’चा विकास केला. याचा फायदा आज देशभरातील शेतकर्यांना होतो.
महिला सक्षमीकरणाचा त्यांचा ध्यासही तितकाच कौतुकास्पद. २०१३ मध्ये त्यांनी तब्बल ७२ महिला शेतकर्यांना ट्रॅटर चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. यामुळे कृषीतील स्त्रीशक्तीचा टक्का वाढला. सध्या ‘पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’अंतर्गत, त्यांचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत सुरू आहे. आज जिथे शेती तोट्याची मानली जाते आजे, तिथे अनंत यांनी सेंद्रिय शेतीच्या बळावर एक स्वाभिमानी, समाधानी आणि समृद्ध जीवन उभे करून दाखवले. त्यांनी शेती, पर्यावरणसंवर्धन, मूल्यवर्धन आणि मानवी जीवनशैलीचा असा सुंदर मिलाफ साधला, त्याने ग्रामीण भारताला विकासाची एक शाश्वत दिशा दाखवली.
त्यांच्यातील कलावंत आणि लेखकही तितकाच समृद्ध. कृषीपूरक व्यवसाय म्हणून, नैसर्गिक काष्ठशिल्पांची निर्मितीही ते करतात. झाडांच्या सर्वच अवयवांपासून द्विमितीय, त्रिमितीय, चौमितीय अशा मूल्यसंदेश देणार्या काष्ठशिल्पांची निर्मिती त्यांनी केली.
ग्रामीण-विनोदी कथा, कादंबरी आणि वैचारिक कृषीविषयक लेखन करणार्या अनंत यांनी, शेतीपूरक विषयांवर तब्बल २० पुस्तकांचे लेखन केले आहे. मुंबई-नागपूर दूरदर्शनच्या माहितीपटांसाठी स्क्रिप्ट रायटिंग आणि अभिनय करण्यासोबतच, नागपूर आकाशवाणीवरच्या ‘रेशीमशेती’ आणि ‘गोष्टी गावगाड्याच्या’ या मालिका कमालीच्या गाजल्या. अनंत यांच्या ‘मायाजाळ’ या कथासंग्रहाला, सन १९९३-९४चा ‘राज्य साहित्य व संस्कृती मंडळा’चा ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने २००९ला दिलेला ‘सेंद्रिय शेती कृषिभूषण’, २०१८चा ‘ऑर्गेनिक इंडिया’चा ‘धरतीमित्र’ हा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार; यासोबतच सामाजिक अंगाने विचार केल्यास तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने यावर्षीचा ‘माजी मुख्यमंत्री बाळासाहेब तिरपुडे जीवनगौरव पुरस्कार’ अशा नानाविध पुरस्कारांनी, अनंत यांना गौरविण्यात आले.रासायनिक शेतीच्या अंधाराकडून नैसर्गिक शेतीच्या प्रकाशाकडे जाणारा अनंत भोयर यांचा हा झपाटलेला प्रवास, मातीशी इमान राखणार्या एका खर्या कर्मयोग्याची महागाथा आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनंत भोयर यांना, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९०४९६४१४७४)