भारतीय संस्कृतीच्या उगमाशी जोडलेली सिंधू नदी ही राष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्मृतींचे प्रतीक आहे. लडाखमध्ये आयोजित ‘सिंधू महाकुंभ’ हा त्या स्मृतींना नव्याने उजाळा देणारा, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक सलोखा अधोरेखित करणारा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ठरतो. त्याविषयी...
आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका| पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः॥” या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध वचनातून भारतीय भूभागाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्वरूप स्पष्ट होते. याचेच मूर्त रूप लडाखमधील सिंधू महाकुंभात अनुभवायला मिळते. यंदाच्या जूनमध्ये लडाख येथे आयोजित सिंधू महाकुंभात, सहभागी होण्याची संधी मिळाली. निवृत्त पोलीस अधिकारी आणि राष्ट्रपतीपदकाने सन्मानित अभय दुदवडकर यांच्या निमंत्रणावरून हा प्रवास झाला. त्यांच्यासह निलेश टाकळीकर, शिवानी आहुजा, निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप काळे, हरधन बैतालीक आदी सहप्रवासीही होतेच. उद्योगपती आणि हिमालय परिवार, तसेच ‘सिंधुदर्शन समिती महाराष्ट्र’चे अध्यक्ष सुदीप साहांच्या पुढाकाराने, या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सिंधूविषयीची श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीच्या उगमस्थळाच्या दर्शनाच्या इच्छेमुळे हा प्रवास एक सांस्कृतिक अनुभवच ठरला.
तिबेटच्या कैलास-मानसरोवरमधून उगम पावणारी सिंधू, लडाखमधून भारतात प्रवेश करते. ऋग्वेदात सिंधूचा गौरव अनेक ठिकाणी आहे.. सिंधू संस्कृती, वेदकालीन सप्तसिंधू प्रदेश, रामायण, महाभारत, हिंगलाज शक्तिपीठ, मुल्तानचे सूर्यमंदिर अशा असंख्य ऐतिहासिक संदर्भांनी, सिंधू भारतीय सभ्यतेच्या केंद्रस्थानी राहिली. अभ्यासकांच्या मते ‘हिंदू’ हा शब्दही ‘सिंधू’ शब्दापासूनच विकसित झाला. फाळणीनंतर सिंधूचा बहुतांश प्रवाह पाकिस्तानात गेल्याची खंत, आजही अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच भारतातल्या सिंधूच्या प्रवाहाचे दर्शन घेणे भावनिक अनुभव ठरतो. लडाखमध्ये सिंधूला ‘सेंगे त्सांगपो’ किंवा ‘शेर दरिया’ म्हणून ओळखतात. डेमचोकपासून लेहमार्गे निम्मू येथे तिचा झांस्कर नदीशी होणारा संगम, मनात कायमचा घर करतो. सिंधू केवळ श्रद्धेचा विषय नसून लडाखमधील शेती, जलव्यवस्था, लघु जलविद्युत प्रकल्प आणि स्थानिक जीवनव्यवस्था तिच्यावरच अवलंबून आहेत. प्राचीन काळी सिल्क मार्गावरील व्यापारालाही, याच नदीखोर्याचा मोठा आधार होता.
प्रवासादरम्यान खारदुंगला परिसरात जाण्याचा प्रयत्न केला. भूस्खलनामुळे ते शक्य झाले नाही; मात्र हिमाच्छादित पर्वतरांगांचे दर्शन अविस्मरणीयच ठरले. लेहजवळील चुशोट येथील पालगा रिम्पोचे यांच्या बौद्ध मठालाही भेट देण्याचा योग आला. उद्घाटन सोहळ्यातील रिम्पोचे यांच्या निमंत्रणानुसार मठात गेल्याल्यावर, तेथील साधूंनी ‘जुले’ म्हणत केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. भोटी भाषेतील हा अभिवादनाचा स्थानिक संस्कृतीतील साधेपणा, भारतीय विविधतेचे सुंदर दर्शन घडवतो. सिंधू महाकुंभाचा केंद्रबिंदू म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधी, त्यांच्या राज्यातील नद्यांचे जल सिंधूत अर्पण करतात. विविध धार्मिक परंपरांतील प्रतिनिधींची एकत्र प्रार्थनाही होते. लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणातून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’या संकल्पनेची अनुभवती येते.
या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांची भेट झाली. तसेच देशभरातील विविध कलाकार आणि अभ्यासकांशीही संवाद साधता आला. ‘सिंधुदर्शन यात्रे’ची संकल्पना १९९६ मध्ये, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, इंद्रेश कुमार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी मांडली. १९९७ पासून सुरू झालेली ही यात्रा, आज सिंधू महाकुंभ म्हणून विकसित झाली आहे. यामागे भारतीय संस्कृतीच्या उगमस्थानाविषयीची जागरूकता निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणे आणि सीमाभागाशी समाजाचे भावनिक नाते दृढ करण्याचा उद्देश आहे.
कैलास-मानसरोवर मार्ग, भोटी भाषेला घटनात्मक मान्यता, हिमालयीन संस्कृतीचे जतन अशा विविध विषयांवरही यात चर्चा घडते. त्यामुळे हा सोहळा इतिहास, संस्कृती, पर्यावरण, सीमासुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा संगम ठरतो. उंच पर्वतरांगांमध्ये अखंड वाहणार्या सिंधूसमोर उभे राहिल्यावर जाणवते की, नदी पाण्याबरोबरच; संस्कृती, इतिहास आणि राष्ट्रीय ओळख यांचीही वाहक असते. सिंधू महाकुंभ हा त्याच अखंड प्रवाहाशी नव्याने नाते जोडण्याचा आणि भारतीय संस्कृतीच्या चिरंतन परंपरेला अभिवादन करण्याचा प्रेरणादायी सोहळा आहे.
दयानंद सावंत
९८६९६१९७०४