सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी एकमताने निवड

    01-Jul-2026   
Sachin Ahir Deputy Chairman
 
मुंबई : (Sachin Ahir Deputy Chairman) विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी विधानपरिषद उपसभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. आ. संजय खोडके यांनी उपसभापती निवडीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.
 
महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते. मात्र, उपसभापतीपदाची निवडणूक न होता एकमताने निवड होण्याचा आपला प्रघात आहे. त्यामुळे उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर उबाठा गटाचे आ. अनिल परब यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतल्याने आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली.विधानपरिषद सदस्य संजय खोडके, विक्रम काळे, प्रवीण दरेकर, मनिषा कायंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून निवड करण्याबाबत प्रस्ताव मांडला.(Sachin Ahir Deputy Chairman)
 
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन प्रस्तावात बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहाच्या उच्च परंपरा पाळत सचिन अहिर यांची सभागृहाने एकमताने उपसभापती पदी निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. विरोधी पक्षांनीही सभागृहाच्या परंपरांचा मान राखत प्रस्ताव मागे घेतला याबाबत त्यांचेही आभार मानतो. सचिन अहिर आणि मी एकाचवेळी परिषदेत निवडून आलो. त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधीही मिळाली. अहिर या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा होतो. सचिन अहिर हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत. सर्वांशी चांगले संबंध ठेवून जनसामान्यांना कशी मदत करता येईल, असा प्रयत्न ते करतात. सभापतींच्या खुर्चीवर बसल्यावर प्रत्येकाला मला न्याय मिळाला पाहिजे असे वाटते. त्यामुळे सभापतींच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना प्रसंगी नाराजी सहन करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागतो."(Sachin Ahir Deputy Chairman)
 
नीलम गोऱ्हे यांनी पदाचा मान राखला
 
ते पुढे म्हणाले की, "नीलम गोऱ्हे यांनीही चांगल्या पद्धतीने या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याने महिलांवरील अत्याचार आणि बालकांचे प्रश्न आल्यावर प्रसंगी कठोर भूमिका घेत योग्य निर्देश दिले. उपसभापती पदावर काम करताना त्या पदाचा मान राखण्याचे आणि वाढवण्याचे काम त्यांनी केले. चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता अशी सचिन अहिर यांची ओळख राहिलेली आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाळ गाजवला आणि पक्ष वाढवण्याचे काम केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. २०१९ साली ते निवडणूक लढवतील असे सुरु होते पण त्यांनी पक्ष नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे आता सचिन अहिर आणि सुनील शिंदे विधानपरिषदेत आलेत. विरोधी पक्षात असताना महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे प्रश्न त्यांनी मांडले. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सचिन अहिर यांचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे तयार झाल्यामुळे योग्यवेळी गोल कसा मारायचा याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.(Sachin Ahir Deputy Chairman)
 
मुख्यमंत्री म्हणाले की, "सचिन अहिर सभागृहात आले तेव्हा त्यांचे चिन्ह धनुष्यबाण होते त्यामुळे फारसा काही बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या निवडीनंतर फारसे कुणी प्रश्नही विचारणार नाहीत. कायदेशीरपणे पद्धतीने ते उपसभापती झाले आहेत. आता सर्वांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सर्वांना एक समजून घेणारे उपसभापती म्हणून ते आपली कारकीर्द पूर्ण करतील, अशा विश्वास आहे."(Sachin Ahir Deputy Chairman)
 
शिवसैनिक उपसभापती पदावर बसला याचा आनंद - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या टीम मध्ये अष्टपैलू आणि विक्रम करणारे खेळाडू असावे असे प्रत्येकाला वाटते. एका सचिनला आपण क्रिकेटचे दैवत मानतो आणि दुसऱ्या सचिनने आता निर्धाराचे पॅड बांधून जबाबदारीची बॅट हाती घेतली आहे. तुमच्यामध्ये आम्ही केवळ राजकारणी पाहिलेला नाही, तर समाजकारणी पाहिला आहे. हजारो कामगारांशी तुमची नाळ जोडलेली आहे. कामगार चळवळीतून घडलेले नेतृत्व म्हणून तुमची वेगळी ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांच्यानंतर दुसरा शिवसैनिक या पदावर बसला याचा आनंद आहे."(Sachin Ahir Deputy Chairman)
 
"विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रदीर्घ संसदीय, प्रशासकीय आणि सामाजिक अनुभवाचा लाभ विधान परिषदेला निश्चितच होईल. सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, संयमाने आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडत ते विधान परिषदेच्या गौरवशाली संसदीय परंपरेला अधिक बळकटी देतील."
 
- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर