निःस्पृह व निर्मोही विमलताई कृष्णराव देशपांडे उपाख्य माई

    02-Jul-2026
 
Vimaltai Deshpande
 
कोणत्याही कामाचे श्रेय न घेता आणि वैचारिक बैठकीशी एकनिष्ठ राहून उत्तुंग कार्य करणार्‍या, भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्या माई उपाख्य विमलताई देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष! विमलताई आयुष्यभर निःस्पृह जगल्या आणि निर्मोही होऊन त्यांनी आपला देहदेखील ठेवला. माईंच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळावी म्हणूनच हा लेखप्रपंच...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष देशात सुरू असून, संघकार्य वर्धिष्णू करण्यासाठी ज्या महानुभाव तथा विदुषींनी रक्ताचे पाणी केले, अशा संघतपस्वींचे स्मरणही होत आहे. संघकामाची सुरुवात नागपूरमध्ये झाल्याने, संघकार्य आणि संघविचारासोबत एकनिष्ठ राहून विविध क्षेत्रांतील कार्यासाठी, नागपूरातील अनेक कुटुंबातील तीन-चार पिढ्या झटल्या आहेत. या संघर्षाच्या काळात संघटना वाढवणे, संघटनेचे कार्य आणि विचार घरोघरी पोहोचवण्याचे कठीण कार्य करणार्‍या व्यक्तींमध्येच, नागपूरमधील भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्या माई उपाख्य विमलताई कृष्णराव देशपांडे यांचे नाव मोठ्याच आदराने घेतले जाते. जनसंघाच्या स्थापनेनंतर संपूर्ण देशात, जनसंघाच्या महिला आघाडीचे काम सुरू होते.
 
महाराष्ट्रातसुद्धा महिला आघाडीच्या कामला वेग येऊन, सामान्य महिला जोडल्या त्यात जात होत्या. नागपूर शहरातही महिला आघाडीचे काम वर्धिष्णू होत होते आणि त्यामध्ये विमलताई देशपांडे अग्रणी होत्या. असामान्य काम करायचे; पण कोणत्याही कामाचे श्रेय न घेता अलगद बाजूला व्हायचे, तसेच वैचारिक बैठकीशी कधी तडजोड न करणे, अशा संघसंस्कारात वाढलेल्या विमलताई आयुष्यभर निःस्पृह जगल्या आणि निर्मोही होऊन त्यांनी आपला देहही संघाची तपोभूमी असलेल्या नागपुरातच दि. २ जुलै २०१७ रोजी ठेवला. त्याग, समर्पण, साधेपणाचा वस्तुपाठ असलेल्या माईंचे हे जन्मशताब्दी वर्ष!
  
विमलताई यांचे पिंपरी, अमरावती माहेर
 
विमलताई यांचा जन्म वर्ध्यातील पिंपरी गावात, बाळकृष्ण नामदेवराव पिंपरीकर कुटुंबामध्ये दि. ७ जून १९२६ रोजी झाला. पिंपरीकर कुटुंब एक सधन शेतकरी कुटुंब होते. घरात चार मुले व तीन मुली असा, मोठाच संयुक्त परिवार होता. त्यामध्ये विमलताई दुसर्‍या क्रमांकाच्या कन्या. घरातील वातावरण देशभक्ती व सामाजिक समरसतेचे होते. हेच संस्कार विमलताई यांच्यावरही झाले. स्वातंत्रपूर्व काळात शिक्षणाची सोय नव्हती. महिलांसाठी तर शिक्षण कठीणच होते. पण, विमलताई यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी गावात, पुढे अमरावतीमध्ये झाले. त्यांना भजनाचाही छंद होता आणि तो त्यांनी पुढे जोपासलाही. महिला आघाडीचे काम करताना, भजनी मंडळाद्वारे संघटन वाढवण्यासाठी हा छंद कामी आला. पुढे त्यांचा दि. १० मार्च १९४५ रोजी, कृष्णराव हरिहर देशपांडे उपाख्य अण्णा यांच्यासोबत विवाह झाला. कृष्णराव हरिहर देशपांडेसुद्धा १९३९ ते १९४४ पाच वर्षे, बिहारच्या भागलपुरात संघाचे प्रचारक होते. त्यांचे चारही पुत्र संघकार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. पुत्र सुनील संघाचे प्रचारक आहेत. सध्या त्यांच्याकडे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख पदाचे दायित्व असून, चेन्नईच त्यांचे मुख्यालय आहे.
 
माई यांचे जनसंघात वाढीत, मोठे योगदान
 
भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर देशात संघटनाबांधणीचे काम सुरू होऊन, महिला आघाडीचे कार्यसुद्धा सुरू झाले होते. जयवंतीबेन मेहता, सुमतीताई सुकळीकर, प्रमिलाताई टोपले यांनी मुंबई, पुणे, नागपूर, अकोला येथे महिला आघाडीचे काम सुरू केले. तेव्हा विमलताई यांच्या नागपूरच्या धरमपेठमधील देशपांडे वाड्यात, सुमतीताई सुकळीकर यांचा नेहमी राबता असे. त्यांनी महिला आघाडीच्या कामाला वेग दिला होता. विमलताई यांनी सुमतीताई सुकळीकर यांच्यासोबतच नागपूरमध्ये, संघटनेच्या बांधणीत व ‘राष्ट्र सेविका समिति’मध्येही काम केले. देशपांडे परिवारातील कर्मठ संघसंस्कार तथा प्रखर राष्ट्रवादाची वैचारिक पक्की बैठक असलेल्या विमलताई यांनी, महिला संघटनेसाठी स्वतःला झोकून दिले. भजनाची आवड असल्याने, त्यांनी भजनी मंडळाच्या माध्यमातून शेकडो महिला कार्यकर्त्या संघटनेशी जोडल्या आणि महिला संघटनेला नागपूर शहरात महत्त्वाचे स्थानही मिळवून दिले. वसंतराव भागवत यांची कार्यपद्धती लक्षात घेतल्यास असे लक्षात येते की, "सभेची तयारी मी करेन; पण मी वक्ता असणार नाही. जाहीरसभेची बातमी मी तयार करेन; पण बातमीत माझे नाव असणार नाही. निवडणुकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मी करेन; पण मी उमेदवार असणार नाही,” चाळीस वर्षे राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या, जनसंघ-भाजप संघटनमंत्री वसंतराव भागवत यांच्या कामाची ही त्रिसूत्री होती. त्यांनी चाळीस वर्षे राजकीय क्षेत्रात काम केले परंतु, कोणत्याही व्यासपीठावर दिसले नाहीत किंवा कोणतीही निवडणूकही लढवली नाही. हीच त्रिसूत्री विमलताई यांनी, त्यांच्या आचरणात आणली आणि त्याचप्रमाणे त्या निर्मोही होऊन जगल्याही.
 
गांधीनगर देशपांडे निवास - जनसंघाचे कार्यालय
 
असे म्हणतात की, ज्या व्यक्ती राष्ट्र, संघटना, समाज आणि सामान्य लोकांसाठी कार्य करतात किंवा त्यांच्यासाठी जगतात, त्यांना समाज कधीच विसरत नाही. विमलताई यांच्याबाबत हेच म्हणावे लागेल. कारण, त्या वसंतराव भागवत यांच्या त्रिसूत्रीनुसार संघटना, समाजासाठी जगल्या. धरमपेठ येथून गांधीनगरात आल्यानंतर, देशपांडे यांचे २६१ निवासस्थान जनसंघाचे, ‘विहिंप’चे अघोषित कार्यालयच होते. वर्ष १९६२ आणि १९६७च्या लोकसभा निवडणुकीच्या खडतर काळात, येथूनच हालचाली होत. देशात काँग्रेसचा एकछत्री अंमल असताना, निवडणुकीत जनसंघ उमेदवाराचा पराभव होत असे. तेव्हा विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, देशपांडे निवाससमोर धुमाकूळ घालायचे, चिडवायचे, शेण-दगडधोंडेसुद्धा फेकायचे. परंतु, देशपांडे परिवाराने त्यांना कधीच आपले शत्रू मानले नाही. सर्व समाज आपलाच आहे हा उदात्त विचार समोर ठेवूनच, नव्या उमेदीने विमलताई आपल्या सामाजिक कार्यक्षेत्रात उतरत. त्यांनी आपला परिवार सांभाळून सतत महिला कार्यकर्त्या निर्माण करणे, त्यांचा सांभाळ करण्याचे सर्वांत कठीण काम केले, हे त्यांचे वैशिष्ट्य! त्याकाळी मोठ्या जिकिरीने त्यांनी हे काम केले असून, ते सदैव नागपूरकरांच्या स्मरणात राहणार आहे. आणीबाणीच्या काळात विमलताई यांनी नागपूरमध्ये भूमिगत कार्यकर्त्यांना सहकार्य करणे, सत्याग्रहाच्या निरोपाची व्यवस्था करणे व कारावासात असलेल्यांच्या परिवारांना धीर देणे, त्यांचा सांभाळ करणे इत्यादी जबाबदार्‍यांचे निर्वाहन केले. घरी आलेल्या कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी करून त्याच्या मुखी दोन घास अन्न पडावे, असा त्यांचा नेहमी कटाक्ष असे. हे व्रत त्यांनी शेवटपर्यंत जोपासले. माई यांचा हा संस्कार त्यांच्या परिवारानेही जोपासलेला आहे. त्यांचे पुत्र विजयराव देशपांडे शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करीत असताना, खामगाव निवासी होते. त्यांच्या पत्नी प्रभा वहिनी घरी येणार्‍या कार्यकर्त्यांना सुखाचा घास किंवा काही तरी गोडघोड खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नसत.
 
आठवणीतील लक्षवेधी महागाईविरोधी मोर्चा
 
वर्ष १९७५ साली उच्च महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले होते. तेव्हा सामान्य माणसाच्या हृदयातील महागाईच्या वेदनांची स्पंदने सरकारच्या कानी पोहोचावी म्हणून, नागपूर शहरात महागाईविरोधी मोर्चाचे आयोजन सुमतीताई सुखळीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तेव्हा विमलताईसुद्धा, आपल्या सहकारी महिला कार्यकर्त्यांसह मोर्चात उतरल्या होत्या. महिला मोर्चाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गाड्यांचा ताफा अडवून, मोटारीसमोरच विरोधी प्रदर्शन केले होते. काही महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर झोपून महागाई, भाववाढीचा निषेधही केला.नागपूरकरांच्या सदैव स्मरणात राहणार्‍या, या महागाईविरोधी अनोख्या आंदोलनात विमलताई पुढे होत्या.
 
निःस्पृह जगल्या व निर्मोही होऊन देह ठेवला
 
विमलताई यांनी जनसंघाच्या कठीण काळात, महिला संघटनात्मक बांधणीचे कठीण काम जिद्दीने केले. परंतु, त्या सदैव प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिल्या. राजकीय संघटन म्हटले की, पद आणि प्रसिद्धी आवश्यक बाब म्हटली जाते. विमलताई यांनी उभ्या आयुष्यात प्रसिद्धीची हाव आणि पदाची अपेक्षा कधीच ठेवली नाही. वर्ष २०१६ मध्ये त्यांना ‘सुमतीताई सुकळीकर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्यांना अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, सुमतीताई जयवंतीबेन मेहता यांच्यासोबत काम करण्याचेही भाग्य लाभले. दि. ७ जून १९२६ रोजी वर्ध्यातील पिंपरीमध्ये जन्मलेल्या विमलताई कृष्णराव देशपांडे हिंदुत्व संघटनेसाठी निःस्पृह जगल्या व जवळपास ४०-५० वर्षे सामाजिक कार्य करीत, दि. २ जुलै २०१७ रोजी निर्मोही होऊन त्यांनी आपला देह संघाची तपोभूमी असलेल्या नागपुरात ठेवला.
 
अशोक राणे
९४२३६५८३८५




संबंधित मजकूर