मुंबई : (Pakistan-Occupied Kashmir Protests) पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यातील काश्मीरमध्ये सध्या तीव्र असंतोष उसळला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा आरोप होत असून, निष्पाप नागरिकांचा बळी गेला तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. पीठ, वीज आणि इतर मूलभूत गरजांच्या टंचाईने त्रस्त झालेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी आता पाकिस्तानचा भाग म्हणून राहण्यास नकार दिला आहे. 'आम्ही पाकिस्तानचा भाग नाही', असे म्हणत आंदोलकांनी जगासमोर उघडपणे घोषणा केली आहे. त्याचबरोबर, इस्लामाबादमधील शहबाज शरीफ सरकारला त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि रेशनचा पुरवठा याच पद्धतीने रोखला गेला, तर जगण्यासाठी आम्हाला इतर पर्याय स्वीकारावे लागतील, असा इशारा आंदोलकांनी दिला.
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील ईदगाह मैदानात सुरू असलेल्या मोठ्या आंदोलनादरम्यान नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला. आंदोलकांनी पाकिस्तान सरकारवर जाणीवपूर्वक अन्नधान्य व इतर मूलभूत गरजांचा पुरवठा रोखून सामान्य नागरिकांचा छळ केल्याचा आरोप केला. स्थानिक नेते सरदार अमान खान यांनी व्यासपीठावरून पाकिस्तान सरकारला थेट सुनावत म्हटले, आम्हाला तुमच्या रेशनची गरज नाही. उलट तुम्हालाच आमची गरज आहे.
हे आंदोलन 'जम्मू-काश्मीर अवामी ॲक्शन कमिटी' यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून विशेष म्हणजे, याच महिन्यात पाकिस्तान सरकारने या संघटनेवर दहशतवादविरोधी कठोर कायद्यांतर्गत बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.(Pakistan-Occupied Kashmir Protests)
संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप आणखी वाढला
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच रावळकोट आणि मीरपूरमधील नागरिक 'खरे काश्मीरी नाहीत' असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली असून, राजकीय नेतृत्वापासून सामान्य नागरिकांपर्यंत इस्लामाबादविरोधातील नाराजी अधिक तीव्र झाली आहे.(Pakistan-Occupied Kashmir Protests)
आंदोलन दडपण्यासाठी दहशतवादविरोधी कायद्यांचा वापर?
आंदोलकांचा आरोप आहे की, पाकिस्तान सरकार हे आंदोलन 'राष्ट्रीय सुरक्षेला धोका' असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अन्नधान्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वस्त रेशन, चांगले प्रशासन, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी लढणारे सरदार अमान खान आणि अवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यकर्त्यांवर दहशतवादविरोधी कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Pakistan-Occupied Kashmir Protests)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक