खेळातून देशसेवेचे बघितलेले स्वप्न, मोठ्या जिद्दीने आलेल्या प्रत्येक संकटाला यशस्वी तोंड देत पूर्ण करणार्या रूपाली विठ्ठल बोदे यांच्याविषयी...
जिद्द ही माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठी शक्ती! परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्दीने पुढे चालत राहणारी माणसेच अखेर आपले ध्येय गाठतात. कारण, जिद्दच प्रत्येक अडथळ्यातून नवी वाट शोधण्याचे बळ देते. यशाचा प्रवास कधीच सरळ नसतो. तो संघर्ष, संयम, सातत्य आणि स्वतःवरच्या अढळ विश्वासातून घडतो. अनेकदा नियती वाट बदलते. पण, जिद्द ध्येय बदलू देत नाही. म्हणूनच, स्वप्नांच्या दिशेने अविरत पावले टाकणार्यांसाठी संघर्ष हा भविष्यातील विजयाची पायाभरणी करणारा ठरतो. ठाण्याच्या रूपाली विठ्ठल बोदे यांचा प्रवासही त्यांच्या जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आहे.
ठाण्यातील ब्राह्मण शाळेत शिक्षण घेत असतानाच रूपाली यांच्या मनात भारतासाठी खेळण्याचे स्वप्न रुजले. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी खेळाडूंची शिस्त, मेहनत आणि देशासाठी खेळण्याचा अभिमान जवळून अनुभवला. त्यामुळे शालेय जीवनातच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. या स्वप्नाला पहिली दिशा मिळाली, ती इयत्ता आठवीत शाळेच्या कबड्डी संघात झालेल्या निवडीमुळे. विविध स्पर्धांमधील त्यांच्या दमदार कामगिरीने ठाण्यातील ‘प्रेरणा कला-क्रीडा मंडळ’ या कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या लबचे लक्ष वेधले. लबकडून खेळताना रूपाली यांनी व्यावसायिक स्पर्धांचाही अनुभव घेतला. मैदानावर घाम गाळताना शिक्षणातही त्यांनी सातत्य राखले. इयत्ता दहावीत ८१ टक्के गुण मिळवत, खेळ व अभ्यास यांचा उत्तम समतोलही त्यांनी साधला.
दहावीनंतर मात्र त्यांच्यासमोर वेगळेच आव्हान उभे राहिले. घरच्यांची इच्छा त्यांनी शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे अशी होती, तर रूपाली यांच्या मनात भारताची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न आकार घेत होते. दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्यासाठी त्यांनी माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. याच महाविद्यालयात त्यांच्या आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले. कबड्डीच्या सरावादरम्यान त्यांची ‘रस्सीखेच’ या खेळाशी ओळख झाली. सुरुवातीला केवळ नवीन खेळ म्हणून हातात घेतलेली दोरी पुढे त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवेल, याची त्यांनाही कल्पना नव्हती.
शिवाजी पार्कवर सुरू झालेला सराव दिवसेंदिवस अधिक कठीण होत गेला. कबड्डीमुळे अंगी आलेली ताकद, सहनशक्ती आणि सांघिक खेळाची सवय रस्सीखेचमध्ये त्यांची जमेची बाजू ठरली. त्याचे प्रतिबिंब लवकरच स्पर्धांमध्ये दिसू लागले. महाविद्यालयाच्या संघातून त्यांनी विभागीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही त्यांनी सातत्य राखत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये रूपाली यांना पाच ‘सुवर्णपदके’ मिळाली आहेत. याच कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची निवड झाली. प्रत्येक स्पर्धेतील यश त्यांच्या स्वप्नाकडे जाणारे एक पाऊल ठरत होते. विशेष म्हणजे, या सार्या धावपळीत बारावीच्या परीक्षेतही त्यांनी ८२ टक्के गुण मिळवत, शिक्षणाची बाजूही तितयाच ताकदीने सांभाळली.
मात्र, विज्ञान शाखा आणि क्रीडा यांचा मेळ घालणे कठीण होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी कला शाखेची वाट निवडण्याचा लवचीकपणा दाखवत खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे मात्र क्रिकेटला अधिक प्राधान्य असल्याने शिवाजी पार्कमधील ‘आचरेकर क्लब’मध्ये त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळातच बॉसिंग, कबड्डी, क्रिकेट आणि रस्सीखेच अशा विविध खेळांचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला; पण मन मात्र ‘रस्सीखेच’च्या मैदानातच रमले. आधी पदवी आणि त्यानंतर ‘बीपीएड’ पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे गाठले. अर्थात, यामध्येही सरकारच्या विभागीय स्पर्धांमधून देशासाठी खेळता येण्याचेच स्वप्न होते. अभ्यासाचा ताण वाढता असला, तरी त्यांनी सराव थांबवला नाही.
त्यांच्या अखंड प्रयत्नांना अखेर ऑक्टोबर २०२५ मध्ये यश आले. मलेशियात झालेल्या ‘आशियाई अजिंयपद स्पर्धे’त भारतीय महिला रस्सीखेच संघाच्या कर्णधार म्हणून रूपाली यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. शालेय जीवनात पाहिलेले स्वप्न त्या क्षणी सत्यात उतरले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. आज त्यांच्या नावावर ‘रस्सीखेच’मधील ३० पदके आणि विविध पुरस्कार आहेत. सध्या त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, आता देशासाठी ‘सुवर्णपदक’ मिळवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे.
रूपाली बोदे यांचा प्रवास स्वप्न पाहणार्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा आहे. सध्या रूपाली यांनी पाहिलेले सुवर्णभरारी घण्याचे स्वप्नही लवकरच साकार होवो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर