वृक्षलागवड म्हणजे केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे, तर ग्रामीण आणि वनवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाचा प्रभावी मार्गही ठरू शकतो. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे ‘वनवासी कल्याण आश्रम’ने राबविलेल्या वृक्षवाटप आणि वृक्षलागवड उपक्रमाने सेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि समाजोन्नती यांचा सुंदर संगम घडवून आणला. या उपक्रमाची सविस्तर माहिती देणारा हा लेख...
पावसाळा सुरू होताच, सर्वत्र वृक्षलागवडीची लगबग दिसून येते. अनेक ठिकाणी हजारो रोपे लावली जातात; मात्र त्यांचे पुढे काय होते, हा प्रश्न कायम राहतो. याउलट पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने राबविलेला उपक्रम हा केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित न राहता, वनवासी कुटुंबांच्या भविष्यातील आर्थिक स्वावलंबनाशी जोडलेला होता. म्हणूनच, हा उपक्रम वेगळा आणि अभ्यास करण्यासारखा ठरतो.
दि. १४ जून रोजी विक्रमगड तालुक्यातील संगमनगर येथील धरतरी माता मंदिर परिसरात ‘वनवासी कल्याण आश्रमा‘तर्फे वृक्षवाटप आणि प्रातिनिधिक वृक्षलागवडीचे आयोजन करण्यात आले. वनवासी भागात झाडांची कमतरता नसली, तरी उत्पन्न देणार्या फळझाडांचा अभाव असल्याचे लक्षात घेऊन, जांभूळ, आंबा, काजू, फणस, सीताफळ आणि चिकू या फळझाडांच्या कलमांचे वितरण करण्यात आले. काही वर्षांत या झाडांमधून वनवासी कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
आज विक्रमगड परिसरात दिसणारे परिवर्तन एका दिवसात घडलेले नाही. नव्वदच्या दशकात ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने जव्हार परिसरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर बालवाड्या, संस्कारवर्ग, आरोग्य शिबिरे, पंधरवड्याचे दवाखाने, प्रथमोपचाराचे प्रशिक्षण, आरोग्यरक्षकांची उभारणी अशा विविध माध्यमांतून समाजाशी सातत्यपूर्ण संपर्क वाढत गेला.
पाण्याची तीव्र समस्या लक्षात घेऊन २०१५ नंतर मोकाशीपाडा, डोंगरीचा पाडा आणि खुडी या भागांत नळपाणी योजना राबविण्यात आली. महिलांना बचतगटांच्या माध्यमातून शिलाई, मसालानिर्मिती, घरगुती पिठे तयार करणे, वाती तयार करणे, पणत्या सुशोभित करणे यांसारख्या उद्योगांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सेवाकार्याचा व्याप शिक्षण आणि आरोग्यापुरता न राहता, आर्थिक स्वावलंबनाकडेही वळला.
गोरेगाव परिसरातील वृक्षमित्रांच्या मासिक बैठकीत या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर यावेळी चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोरेगाव, विलेपार्ले, घाटकोपर आदी भागांतील एकूण ४७ जण या उपक्रमात सहभागी झाले. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
सकाळी संगमनगर येथील धरतरी माता मंदिरात पोहोचल्यानंतर वनवासी समाजाच्या परंपरेनुसार सर्वांचे स्वागत करण्यात आले. वनवासी समाज ज्या देवतांची श्रद्धेने पूजा करतो, त्या परंपरांचा सन्मान राखत मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थे’चे मधुकर माळकरी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना रानभाजी महोत्सव, सामूहिक विवाह सोहळे आणि धर्मांतर रोखण्यासाठी सामाजिक व धार्मिक जागृतीचे प्रयत्न यांचा आढावा घेतला.
वनवासी भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. ‘वनवासी कल्याण आश्रम’चे अध्यक्ष विष्णूजी सुरम, कोषाध्यक्ष अविनाश सात्विक, श्रीधर कोचरेकर आणि नंदू शिराळीकर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. ‘गोरेगाव शंखनाद समूहा’तील अरविंद सुतार, दत्ताराम गिरकर आणि जयेश पुरंदरे यांनी शंखनाद करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमानंतर सहभागींचे चार गट करण्यात आले. संगमनगर, झाटेपाडा, साखरेचा माळकरीपाडा आणि विठ्ठलनगर-वेहेलपाडा या भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने रोपांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याची यादी आणि त्याला मिळणार्या रोपांची माहिती आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीत सुमारे ७३० फळझाडांच्या कलमांचे वितरण पूर्ण झाले. पाऊस अद्याप सुरू झाला नसल्यामुळे प्रत्येक पाड्यावर प्रतीकात्मक वृक्षलागवड करण्यात आली.
या भेटीदरम्यान मुंबईहून गेलेल्या स्वयंसेवकांनी वनवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक वस्त्यांमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’मुळे पक्की घरे उभी राहिलेली दिसली. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे विकासाच्या काही योजना प्रत्यक्षात पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
त्यानंतर सर्वजण विक्रमगड येथील महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात एकत्र आले. परिचय सत्रात अविनाश सात्विक यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या देशव्यापी कार्याचा परिचय करून दिला. १९५२ मध्ये बाळासाहेब देशपांडे यांनी सुरू केलेल्या या कार्याचा विस्तार आज देशभर झाल्याचे त्यांनी सांगितले. इंग्रजांनी वनवासी समाज आणि इतर समाज यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला; त्याला उत्तर म्हणून ‘तू-मी एक रक्त’ हा संदेश ‘वनवासी कल्याण आश्रम’ने समाजासमोर ठेवला, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, आरोग्य, सामाजिक जागृती आणि संघटन या चार अंगांनी संस्था कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. एकल विद्यालये, विद्यार्थी वसतिगृहे, आरोग्यसेवा, क्रीडास्पर्धा, घरवापसी उपक्रम आणि वनवासी भागातील सर्वांगीण विकास यांचा त्यांनी आढावा घेतला. गेल्या काही वर्षांत ७३ हजारांहून अधिक फळझाडांचे वितरण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्टपणे समोर आला. वनवासी समाजाचा विकास केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, समाजाच्या सहभागातूनही साधता येतो. वृक्षलागवड हा पर्यावरणाचा विषय असला, तरी योग्य नियोजनातून तो कुटुंबाच्या उत्पन्नाशी जोडता येतो. सेवा, संस्कार, स्वावलंबन आणि समाजसंघटन यांची सांगड घालत ‘वनवासी कल्याण आश्रम’ने विक्रमगडमध्ये उभे केलेले कार्य हे केवळ वृक्षलागवडीचे उदाहरण नसून सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास करण्यासारखा आदर्श ठरतो. आज ज्यांच्या हाती ही रोपे देण्यात आली आहेत, त्याच रोपांचे फळ पुढील पिढ्यांच्या जीवनात समृद्धीची नवी पालवी फुलवेल, अशी आशा या उपक्रमातून व्यक्त झाली.
अजित वर्तक
८०९७७९६०७०