भूकंपात ज्याप्रमाणे लहान-मोठ्या इमारती कोसळतात, त्याप्रमाणे राजकीय भूकंपामुळेही राजकीय पक्षरूपी इमारती कोसळतात. महाराष्ट्रात उबाठा सेनेची इमारत पूर्वीच कमकुवत झाली होती. कालच्या सचिन अहिर यांच्या अर्ज दाखल करण्याच्या झटक्याने ती आता कोलमडण्यास प्रारंभ झाला आहे. ज्यांना आपल्याच पक्षात काय चालू आहे, त्याची कल्पना नसते; त्यांनी दुसर्या पक्षातील घडामोडींवर, कथित षड्यंत्रांवर भाष्य करणे हे सर्वस्वी हास्यास्पदच!
व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या भीषण भूकंपात अनेक इमारती कोसळल्या. पण, महाराष्ट्रातही भूकंप झाला असून, त्यामुळे निदान एक इमारत आता ढासळण्याच्या बेतात आहे. अर्थात, हा नैसर्गिक भूकंप नसून राजकीय भूकंप आहे आणि त्याच्या झटयाने ‘उबाठा सेना’ नावाची इमारत ढासळण्यास प्रारंभ झाला आहे. या गटाचे तीन आमदार विधान परिषदेत आहेत. त्यांपैकी सचिन अहिर या आमदाराने काल अचानकपणे विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज शिवसेनेतर्फे (शिंदे सेना) भरल्याने उबाठा सेनेला जोरदार धक्का बसला आहे. अहिर यांनी हा अर्ज भरल्यानंतरच त्यांनी उबाठा सेनेला ‘रामराम’ ठोकल्याचे सर्वांना समजले. आता परिषदेतील उर्वरित दोन आमदार काय करतात, त्याची प्रतीक्षा आहे.
उबाठा सेनेच्या लोकसभेतील नऊपैकी सहा खासदारांनी नुकताच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता उबाठा सेनेच्या विधान परिषदेतील तीनपैकी एका आमदाराने म्हणजे, सचिन अहिर यांनी आता शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. कारण, त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज शिंदे गटाकडून भरला. अहिर हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची गंधवार्ताही कोणाला नव्हती. उबाठा यांना तर ते मुख्यमंत्री असतानाही आपले ४० आमदार आपल्याला सोडून गुवाहाटी येथे जात असल्याची काही खबर नव्हती. त्यामुळे अहिर यांच्याबाबत ते बेसावध राहिले, तर त्यात नवल नव्हे. पण, अहिर यांच्या पक्षांतराने उबाठा सेनेला घरघर लागली असून, आता त्या गटाचे विधानसभेतीलही काही आमदार शिंदे यांच्या सेनेत किंवा भाजपमध्ये गेल्यास नवल वाटू नये. कारण, मुळात उबाठा सेना हा पक्षच अनैतिक आणि अनैसर्गिक पायावर उभा होता. केवळ सत्तेच्या गोंदाने तो एकत्र टिकला होता. आता सत्ता गेल्यानंतर या गटाचे प्रयोजनच संपुष्टात आले आहे आणि घडणार्या घटना या त्याच्याशी सुसंगतच आहेत. त्या गटात आता फक्त उद्धव व आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच शिल्लक राहतील, असे दिसते.
सचिन अहिर हे वरळी येथून परिषदेवर निवडून गेले आहेत. वरळीचे विधानसभेचे आमदार हे स्वत: आदित्य ठाकरे. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातील एक मोठा नेता आपल्याला सोडून जात असल्याचे आदित्य ठाकरे यांना पाहावे लागते. अर्थात, त्याबद्दल त्यांना काही खंत वाटत असेल, याची शक्यता कमीच. त्यांना सर्वकाही आयतेच मिळाले असल्याने आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचे महत्त्व त्यांना जाणवतच नाही. अशाच एकेका कार्यकर्त्याला जोडून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा वृक्ष उभा केला होता. पण, त्याच्या पारंब्यांना या खोडाचे महत्त्वच लक्षात येत नसल्याने हा वृक्ष आता कोसळतो आहे.
आपलेच नेते आपल्याला सोडून जात आहेत, यातही उद्धव ठाकरे यांना स्वत:त काही दोष दिसतच नाही. थोरामोठ्यांवर टीका केल्याने लिंबूटिंबूंनाही प्रसिद्धी मिळते, तीच उबाठाची परिस्थिती. उबाठाचे एकनिष्ठ सेवक संजय राऊत यांनी त्याचे खापर भाजपवर, त्याहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले. फडणवीस यांचे वर्तन रामद्रोही आणि घटनाद्रोही असल्याचा फुटकळ आरोप त्यांनी केला. त्याचे स्पष्टीकरण काय ते त्यांनी दिलेले नाही. सुज्ञ व्यक्ती ते विचारणारही नाही. पण, फडणवीस हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे राहू नयेत, यासाठी केंद्रातूनच त्यांना महाराष्ट्रातच अडकवून ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केल्याची आधारहीन टीकाही त्यांनी केली. या टीकेतील तर्कसंगती ज्याच्या लक्षात येईल, तो खरा चाणक्य म्हटला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी पुष्कळ संदर्भहीन टीका केली आहे. तिची दखलही घेण्याचे कारण नाही, इतकी ती पोकळ. उबाठा सेनेचे खासदार व आमदार हे आपणहूनच हा पक्ष सोडण्यास उतावीळ झाले आहेत, त्याला भाजप किंवा एकनाथ शिंदे काय करणार? आपलेच नेते आपल्याला का सोडून जात आहेत, याचा विचार ठाकरे यांनी कधीच केला नाही. तसा तो केला असता, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आपल्या नेतृत्वात काही कमजोरी आहे, हे ठाकरे कधीच मान्य करणार नाहीत. निदान आपल्या नेत्यांच्या ते कायम संपर्कात राहिले असते आणि त्यांची मते ऐकून घेतली असती, तर कदाचित आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
उद्धव ठाकरे यांनी नुकताच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांचा दौरा केला. तो कशाला केला, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण, आपला नेता आपल्याला भेटत तर नाहीच; पण त्याच्याशी संपर्कही होऊ शकत नाही, ही उबाठा सेनेच्या नेत्यांची कायमची तक्रार असते. आता या भागातील उबाठाच्या खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव यांच्या दौर्याला काही अर्थच उरत नाही. आपल्याच कार्यकर्त्यांची भेट घ्यायची नाही किंवा त्यांचे म्हणणेही ऐकून घ्यायचे नाही, ही जगावेगळी नेतेगिरी उद्धव ठाकरे करीत होते.
ज्यांना आपल्याच पक्षात काय घडते आहे, त्याची गंधवार्ता नसते; त्यांनी दुसर्या पक्षातील नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण कसे चालू आहे, यावर भाष्य करणे हे हास्यास्पदच. उबाठा हे दिवसेंदिवस असेच हास्यास्पद बनत चालले आहेत. म्हणूनच, उद्धव ठाकरे यांनी आता राजकारण सोडावे आणि लग्नसोहळे सुरू करावेत, अशी टीका भाजपने केली. त्याचा उद्धव ठाकरे यांनी जरूर गांभीर्याने विचार करावा. अतिअहंकार आणि सत्तेच्या नशेमुळे काय होते, ते तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांच्या उदाहरणावरून कळून येते. तेव्हा, ठाकरेंनी दिल्लीची चिंता सोडावी आणि महाराष्ट्रातील आपले उरलेसुरले आमदार आपल्यासोबत राहतील का, याचा विचार केला तरी पुरे!