‘चलती’ का नाम मुंबई!

    18-Jul-2026   

Kala Ghoda Art Avenue

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक कलापंढरी असलेल्या काला घोडा परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुशोभित पदपथांच्या माध्यमातून नुकतेच पूर्ण झाले. एरव्ही घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांना क्षणभराचीही उसंत नसते. मात्र, त्यांच्या या जगण्याला क्षणभर विश्रांतीसुद्धा तितकीच आवश्यक. या विश्रांतीसाठी कधी मरीन लाईन्स, समुद्रकिनारा, राणीची बाग आदी गोष्टींची निवड मुंबईकरांकडून केली जाते. मात्र, दक्षिण मुंबईच्या काला घोडा परिसरामध्ये सुशोभित करण्यात आलेल्या पदपथांच्या माध्यमातून आणखी एका हक्काच्या विश्रामस्थळाची भर पडली. तिथे मारलेल्या फेरफटक्याचे शब्दबद्ध हे केलेले चित्रण...
 
धावणार्‍या मुंबईची ‘चालणारी’ जागा
 
पठ्ठे बापूराव आपल्या मुंबईच्या लावणीमध्ये म्हणतात, ‘पवळे जपून चाल| घाईघाईत होतिल हाल| धर हात सावरी तोल| हा पठ्ठे बापूचा बोल, अगं ही मुंबई...’ मुंबईसारख्या मायानगरीमध्ये काळापेक्षा कामाला आणि वेगालाच जास्त महत्त्व. दुपारी निद्रस्त राहण्याची या नगरीला मुळी सवयच नाही. घड्याळाच्या काट्याने मध्यरात्रीचा टोला दिला, तरी या शहराच्या कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यात दिवा जळत राहतो, माणसं जागत राहतात. अशा या मुंबईनगरीमध्ये दोन क्षणांची विश्रांती घ्यावीशी वाटणं, यात गैर काय? कामातील धावपळीला काही क्षण बाजूला सारून स्वतःच्या आनंदासाठी फिरणं यात गैर काय? अर्थात, हा फेरफटका मारण्यासाठी तितक्याच मोकळ्या जागा उपलब्ध असणं आवश्यक. त्यासाठीच मुंबईच्या काला घोडा परिसरामध्ये काही महिन्यांपासून सुशोभीकरणाचं काम प्रगतिपथावर होतं. अखेर हे काम पूर्ण झाल्यानंतर आकाराला आलेल्या काला घोडाच्या परिसरामध्ये पदपथिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.
 
कला क्षेत्र - काला घोडा
 
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक काला घोडा परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. ‘काला घोडा आर्ट अव्हेन्यू ब्युटिफिकेशन अ‍ॅण्ड इल्युमिनेशन प्रोजेट’अंतर्गत या भागातील पाच ऐतिहासिक रस्त्यांचे पूर्णपणे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रोपवॉक लेन, साईबाबा रोड, व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरूचा रोड या गल्ल्यांचा समावेश आहे. दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत या पाचही गल्ल्यांमध्ये गाड्या आणण्यास पूर्णपणे बंदी. हा परिसर केवळ पादचार्‍यांसाठी खुला असेल. लंडनच्या ‘कार्नबी स्ट्रीट’ आणि ग्लासगोच्या ‘बुकानन स्ट्रीट’च्या धर्तीवर या गल्ल्यांमध्ये दगडी नक्षीकाम केलेले पदपथ तयार करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर इथे फेरफटका मारताना मुंबईचा एक नवीन चेहरा आपल्याला दिसून येतो. दक्षिण मुंबईमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या फॅशन ब्रॅण्ड्सची दुकानं आपल्याला बघायला मिळतील. देखण्या वस्त्रकलेची आरास बघताना दुसर्‍या बाजूला, वेगवेगळे कॅफेस आपल्या क्षुधाशांतीसाठीसुद्धा सज्ज आहेतच. एकूणच रचनात्मकदृष्ट्या अत्यंत सृजनशीलपणे या जागेची आखणी केल्याचे आपल्याला दिसून येते.
 
प्रभाव युरोपचा, थाट मुंबईचा!
 
युरोपमध्ये मागील अनेक शतकं रस्त्यांच्या वेगळेपणाची संस्कृती रुजली. रस्ते केवळ वाहनांसाठी नसून, ती माणसांच्या वर्दळीची, संवादाची आणि एकूणच कलासंस्कृतीची केंद्रे आहेत, अशी तिथली भावना. डेन्मार्कच्या कोपनहेगनमधील ‘स्ट्रॉगेट’ असो, पॅरिसमधील चित्रकारांचे ‘मॉन्मार्ट’ (Montmartre) असो वा स्कॉटलंडमधील सुप्रसिद्ध ‘बुकानन स्ट्रीट’ (Buchanan Street)! या सर्व ठिकाणी सुटीच्या दिवशी वाहनांना पूर्णपणे बंदी घालून रस्ते पादचार्‍यांच्या स्वाधीन केले जातात. तिथे असणारा निवांतपणा, ओपन-एअर कॅफे आणि रस्त्यावरील कलाकारांचे सादरीकरण मनाला वेड लावणारे असेच. युरोपमधील ही संस्कृती डोळ्यांसमोर ठेवली, तर मुंबईच्या या नव्या प्रयोगाचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवते. मुंबईसारख्या अफाट लोकसंख्या आणि वाहतुककोंडीच्या महानगरात शनिवार-रविवार संध्याकाळी वाहनांना पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पदच. यामुळे मुंबईकरांना वाहनांच्या धुरापासून आणि कर्कश हॉर्नच्या आवाजापासून मुक्त अशी हक्काची मोकळी जागा मिळाली आहे. युरोपमधील जुन्या वास्तूंचे जतन करत, जसा तिथला परिसर पादचार्‍यांसाठी सजवला जातो, अगदी त्याच धर्तीवर काला घोडातील ऐतिहासिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला हा ‘आर्ट अव्हेन्यू’ मुंबईच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला नवीन ओळख मिळवून देईल, यात शंकाच नाही!
 
९९६७८२६९८३




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर